सेक्स ही अशी गोष्ट आहे जी करणाऱ्यांनी ठरवायची असते. किती वेळा, कुणासोबत, केव्हा, कुठे आणि का हे ‘क’कार सेक्सबाबत मिळून ठरवायचे असतात. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे महिन्यातून एकदा सेक्स करण्याची कारणं काय ते तुम्हाला दोघांनाच माहित. त्यामध्ये कदाचित तुमचा काही नाइलाज असेल किंवा परिस्थिती अशी असेल की तुम्हाला इतर वेळी सेक्स करणं शक्य नसेल. किंवा तुम्ही काही कारणांनी तसं का ठरवलं असेल यामध्ये न पडता यासंबंधी काही गोष्टींबाबत विचार करा…
- तुम्हाला दोघांनाही एका दिवसात ७-८ वेळा सेक्स करणं आवडतंय का?
- एका दिवसाच्या या शारीरिक जवळिकीमुळे तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येताय का?
- तुम्ही एकत्र येता त्या दिवसाची तुम्हा दोघांनाही तितकीच ओढ वाटते का तुमच्या दोघांपैकी कुणावरही सेक्सचं दडपण येतंय?
- एका दिवसामध्ये तुम्हाला सेक्सशिवाय इतर काही गोष्टी एकमेकांबरोबर कराव्याशा वाटतात का?
- दोघांपैकी एखाद्याची इच्छा नसेल तर सेक्स न करण्याची, तसं सांगण्याची, मत मांडण्याची, मत ऐकण्याची मोकळीक तुमच्यामध्ये आहे का?
- दोघांपैकी कुणालाही सेक्सनंतर काही शाीरीरिक त्रास होत नाहीत ना? स्त्रियांमध्ये कधी कधी सेक्सनंतर लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे, मूत्रमार्गात इन्फेक्शन होण्यासारखे त्रास होऊ शकतात.
या प्रश्नांचा मागोवा दोघं मिळून घ्या. आणि त्यातूनच तुम्हाला काही उत्तरं सापडतील. जर कसलंही दडपण नसेल, त्रास होत नसेल, सुख मिळत असेल, मज्जा येत असेल, एकमेकांची ओढ वाटत असेल तर चिंता करू नका. मात्र एकत्र येणं म्हणजे फक्त सेक्स करणं असं मात्र समजू नका. कधी कधी नुसती सोबतही तितकीच सुखद, आनंददायी असू शकते.
शेवटी एवढंच… मनाचा आवाज ऐका. पण एकट्याच्या नाही…दोघांच्या.