लग्नापूर्वी रक्ताच्या, वीर्याच्या कुठल्या चाचण्या कराव्यात. सरकारी रुग्णालयात त्या कुठल्या विभागात करता येतील. मुलगा आणि मुलगी दोन्हींच्या कुठल्या चाचण्यांचा यात समावेश होतो.
आपला जोडीदार निरोगी असावा आणि भावी वैवाहिक जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी जर तुम्ही या चाचण्या करत असाल तर त्यात काही गैर नाही. मात्र चाचण्या दोघांच्या करून घ्याव्यात. तसंच संवाद साधून भावी जोडीदाराला तसं पटवून द्या. समोरच्या व्यक्तीला ‘आपल्यावर संशय/शंका घेतली जातोय’ अशी भावना यायला नको. अन्यथा नात्याची सुरुवातच गैरसमजातून व्हायची. असो. आता वळूयात तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे.
लग्नापूर्वी नेमक्या कोणत्या चाचण्या कराव्यात याचे सर्वमान्य असे एकच एक उत्तर नाही. तुमच्या दोघांचीही इच्छा असेल तर एच. आय. व्ही. आणि लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार, रक्तगट (समान रक्तगट असल्याने सहजीवनामध्ये कोणतीही अडचण येत नाही. समान रक्तगट असण्याचा आणि लैंगिक जीवन किंवा मुल होणं न होणं याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. पण रक्तगट माहित असावा.), जनरल आरोग्य तपासणी तसेच कुटुंबात आजाराची इतर काही हिस्ट्री असेल तर त्या तपासण्या करू शकता. प्रजनन म्हणजेच गर्भधारणा यासंबंधी देखील चाचण्या करता येऊ शकतील. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर चाचण्या टाळा. रिपोर्ट मधील वैद्यकीय भाषा सगळ्यांना कळतेच असे नाही. म्हणूनच टेस्टचा नेमका रिपोर्ट काय आहे किंवा रिपोर्टचा अर्थ काय आहे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य. हे सगळं अगदी सहजतेनं आणि परस्पर संमतीनं होणं योग्य. अरेंज मॅरेजमध्ये अनेकदा नात्यामध्ये किंवा ओळखीमध्ये होत असतात. एखादी व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या निरोगी नसेल तर तुमच्याकडून त्याची/तिची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. गोपनीयता पाळा.
निरोगी असण्यासोबतच इतर बाबतीतही जोडीदार परस्पर पूरक असणं गरजेचं आहे. सर्व बाबींबद्दल योग्य तो संवाद असणं, प्रेम असणं, एकमेकांवर विश्वास असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, प्रतिबंधात्मक काळजी घेऊनही लग्नानंतरदेखील आरोग्याच्या संबंधी काही प्रश्न येऊ शकतात. दोघांच्याही आयुष्यात. तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे ? शंभर टक्के परिपूर्ण कुणीच नसतं नाही का ? आजकाल वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अनेक आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. नात्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर आणि कमिटमेंट असेल तर येणाऱ्या समस्या त्यापुढे गौण ठरतात नाही का? अडचणी तर येणारच मग त्या वैद्यकीय स्वरूपाच्या असोत किंवा इतर कोणत्याही. तुम्ही जोडीदार म्हणून एकमेकांसोबत या सगळ्यात एकमेकांना कशी साथ देता हे महत्वाचं !