प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsbaykoche itar vyaktishi ashlil chatting karte

Majhe baykoche itar vyaktishi ashlil chatting me tichya mobile mdhe pahile pn ti te agree karat nhiy shivay chuk mannya karat nhiye. mg me divorce ch disicion ghetle ahe tr he yogy ahe ka…plzz mla help kara….

1 उत्तर
Answer for Divorce answered 4 years ago

मित्रा,
आपली जोडीदार आपली फसवणूक करत असेल तर त्याचा त्रास होणं अगदी साहजिक आहे. पण तडकाफडकी डिवोर्सचा निर्णय घेण्यापूर्वी खालील काही मुद्द्यांचा विचार करावास असे आम्हाला वाटते. (आम्ही काही शक्यता मांडत आहोत.)
१. बायकोच्या मोबाईलमध्ये तू बघितलेले चॅटिंग तिनेच केले आहे याबद्दल तुला खात्री आहे का? दुसऱ्या कोणीतरी मोबाईल वापरला असल्याची किंवा मुद्दाम कोणीतरी हे केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विना आधार घेतला जाणारा संशय तुझ्यासाठी, तुझ्या बायकोसाठी आणि एकूणच तुमच्या नात्याला मारक ठरू शकतो.
२. दुसरं म्हणजे, समजा, तुझ्या बायकोनेच तशाप्रकारचे चॅटिंग केले असेल, तर ती व्यक्ती तिच्या ओळखीची असेलच आणि प्रत्यक्ष देखील तिचे त्या व्यक्तीसोबत संबंध असतीलच असे नाही. आजकाल अनेकजण सहज, वेळ जात नाही म्हणून, एकटेपणा घालवण्यासाठी व इतरही अनेक कारणांमुळे अशाप्रकारे सोशल मिडियाचा वापर करताना दिसतात. बऱ्याचदा लोक फेक अकौंट काढून मुलींना फ्रेंड रिक़्वेस्ट पाठवणं, त्यांना फसवणं असे प्रकार करताना दिसतात. खरंतर अशा माध्यमांचा वापर लक्षपूर्वक करावा व त्याच्या विळख्यात आपण अडकणार नाही याचे भान प्रत्येकाला असायला हवे. पण काहींना ते लक्षात येत नाही आणि त्याचा गैरफायदा घेतला जातो. अशी जर परिस्थिती असेल, तर तुझी बायको अशा परिस्थितीमध्ये अडकली आहे का? असेल तर का अडकली? याचा विचार करून त्यावर मार्ग काढले तर अधिक चांगले. कोणताही अविर्भाव न आणता तू जर तिला यातून बाहेर काढायला मदत केली तर तुमचं नातं अधिक घट्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३. मला वाटतं कोणताही निर्णय घेताना, ‘हा झालेला प्रकार’ वगळता तुमचे एकूण नाते कसे आहे? याचा विचार करावा.
४. तुझी बायको जर मान्य करत नसेल, तर त्यावर विश्वास ठेवून, काही दिवस तुला देखील हे सगळं विसरून किंवा तात्पुरतं बाजूला ठेवून, खरंखोट करण्यात जास्त शक्ती वाया न घालवता तिला अजून एक संधी देता येईल का? खरंखोटं करण्यात आहे ते नातं आणखी गुंतागुंतीचं होऊ शकतं. नात्याला आणखी थोडा वेळ देता येईल का? वारंवार जर असा प्रकार घडत असेल तर वेगळे होण्याचा मार्ग कधीही मोकळा आहेच.
५. हा प्रकार खरंच घडला असेल तर ते मान्य करून बायकोने तुझी माफी मागितली किंवा तू म्हणतोस तसे मान्य केले तर तू तिला माफ करून, त्याचा नात्यावर परिणाम होऊ न देता ( मानसिक व शारीरिक हिंसा न करता) नातं पुढे चालू ठेवण्यास तयार आहेस का?
६. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या बायकोचे या एकूण प्रकारावर तसेच या डिवोर्सच्या निर्णयावर काय म्हणणे आहे हे हे तू विचारात घेतले आहेस का? नातं दोघांनी मिळून जोडले तर वेगळे होताना देखील दोघांची मते लक्षात घेणे गरजेचे आहे.
७. आपल्या सामाजिक सांस्कृतिक परिवेशात ‘लग्नाचे नाते’ तोडून डिवोर्स घेणे याचे तुझ्यावर आणि तुझ्या बायकोवर, मुले असतील तर मुलांवर आणि दोन्ही कुटुंबांवर काही ना काही परिणाम होणार आहेत. त्याचा देखील तू विचार करावास.
८. ओढूनताणून एकत्र राहून लग्न टिकवलेच पाहिजे असे आम्हाला अजिबात म्हणायचे नाही. एकत्र समाधानाने, आनंदाने राहता येत नसेल कोणत्याही नात्यातून वेगळे होणे कधीही चांगलेच. फक्त हा निर्णय घेण्यासाठी कोणतीही शहानिशा न करता ‘मोबाइल मध्ये असणारे चॅटिंग’ हे कारण पुरेसे नाही. विचारांती व दोघांनी मिळून, त्यांच्या होणारे परिणाम व त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेऊन, सर्वांगीण विचार करून निर्णय घ्यावा इतकेच.
सगळयात महत्वाचं हे की, जर ते चॅटिंग तुझ्या बायकोने केले असेल असं आपण घटकाभर मानूया… तर ते का केले असेल? तुमच्या नात्यामध्ये कुठे तरी काही तरी कमी असावी असं वाटत नाही का? ते काय कमी आहे याचा शोध घेणं हे डिवोर्स घेण्यापेक्षा जास्त गरजेचे वाटत नाही का? प्रत्येकवेळी माणसाला फक्त लैंगिक समाधान हवे असते असे नाही तर काही वेळेस मानसिक आधाराचीही गरज असतेच ना? कुणीतरी आपल्याला छान म्हणावं, आपली स्तुती करावी, आपल्याशी साधं फ्लर्ट करावं, काळजीने विचार पुस करावी, असं वाटू शकत नाही का? अन जर ही गरज आपल्या जोडीदाराकडून पूर्ण नाही झाली अन कुणीतरी ही कसर भरुन काढत असेल तर मग चुक कुणाची? तेव्हा आधी आपल्या नात्यात काय काय कमी आहे हे शोधा त्याने तुमचं अजुन छान बहरेल …
आम्ही फक्त शक्यता, पर्यायी विचार सुचवू शकतो. शेवटी तुझ्या नात्याबद्दल, एकूण परिस्थितीबद्दल तुला जास्त माहिती आहे त्यामुळे शेवटी निर्णय तुझा. निर्णय घेताना तुला या उत्तराची मदत होईल अशी आशा आहे. आणखी काही शंका असेल तर नक्की विचार. तुला सदिच्छा !

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 9 =