प्रत्येकवेळी कीस केल्यावर मुलीची काय मुलाची काय किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची सेक्स करण्याची इच्छा होईलच असे सरसकट म्हणता येणार नाही. मुळात समोरच्या व्यक्तीची कीस करण्याची इच्छा आहे की नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. इच्छेविरुद्ध साधा स्पर्श करणे हा कायद्याने गुन्हा आहे मग कीस तर पुढची गोष्ट आहे आणि सेक्स तर त्याहून नंतरची. थोडक्यात म्हणण्याचा अर्थ हा की कोणत्याही लैंगिक क्रियेत दोन्ही जोडीदारांची इच्छा, संमती आणि सुरक्षितता महत्वाची.
समोरच्या स्त्रीची संमती आहे आणि तिला लैंगिक उत्तेजना, लैंगिक आनंद मिळावा यादृष्टीने तुम्ही हा प्रश्न विचारत असाल तर त्यासाठी पुढील उत्तर देत आहे.
लैंगिक इच्छा आणि उत्तेजना या दोन्ही मेंदूतून नियंत्रित होतात. लैंगिक सुखाची शारीरिक व भावनिक अनुभूतीही मेंदू करतो. प्रत्येकाच्या मेंदूची जडण-घडण वेगळी असल्यामुळे प्रत्येकाचा लैंगिक अनुभव हा स्वतंत्र असतो. सेक्स किंवा खरं तर अशी कोणतीच क्रिया नाही ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडी सारख्या असतील. प्रत्येक व्यक्तीला कशाने छान वाटतं हे त्या व्यक्तीलाच माहित असतं. सेक्स किंवा प्रेम ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये एकमेकांचा, एकमेकांच्या आवडी-निवडींचा विचार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल बोलायला पाहिजे, मतांचा आदर ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या टाळायला पाहिजेत. सेक्समध्ये आनंद मिळवायचा असेल तर हे आवश्यक आहे. स्त्रीच्या शरीरात अनेक अशा जागा आहेत, जिथे हळुवार स्पर्श केल्याने लैंगिक उत्तेजना मिळू शकते. संभोगाच्या आधी हळुवारपणे शरीराला स्पर्श करणे, एकमेकांचा सहवास सुखाचा वाटेल अशा रितीने संवाद साधणे आणि जेव्हा संभोगासाठी मनाची आणि शरीराची तयारी होईल तेव्हा संभोग करणे या सुखकर संबंधांसाठी आवश्यक बाबी आहेत. स्तनांना स्पर्श केल्याने तसंच स्त्रीच्या योनीमार्गाच्या वर असणाऱ्या क्लिटोरिस या अवयवाला स्पर्श केल्याने लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते. बाकी गोष्टी तुमच्या तुम्ही शोधून काढा. त्यात जास्त मजा येईल.
एक गोष्ट मात्र नक्की. आपण केवळ सेक्स करण्यासाठी वापरलं जाणारं, जोडीदाराची शारीरिक गरज भागवणारं शरीर आहोत, आपल्या भावभावनांचा, सुखाचा विचार सेक्समध्ये नाही अशी भावना मुलींच्या मनात येत असेल तर ते त्यांना नक्कीच आवडणार नाही. मर्जीविरुद्ध, जोडीदाराला इच्छा झाली म्हणून सेक्सची जबरदस्ती मुलींना आवडणार नाही. किंवा एखाद्या फिल्ममध्ये पाहिलेली क्रिया मर्जीविरुद्ध करायला मुलींना आवडेल असंही वाटत नाही. आणि हेच सगळं पुरुषाच्या बाबतीतही तितकंच खरं आहे. अनेक मुलांना असं वाटतं की जोपर्यंत मुलीच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत तिला आनंद मिळत नाही. असले समज डोक्यातून काढून टाका.
प्रेमाची पुढची पायरी म्हणून किंवा निव्वळ शारीरिक ओढीसाठीही सेक्स केलं जातं. एकमेकांशी बोला, कशाने सुख मिळतंय आणि कशाचा त्रास होतोय ते शोधा, तुमचं उत्तर तुम्हाला नक्की सापडेल.