प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला माझ्यातील पुरुषी गुण नष्ट करायचे जसे की दीढी मिश्या हातापायांवरील केस, छातीवरील केस ई प्लीज काहितरी उपाय सांगा की चेहरावरील दाढी मिश्या

1 उत्तर

तुम्हाला तुमच्यातील पुरुषी गुण का नष्ट करायचे आहेत? हे समजले असते तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणं सोपं गेलं असतं.

अंगावर केस का येतात? हे समजून घेवूयात. वयाच्या अंदाजे 10 व्या वर्षानंतर लैंगिक संप्रेरकांचा आपल्या शरीरावर परिणाम दिसायला लागतो. ही संप्रेरकं अँड्रोजन आणि इस्ट्रोजन अशा दोन गटातील असतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही लिगांमध्ये दोन्ही गटातील संप्रेरकं तयार केली जातात. त्यांच्या प्रमाणात फरक असतो. स्त्री शरीरात इस्ट्रोजन तर पुरुषांच्या शरीरात अँड्रोजन जास्त प्रमाणात तयार होतं. अँड्रोजन हे हाडांच्या वाढीसाठी आणि शरीरावरच्या केसांसाठी कारणीभूत असतं. पुरुषांच्या शरीरात अँड्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या अंगावर केस जास्त येतात. काही स्त्रियांमध्ये जर अँड्रोजनचे प्रमाण वाढलं तर त्यांच्या अंगावरही केस किंवा दाढी मिशा येवू लागतात.

पुरुषी गुण नष्ट करावेसं वाटण्याच्या दोन शक्यता वाटतात. त्या लक्षात घेऊन उत्तर देत आहोत.

१. तुम्ही जन्माने स्त्री आहात तसेचं तुमचा लिंगभावही स्त्रीचा आहे त्यामुळे तुम्हाला पुरुषी गुण नष्ट करायचे आहेत.

स्त्रियांमध्ये जर अँड्रोजनचे प्रमाण वाढले तर त्यांच्या अंगावरही केस किंवा दाढी मिशा येऊ शकतात. यात काहीही अनैसर्गिक नाही. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारले पाहिजे. स्वतःची लाज वाटून घेऊ नका. या संप्रेरकाचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार घेणं योग्य राहील.

२. तुम्ही जन्माने पुरुष आहात मात्र तुमचा लिंगभाव स्त्रीचा आहे म्हणजेच तुम्हाला तुम्ही स्त्री आहात असं वाटतं.

एखाद्या व्यक्तीचं शारीरिक लिंग एक त्याचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचं असू शकतं. काही वेळा मुलग्यांना ते लहानाचे मोठे होत असताना सातत्याने असं वाटतं की, ते मुलगी आहेत. म्हणजेच त्यांचे शरीर मुलग्यांसारखे असतं (लिंग, वृषण इ.) मात्र मानसिक घडण मुलींची असते. शारीरिकदृष्ट्या तो मुलांसारखा आणि मानसिकदृष्ट्या त्यांचं भावविश्व स्त्री सारखं असतं. प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक असतो. यातही काहीही गैर नाही. तुमची शारीरिक घडण पुरुषाची असेल आणि तुम्ही स्त्री आहात असं तुम्हाला वाटत असेल तर त्यात काहीही गैर नाही. या संप्रेरकाचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार घेता येईल मात्र त्याआधी तुमच्या मनामध्ये लिंगभावाविषयी काही शंका असतील तर ‘ समपथिक ट्रस्ट, पुणे. 020 6417 9112’ येथे अवश्य संपर्क करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 1 =