याचं उत्तर अगदी सोप्प आहे. संभोग करुन तब्येत सुधारणार असेल तर सर्व डॉक्टरांनी केवळ संभोग करण्याचा सल्ला दिला असता. लैंगिकतेबद्दल अनेकदा गैरसमज असतात किंवा चुकीच्या निरीक्षणांवर/तथ्यांवर आधारित अनुमान काढलं जातं. तब्येत सुधारणे म्हणजे वजन वाढवणं(म्हणजे बारीक दिसत असाल तर थोडं जाड होणं) एवढाच अर्थ आहे की आरोग्यदायी शरीर बनवणं हा अर्थ असू शकतो? तब्येत सुधारणं म्हणजे आरोग्यदायी बनवण्यामध्ये अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. जसं पौष्टिक(चौकस) आहार घेणं, नियमित व्यायाम करणं आणि मानसिक ताण तणावांवर नियंत्रण मिळवणं(अनेकवेळा नविन गोष्टी शिकायला, अनुभवयाला मिळाल्यावर मानसिक तणाव कमी होतो) वरील काही गोष्टींसाठी किमान आर्थिक स्थिरता आज महत्वाची आहे.
मुलींना लहानपणापासून लग्नासाठी तयार केलं जात असतं. त्याच्या आयुष्यात महत्वाचं काय तर लग्न..! यामुळं मुलींमध्ये अशी भावना उत्पन्न व्हायला लागते की लग्न म्हणजे अंतिम सर्व. त्यामुळं जोपर्यंत लग्न होत नाही तोवर मनामध्ये अनेक चिंता असतात. जसं जास्त खाल्ल तर जाड होईल, गोरं दिसण्यासाठी काय करता येईल? मिळणारा जोडीदार कसा असेल? नोकरी करायला मिळेल की नाही? अशा एक ना अनेक चिंता लग्नापूर्वी सतावत असतात. त्यामुळं लग्न झाल्यावर स्त्रीयांना सुरुवातीच्या काळामध्ये मानसिक तणाव कमी असतात शिवाय बर्यापैकी चौकस आहार उपलब्ध होतो. त्यामुळं काही स्त्रीयांची तब्येत नक्कीच सुधारते. परंतू याचा अर्थ सर्वांची तब्येत लग्न झाल्यावरच सुधारते असा होत नाही. अनेकवेळा स्त्रीया नोकरी करायला लागल्यावर आर्थिक स्थिरता, कमी मानसिक तणाव आणि आहाराची उपलब्धता यामुळं तब्येतीमध्ये बदल दिसून येतात. हे बदल मानसिक पातळीवर देखील दिसू शकतात. लैंगिकतेचा नवा आनंद, कमी मानसिक ताण आणि आहार यामुळं एक स्थिरता मिळते. ज्यामुळं शारीरिक आणि मानसिक बदल दिसू लागतात. आणि हेच बदल मुलांमध्ये/पुरुषांमध्येपण दिसतात. पुरुष याला अपवाद नाहीत.
भारतामधील बहुसंख्य स्त्रिया अॅनिमिक आहेत. चौकस आहाराची कमतरता, मानसिक तणाव याला मुख्यतः कारणीभूत आहेत. त्यामुळं एक चांगला जोडीदार होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक पातळीवर तुमच्या जोडीदाराची काळजी घेणं फार महत्वाचं ठरतं. वजन वाढवणं हा त्यातला गौण मुद्दा आहे. स्त्रीयां केवळ संभोगासाठी नसतात हे डोक्यात फिक्स केलं तर एक चांगला माणूस(पुरुष नव्हे) बनण्याच्या दिशेने आहात.