डॉक्टरांनी आम्हाला पूर्णपणे संबंध बंद ठेवायला सांगितले होते आम्ही तसे केले सुद्धा।। यामागची शास्त्रीय माहिती द्यावी
साधारणपणे गर्भधारणा झाल्यावर पहिले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने लैंगिक संबंध ठेऊ नयेत असा सल्ला दिला जातो. गर्भधारणा झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात गर्भ गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतो आणि तिथे त्याची वाढ सुरू होते. यामध्ये काही अडथळा येऊ नये तसेच गर्भाला धक्का लागू नये यासाठी लैंगिक संबंध टाळायला सांगतात. तसंच शेवटच्या तीन महिन्यात गर्भाशयावर ताण येऊ नये यासाठी असा सल्ला दिला जातो. काही वेळा गर्भाशयाचं तोंड दिवस भरण्याआधी उघडतं, अशा वेळी गर्भपाताचा धोका असतो म्हणूनही लैंगिक संबंध टाळण्यास सांगतात.
मात्र यामागे लैंगिक संबंध म्हणजे संभोग अशी धारणा असते. संभोग न करता अनेक मार्गांनी एकमेकांशी जवळीक साधता येते. त्यातून गर्भाशयाला किंवा गर्भाला कसलीही इजा होण्याचा धोका नाही. उलट एकमेकांच्या सहवासाचा मनावर आणि मूडवर चांगला परिणाम होतो जो गर्भाच्या वाढीसाठी कधीही चांगलाच. गर्भवती स्त्रीला कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने शारीरिक जवळीक साधल्यास त्यात काही धोका नाही. मात्र हे करताना गर्भाची आणि गर्भवतीची काळजी महत्त्वाची.