प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्री पुरुषांच्या शरिराच्या कोणत्या अवयवाकडे पाहुन आकर्षित होतात? आणि का?

1 उत्तर

छान प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नातच एक सकारात्मकता आहे जी सहसा आपल्या समाजात आढळत नाही. त्याविषयी सर्वप्रथम बोलूया. स्त्रियांना लैंगिकता असते किंवा स्त्रिया लैंगिकदृष्ट्या active असतात आणि त्या कोणाकडे का होईना आकर्षित होऊ शकतात हे मान्य केलं जाताना खूप वेळा दिसत नाही. त्यांनी आपले आकर्षण व्यक्त करणे आणि लैंगिक इच्छांची पूर्ती करण्यासाठीची कृती करणे हे तर अतीच होतं. अशी बाई ‘अच्छी औरत’ च्या आपल्या संकल्पनेत बसत नाही. बघा आपल्या संस्कृतीत, कला साहित्यात, हा choice घेणाऱ्या स्त्रियांचं आपण काय केलं. शूर्पनखा घ्या किंवा अहिल्या घ्या अथवा आपली निर्भया घ्या. असो. उदाहरणं खूप देता येतील. त्यामुळे तुमचे योग्य प्रश्नाबद्दल अभिनंदन.   
 
आता तुमच्या प्रश्नाकडे वळूयात. एखादी व्यक्ती, मग ती स्त्री असो, पुरुष असो, द्विलिंगी असो, वा तृतीयलिंगी, कोणत्या व्यक्तीकडे अथवा एखादया व्यक्तीच्या कोणत्या अवयवाकडे आकर्षित होते याचे नेमके उत्तर नाही. म्हणजे असं बघा, सर्वच पुरुष स्त्रियांच्या चेहरा, उरोज अथवा कटी प्रदेशाकडे पाहून अधिक आकर्षित होतात अथवा सर्वच स्त्रिया पुरुषांच्या पिळदार दंड, भरदार छाती अथवा सिक्स पॅक्स कडे अधिक आकर्षित होतात असं जे साधारणपणे समजलं जातं (जे आपले सर्व सिनेमे-जाहिराती आणि सर्व खान कपूर ई. दर्शवतात) ते पूर्ण अर्थाने खरं नाही. म्हणजे हे अवयव लैंगिक दृष्ट्या आकर्षित करणारे असू शकतात पण केवळ तेच सत्य नाही. खरं तर हे बिंबवले गेलेले समज आहेत आणि ते बिंबवण्यात अनेक गोष्टींचा सहभाग असतो. आपल्या एकूणच समाजाची पुरुषप्रधान सरंजामी मानसिकता, रूढीपरंपराप्रधान आंधळे संस्कार, निव्वळ नफ्यावर आधारित बाजारू माध्यमं अशी अनेक उदाहरणं देता येतील जी हे गैरसमज पसरवण्यात आणि लोकांचं शिक्षण करण्यात आघाडीवर असतात. 
 
खरं तर प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्यामुळे अर्थातच प्रत्येक व्यक्तीची आवडही वेगळी असणार. कोणाला एखाद्याचे डोळे आकर्षित करतील, कोणाला केशरचना आवडेल, कोणाला शरीरयष्टी तर कोणाला आणखी काही. हे झालं शारीरिक आकर्षणाबद्दल ! हे आकर्षण केवळ शारीरिकच नाही तर भावनिक व वैचारिकही असू शकतं.
 
लैंगिक भावना व्यक्त करतानाही लोक अनेक मार्ग वापरतात. यात परस्परांचे हात धरणे, आलिंगन देणे, चुंबन घेणे, शरीराच्या विविध अवयवांना स्पर्श करणे, प्रत्यक्ष लैंगिक संबंध अशा अनेक क्रियांचा समावेश होतो. लैंगिक अनुभूती ही शारीरिक असू शकते तशीच ती भावनिकही असू शकते. तेच लैंगिक आकर्षणाबाबत ही लागू होतं. त्यामुळे लैंगिकदृष्ट्या एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या विशिष्ट अवयवांकडेच आकर्षित होते असे म्हणणे रास्त ठरणार नाही. लैंगिक सुख, अनुभूती ही विशिष्ट अवयवावर अवलंबून नसून ती लैंगिक ज्ञान , चांगला संवाद, निवांत वेळ व कल्पकता यावर अवलंबून असते.
 
इथे आणखी एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, आपण सर्व लैंगिकदृष्ट्या कुणाकडेही आकर्षित होऊ शकतो. प्रत्येकाचा लैंगिक कल वेगळा असू शकतो. काही व्यक्ती स्वतःच्या लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित होतात त्यांना ‘समलिंगी’ म्हणतात तर काही व्यक्ती विरुद्धलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होतात त्यांना ‘विषमलिंगी’ असे म्हणतात आणि हे पूर्णपणे सामान्य आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी स्त्री पुरुषाकडेच किंवा प्रत्येक पुरुष स्त्रीकडेच आकर्षित होईल असं काही नाही. शिवाय लैंगिक कल बदलण्याचीही श्यक्यता असते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 14 =