प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबाईची किंवा मुलीची खतना करतात म्हणजे काय करतात
1 उत्तर

‘खतना’ (Female Genital Cutting) मध्ये मुलींच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणण्यासाठी पाच ते आठ वर्षे वयोगटातील मुलींच्या क्लिटोरिस (योनीमध्ये लघवीच्या जागेच्या वर एक फुगीर भाग) कापले जाते. काही महिला मुलींचे हात पाय पकडतात आणि ब्लेडने हा अवयव कापला जातो. ‘खतना’ ही प्रथा तशी आफ्रिकेमधील काही देशांमध्ये खूप वर्षांपासून चालत आली आहे पण भारताच्या काही भागांमध्येही ती पाळली जाते. मुलींच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणण्यासाठी ‘खतना’ केली जाते. परंपरांच्या नावाखाली चालणारी ही एक अमानवीय, क्रूर आणि स्त्रियांच्या लैंगिक अधिकारावर गदा आणणारी प्रथा आहे. धार्मिक मान्यतेमुळे आजही ही प्रथा जगभरातल्या काही देशात अस्तित्वात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ‘खतना’ चार प्रकारे केली जाते. क्लिटोरिसचा (योनीमध्ये लघवीच्या जागेच्या वर एक फुगीर भाग) काही किंवा पूर्ण भाग कापला जातो. योनिच्या दोन्ही बाजूस त्वचा असते ज्याला बाह्य ओठ आणि आतले ओठ (labia minora and the labia majora) असं म्हणतात ते कापले जातात. काही ठिकाणी ही त्वचा शिवून बंद केली जाते. याशिवाय टोचणे, कोरणे, खरवडून काढणे, डागणे आणि टोचणे यांसारख्या अनेक अवैद्यकीय हानीकारक प्रकारही काही ठिकाणी केले जातात.

पाच ते आठ वर्षे इतक्या कोवळ्या वयातील मुली खतना केल्यांनतर कितीतरी दिवस वेदनेने तडफडत असतात. काही मुलींना योनिमार्गाजवळ जंतूसंसर्ग होतो, मासिक पाळीदरम्यान वेदना होतात. ही प्रथा म्हणजे कोणतेही वैद्यकीय कारण नसताना, धर्माच्या नावाखाली लक्षावधी मुलींना विनाकारण पोहचवली जाणारी हानी आहे. ‘खतना’ सारख्या प्रथा पाळणे हे स्त्रीच्या लैंगिक आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.

लैंगिक सुखाचा विचार करता स्त्रीमध्ये क्लिटोरिस खूप महत्वाची भूमिका बजावते. हळुवार दाबलं, चोळलं, स्पर्श केला किंवा सायकल चालवण्यासारख्या कृतीमध्ये क्लिटोरिस उद्दीपित होऊ शकतं. हस्तमैथुनामध्ये या अवयवाला स्पर्श करून मुली लैंगिक सुख मिळवू शकतात. लैंगिक संबंध आणि नाती जोडण्याचा, लैंगिक अभिव्यक्ती/ निवडीचा, जोडीदार निवडीचा अधिकार, लैंगिक क्रिया करायची का नाही हे ठरवण्याचा अधिकार यांसारखे लैंगिक अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहेत. व्यक्तीच्या धर्माशी, शिक्षणाशी, आर्थिक परिस्थितीशी, ती स्त्री आहे का पुरुष याच्याशी किंवा ती समलिंगी आहे की भिन्नलिंगी याचा या हक्कांवर काहीही परिणाम होत नाही. हे अधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळालेच पाहिजेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 10 =