मी एक शिक्षक आहे.
8वी ते 11वी च्या मुला मुलींना शारीरिक आकर्षण म्हणजेच प्रेम वाटते आणि इंटरनेटद्वारे किंवा अन्य मार्गांनी त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जाते. तर त्यांना योग्य माहिती कशी द्यावी? यामुळे त्यांचे शिक्षणात दुर्लक्ष होते व मानसिक विकासही योग्य होत नाही
त्यांना कशा प्रकारे समजवावे?
मुलं आणि मुली वयात येण्याच्या आणि त्या नंतरच्या काळात त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागतं. सध्याच्या काळात मुलींचं वयात येण्याचं वय 9 वर्षं धरलं जातं आणि मुलांचं 11. त्यामुळे अगदी चौथा पाचवीपासूनच एकमेकांबद्दल काही तरी ओढ वाटू लागते असं दिसून येत आहे. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये नक्की कुणाकडे मन आणि शरीर आकर्षित होईल हे सांगता येत नाही. सिनेमातले हिरो, शेजारी राहणारी एखादी मुलगी, शाळेतले शिक्षक, शिक्षिका, रोज जाता येता भेटणारी कुणी व्यक्ती अशा कुणाही बाबत शारीरिक आणि मानसिक आकर्षण वाटू शकतं. सर्वात आधी हे वाटतं आणि तसं वाटणं म्हणजे भलतंच काही तरी नाही हे मान्य करू या.
मुलांना नावं न ठेवता आणि आकर्षण, प्रेम या थिल्लर गोष्टी आहेत असं न मानता मुलांशी बोललं, त्यांना खरी, शास्त्रीय आणि सकारात्मक माहिती दिली तर मुलं चुकीच्या, हिंसक मार्गाकडे जात नाहीत. त्यासाठी लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने बोलणं महत्त्वाचं आहे.
मुलांशी काही गोष्टी नक्की बोलता येतात –
- शारीरिक आकर्षण आपल्याला कुठे घेऊन जातंय हे आपण ओळखू शकतो आहोत का?
- त्याची पुढची पायरी शारीरिक संबंध आहेत का, असे संबंध म्हणजे काय?
- स्पर्श वाईट नसतो पण तो संमतीने आणि मोकळेपणाने झाला, केला पाहिजे.
- टीव्ही, इंटरनेट, फिल्म्स, सिनेमा, गाणी या सर्वांतून शारीरिक आकर्षण आणि शरीर संबंधांविषयी अनेक गोष्टी पहायला मिळत असतात. त्या सर्वांचा अर्थ काय हे समजून घेऊन मगच ते योग्य का अयोग्य ते ठरवा.
- काहीही सिद्ध करण्यासाठी, कुणाशी पैज जिंकण्यासाठी, प्रेम सिद्ध करण्यासाठी, करायलाच पाहिजे म्हणून कुणाशी शारीरिक संबंध असावेत हे आवश्यक नाही. प्रेम व्यक्त करण्याचं आणि एकमेकांना जवळ आणणारं अतिशय सुंदर नातं शारीरिक संबंधांमधून निर्माण होऊ शकतं. पण त्यासाठी एकमेकांची संमती, विश्वास आणि एकमेकांबद्दल कम्फर्टेबल असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.
- आकर्षण कुणाहीबद्दल वाटू शकतं. पण म्हणून समोरच्याच्या मनातही तेच असेल असं नाही हे स्वीकारायला पाहिजे. खास करून मुलांना हे जास्त छान समजावून सांगायला पाहिजे.
मुला-मुलींशी स्वतंत्रपणे हे विषय बोलता येतात. अधिक माहितीसाठी शरीर साक्षरता कार्यक्रमाविषयी अधिक वाचा.
पालकांना आणि खास करून शिक्षकांना भेडसावणारी ही एक नेहमीची 'समस्या' आहे. अर्थात एकमेकांकडे आकर्षित होणं ही खरंच समस्या आहे का हो? निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे घडत आलंय आणि घडत राहणारच. आता आकर्षण काय आणि प्रेम काय, नातं कशाला म्हणायचं आणि या सगळ्यामध्ये आपल्याला काय वाटतंय हे कसं ओळखायचं हे शोधणं वयात येणाऱ्या आणि तरूण मुला-मुलींसाठी महत्त्वाचं आहे. एका महत्त्वाच्या बाबीवर बोलू या. <br><br>मुला-मुलींना कोणत्या वयात ही माहिती मिळावी असं तुम्हाला वाटतं? आपलं मत आम्हाला नक्की कळवा.