दोस्त, उत्तर देण्यास उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. खरं तर तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. तुमची इच्छा होत नाही तर तुम्ही त्याला तसे स्पष्ट ‘नाही’ म्हणून सांगा.आपल्याला पटत नसलेल्या गोष्टीला ठाम नकार देता येणं महत्वाचं आहे. मग ती कितीही जवळची व्यक्ती का असेना! त्यामुळे भविष्यात दोघांसाठी उद्भवू शकणारी अवांच्छित स्थिती रोखता येईल.
आता तुम्ही जी माहिती प्रश्नात दिली आहे त्या वरून तुमच्या मित्राची नेमकी काय इच्छा आहे हे मात्र समजत नाही.तुम्ही अधिक खुलासा केला तर बरं होईल. आज विज्ञानाने उपलब्ध केलेली साधनं पाहता मूल होण्यासाठी प्रत्येक वेळी स्त्री पुरुषाचा शरीर संबंध होण्याची गरज नसते. स्त्री बीज अथवा पुरुष बीजाशी संबंधित समस्या असेल तर बीज विकत घेता येते तसेच ते डोनेटही करता येते. अगदी टोकाच्या परिस्थितीत सरोगसीचा (दुसरया स्त्रीचे गर्भाशय उपयोगात आणणे) पर्याय आहे. त्याच्याही अगोदर खरे तर मूल दत्तक घेण्याचा सोपा आणि चांगला पर्याय आहे.
मित्राच्या अशा विनंतीचा परिणाम तुमच्या मैत्रीवर, तुमचे जोडीदार आणि कुटुंबावर होणार. यातील गुंतागुंत तुम्हा दोघांशी संबंधित प्रत्येक व्यक्ती कदाचित समजू शकणार नाही. शेवटी, तुमचा मित्र ह्या बाबतीत त्याच्या पत्नीवर काही अन्याय तर करीत नाही ना अशी एक शंका मनात आहे ती व्यक्त करून उत्तर इथे थाबवत आहे. आपल्या मनाला विचारून योग्य तो निर्णय घ्या.