आपल्या समाजामध्ये सेक्सविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. विशेषतः मुलींवर आपल्या समाजामध्ये अधिक बंधनं असल्याने त्यांना याविषयी मोकळेपणा यायला वेळ लागू शकतो. यावर एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे, तिच्या कलाने घेणे हाच उपाय आहे. तुमच्यामधील संवाद वाढला की आपोआपच मोकळीक वाढेल आणि लाज हळूहळू कमी होईल.
आयुष्यातील पहिला वहिला सेक्स करताना सर्वप्रथम दोन्ही जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. पहिला रात्री सेक्स केलाच पाहिजे याचंही दडपण घेण्याची गरज नाही.सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचा विचार व्हायला पाहिजे. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. आणि पहिल्यांदा सेक्स करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जमायलाच पाहिजेत असा आग्रह धरू नका. तुम्हाला आनंद मिळणं आणि छान वाटणं जास्त महत्त्वाचं आहे. पहिल्यांदाच सेक्स करत असाल तर प्रभावी गर्भनिरोधक वापरणं कधीही चांगलं. निरोध किंवा कंडोमचा वापर करा आणि गर्भधारणा किंवा लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांची भीती मनातून काढून टाका.