अभिनंदन ! कोणीतरी आपल्याला आवडणं, आपण कोणालातरी आवडणं. खरंच खूप छान अनुभव असतो ! एखाद्या व्यक्तीविषयी प्रेमाची भावना वाटणं अगदी नैसर्गिक आहे. पण समोरच्या व्यक्तीच्या मनात देखील तिच भावना आहे का? हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणूनच ती तुम्हाला ओळखत नसताना तिच्या मनात देखील तिच भावना आहे की नाही हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. शिवाय तुम्ही या नात्याकडे कसे बघता याचा विचार केला आहे का? आपल्याला अनेक गोष्टी/व्यक्ती आवडू शकतात पण आवडणे आणि नाते प्रस्थापित करणे यात फरक आहे. नातं आलं की त्यात भावनिक गुंतागुंत, कमिटमेंट या गोष्टी येऊ शकतात आणि नात्यात असणाऱ्या दोघांना त्याची स्पष्टता असणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात होणारा गुंता, प्रॉब्लेम्स टाळता येतील.
मी सुचवेन तुम्ही आधी त्या मुलीशी ओळख करून घ्या. छान मैत्री होऊ द्या तुमच्यात. हळूहळू तुम्ही दोघेही कोणते नाते प्रस्थापित करू इच्छिता की नाही याची स्पष्टता येईल. मग काय ते ठरवा. आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला किंवा तिला थांबायचे असेल तर त्याचा आदर ठेवा. म्हणजेच ती जर ‘नाही’ म्हणाली तर ते देखील स्वीकारा. आणि नो मीन्स नो बरं का? ती नाही म्हणाली तर तिला त्रास देऊ नका.
प्रेम ही अतिशय आनंददायी, सुखावणारी भावना आहे. त्याचा अनुभव घ्या पण समोरच्या व्यक्तीचा आदर ठेऊन आणि मत लक्षात घेऊन.
तुम्हाला खूप सदिच्छा !!