एखाद्या व्यक्तीविषयी लैंगिक आकर्षण वाटणे, सेक्स करण्याची इच्छा होणे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे…
व्यक्ती समोर असेल आणि त्या व्यक्तीविषयी विचारांच्या पातळीवर किंवा मनात तशा भावना येणं इथपर्यंत ते ठीक आहे पण प्रत्यक्ष लैंगिक संबंध ठेवताना मात्र विचार करावा. असे संबंध ठेवणे चूक की बरोबर याच्यात मी जाणार नाही पण खालील काही गोष्टींवर विचार करावा आणि निर्णय घ्यावा. आणि अर्थातच त्या निर्णयाची जबाबदारी देखील.
१. लैंगिक कृतीमध्ये समोरील व्यक्तीची संमती असणं गरजेचं असतं. अन्यथा तो बलात्कारच असतो. तुमच्या मामाच्या मुलीला देखील तुमच्या सोबत सेक्स करण्याची इच्छा आहे की नाही हे तुम्हाला जाणून घ्यावे लागेल. हे कसं जाणून घ्यायचं हे तुम्हालाच ठरवावं लागेल. तिला विचारण्यापूर्वी तिला जर हे आवडले नाही तर काय परिणाम होतील याचा देखील विचार करा आणि त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवा. तिची तयारी असेल आणि तुम्ही दोघे सज्ञान असाल (१८ वर्षे पूर्ण) तर योग्य ती सुरक्षिततेची (खाजगीपणा आणि योग्य ते गर्भनिरोधक) काळजी घेऊन संबंध ठेवण्यात काहीही गैर नाही.
२. तुमच्या या नात्याबद्दल, नात्याच्या भवितव्याबद्दल देखील दोघांनी मिळून विचार करा आणि निर्णय घ्या. नात्यामध्ये सर्वच बाबतीत पारदर्शकता असणे कधीही चांगले. खोटे आमिष दाखवून, लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे दोघांनीही विचारपूर्वक जे काही असेल ते ठरवा.
३. लैंगिक संबंधामुळं नात्यांमध्ये जास्त गुंतागुंत होण्याची शक्यता असते. शिवाय तुमच्या या नात्याबद्दल इतरांना कळालं तर जे परिणाम होतील त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल. अनेकवेळा अशा नात्यांमुळं स्त्रियांची बदनामी पुरुषांच्या तुलनेत जास्त होते. शिवाय त्यांना अधिक बंधनंदेखील सहन करावी लागतात.
वरील सर्व बाबींचा सारासार विचार करून तुमच्यासाठी योग्य तो निर्णय घ्या.