मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत तिची मासिक पाळी येऊन गेल्या नंतर 2-3 दिवसाने सेक्स केला होता. प्रोटेकशन वापरले नसल्याने मी तिला i-pil टॅब दिली होती, त्यानंतर तिला 10 दिवसाने लगेच परत मासिक पाळी आली. याच काय कारण असू शकत?
सर्वप्रथम तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरी. आता वळूयात तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे. i-pill मध्ये काही संप्रेरकांचा (हार्मोन्स) समावेश असतो ज्यामुळे मासिक पाळी लवकर येते आणि गर्भधारणा रोखली जाते. i pill खाल्याने मासिक पाळी लवकर येत असल्याने सध्या काळजी करण्याचे काहीही कारण नाही. मात्र गर्भनिरोधक म्हणून i pill चा नेहमी वापर केला तर प्रत्येकवेळी पाळी लवकर येण्याची शक्यता असते आणि यामुळे मासिक पाळीचक्र बिघडते. या गोळ्या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही. या गोळ्यांमध्ये असलेल्या संप्रेरकांचे (हार्मोन्स) शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. कधीकधी हे दुष्परिणाम गंभीर स्वरूपाचेही असू शकतात. शिवाय i- pill मुळे एच. आय. व्ही किंवा इतर लिंग सांसर्गिक आजारांच्या संसर्गापासुनही संरक्षण मिळत नाही. कंडोम हे अतिशय सुरक्षित गर्भनिरोधक आहे. आपण हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की नको असणारी गर्भधारणा टाळणं ही फक्त एकट्या स्त्रीची जबाबदारी नसून ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे.