तुमच्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे पण तितकंच अवघड. प्रथम आपण काही बेसिक रुल्स बद्दल बोलूयात. उत्तम आणि आनंददायी लैंगिक संबंधांसाठी काही गोष्टी उपकारक ठरतात. उदा. विश्वास, संमती, खाजगीपणा, आदर, प्रेम आणि सुरक्षितता ह्या पैकी अधिकाधिक गोष्टी जिथे जुळून येतील तिथे कुणालाही, मग ती स्त्री असो वा पुरुष अथवा समलिंगी व्यक्ती, आनंदी लैंगिक संबंधांचा अनुभव येऊ शकतो. या गोष्टींचा अभाव असेल आणि इतर कितीही ‘सोई’ असतील तर कदाचित वेगळी स्थिती बनेल.
आता तुमच्या प्रश्नाचा रोख ज्याकडे आहे त्याबद्दल. मुली किंवा स्त्रियांमधील लैंगिक संबंधांची इच्छा वाढवण्यासाठी कुठलीही गोळी, इंजेक्शन अथवा जडीबुटी उपलब्ध नाही. तशी ती पुरुषांची इच्छा वाढवण्यासाठीही नाही. जो आहे तो निव्वळ पुरुषी आणि सरंजामी मानसिकतेवर आधारलेला बाजार जिथे केवळ वस्तू विकण्यासाठी खोट्या कल्पनांचा वापर केला जातो. त्यामुळे या कल्पनांना अगोदर बाजूला सारूयात.
या शिवाय, मुलींना जबरदस्ती केलेली आवडते, मुलींच्या नकाराला होकार समजावा, पुरुषाचे आतडे विशिष्ट संख्येचे असावेत, पिळदार मिशा असाव्यात किंवा बलदंड बाहू असावेत, जाहिरातीतला डिओ किंवा परफ्युम वापरावा हे ही पूर्ण खोटे आहे. तोंडावर आपटण्याचीच श्यक्यता अधिक.
ह्यावर कोणी म्हणेल पण पुरुषांना हेच जमतं. तुम्ही आणखी काही सांगू नका बुवा.. असं असेल तर पुरुषांनी रिमोट घेऊन टीवी सामोरच बसावे.
असंख्य मार्ग आहेत तुमच्या जोडीदाराची इच्छा जागृत करण्याचे. तुम्हाला चार पावलं पुढं जावं लागेल. म्हणजे तिचा आवडता रंग तुम्ही लक्षात ठेवू शकता, तिच्या करिअरबाबत आस्थेने चौकशी करू शकता, सहज पण हेतुपूर्वक केलेला एक फोन, पाळलेली वेळ तुम्हाला मदतकारक ठरू शकते. तुम्ही एकत्र राहत असला तर खुर्ची-सोफ्यावरून वरून उठावे लागेल, भांडी घासण्यात मदत करावी लागेल, अंथरून टाकावे लागेल. एखादा प्रेमाचा कटाक्ष पुरेसा ठरू शकतो ह्याची कल्पना आहे का तुम्हाला! पहा तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला आणखी काही मार्ग सुचवते का…
हे ही वाचून पहा…