तंबाखू आणि तंबाखू असणारे इतर पदार्थ (गुटखा किंवा सिगारेट) खाल्याने सेक्सवर किंवा लैंगिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तंबाखूमध्ये अनेक रसायनं आहेत. यातील महत्वाचं रसायन म्हणजे निकोटीन. निकोटीन पूर्वी कीटकनाशक म्हणून वापरलं जायचं. तंबाखूच्या व्यसनामुळे धमन्या आणि रक्तवाहिन्या रुंद होऊ होतात आणि शरीरातील आणि पर्यायाने लैंगिक अवयवांमध्ये देखील रक्तप्रवाह मंदावतो. या व्यसनामुळे लैंगिक आयुष्यासोबत इतरही गंभीर प्रॉब्लेम्स तयार होतात. तंबाखू तोंडात चावून चघळल्याने रक्तदाब वाढतो. सारखी तंबाखू घेतल्याने तोंडाचा कर्करोग व हिरड्यांचे विकार होण्याची शक्यता खूप वाढते.
सिगारेटमध्ये तंबाखू असते. सिगारेटच्या धुरातून अनेक रसायनं शरीरात जातात. उदा. निकोटीन, टार, CO. ‘टार’ सिगारेट ओढणाऱ्या लोकांच्या दातांना पिवळी बनवतो, हाताच्या बोटांना लागल्यावर बोटं देखील पिवळी दिसायला लागतात. खूप सिगारेट ओढणाऱ्या लोकांमध्ये छातीचे विकार आणि फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर त्यांच्या लैंगिक, प्रजनन आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतात. खूप प्रमाणात सिगारेट पिणाऱ्या पुरुषांच्या पुरुषबीज निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. रक्तवाहिन्या अरुंद होऊन (अॅथेरोस्कलेरॉसिस) लिंगाला उत्तेजना येण्यास अडचण येते.
सिगारेटच्या व्यसनातून बाहेर पडायचे असल्यास एखाद्या समुपदेशक किंवा व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्या.