घाबरु नका. मासिक पाळी मागे पुढे होऊ शकते. अनेकवेळा जास्त प्रवास, दग दग, औषोधपचार किंवा अगदी मानसिक ताण तणावामुळंदेखील मासिक पाळीचं चक्र मागे पुढे होतं. यात चिंता करण्यासारखं काहीही नाही. वयात आल्यावर सुरुवातीच्या काळामध्ये मासिक पाळी चक अनियमित असू शकतं. परंतू एकदा नियमित चालू झाल्यानंतर थोड्याफार दिवसाच्या फरकाने मासिक पाळी नियमित येते. नियमित तारखेपेक्षा खूप जास्त दिवस होत असतील तर प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर तुमचे शरीर संबंध(सेक्स) झाले असतील आणि त्यामध्ये योग्य ते गर्भनिरोधक वापरलं गेलं नाही तरच गर्भधारणा होण्याची शक्यता असते. शरीरसंबंधामुळं गर्भधारणा झाली असावी असा तुमचा अंदाज असेल तर बाजारामध्ये रु. ५० पासून प्रेगनन्सी किट उपलब्ध आहेत. या किटमुळं घरच्या घरी गर्भधारणेची तपासणी करता येते. किटच्या वापरासंबंधीची माहिती त्यावर लिहिलेली असते.
हे नेहमी लक्षात ठेवा, शरीरसंबंध ठेवताना योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करणं ही स्त्री-पुरुष दोघांचीही जबाबदारी आहे. जोडीदार गर्भनिरोधकं वापरत नसेल तर त्याला परिणामांची कल्पना द्या अन्यथा असे संबंध टाळू शकता.