मुलीचं आयुष्य केवळ सेक्सशी संबंधील किंवा अवलंबून असतं म्हणणं तितकसं खरं नाहीये. समाजात पुरुषसत्ताकता नावाची एक व्यवस्था आहे. ही पुरुषसत्ताकता पुरुष आणि स्त्री दोघांमध्ये दिसून येते. (ही व्यवस्था दोघांनाही माणूसपण जपण्यापासुन लांब घेऊन जाते.) यामध्ये पुरुष्यांच्या सोयीने नियम आणि धारणा(कॉन्सेप्ट) जाणीवपूर्वक तयार केल्या जातात. जसं समाजामध्ये पुरुषदेखील भांडणं करतात, एकमेकांचे खून करतात पण समाजात धारणा हीच आहे की बाईच बाईची शत्रू असते. पुरुष पुरुषांचे शत्रू असतात असं कधी ऐकायला मिळत नाही. तु सांगितलेलं वाक्यदेखील याच पुरुषसत्ताक मानसिकतेमधून आलेलं असावं. याच पुरुषसत्ताक मानसिकतेचं उदाहरण म्हणजे स्त्रियांकडे केवळ सेक्ससाठीच पाहिलं पाहिजे. एखाद्या वस्तूप्रमाणे त्यांना वापरलं पाहिजे. लहानपणापासून मुलींना कित्येकदा हेच सांगितलं जातं की तू काचेचं भांडं आहे. एकदा गेलेली इज्जत परत येत नाही. मुलींनी लग्न झाल्यावर मुलाच्याच घरी गेलं पाहिजे. ही सर्व पुरुषसत्ताक विचारसरणीची उदाहरणं आहेत. (खरतर यांनां मोडणं तितकसं अवघड नाही.)
तुला ज्या मुलीने हे सांगितलं आहे त्यातही पुरुषसत्ताकता आहे. आपल्या समाजामध्ये इज्जत फक्त बाईला आणि तिही योनीमध्ये आहे असं सांगितलं जातं. पुरुषांनी कितीहीवेळा कोणाहीसोबत संभोग केला तरी त्याची बदनामी होताना खूपवेळा दिसत नाही. मात्र एखाद्या मुलीने किंवा बाईने चुकूनही लैंगिक कृती केली की त्याचे अनेक विकृत अर्थ लावले जातात. लैंगिक गोष्टींचे परिणाम मुलींनाच जास्त भोगावे लागतात. जसं गर्भधारणं होणं, खाजगीमध्ये केलेल्या गोष्टींचे व्हिडीओ प्रसारित करणं याचे परिणाम मुलांपेक्षा मुलींनाच जास्त भोगावे लागतात. हे खरतर चुकीचं आहे. पण या वास्तविकतेमुळे मुलींची अशी वाक्य येणं स्वाभाविक आहे. कोणीही कोणाच्याही लैंगिकतेवर नियंत्रण ठेवणं चुकीचच आहे. ज्या समाजात अशा लैंगिकतेवर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था आहे ती आता मोडीत काढणं गरजेचं आहे. एक संवेदनशील माणूस बनण्याकडे आपला कल असला पाहिजे.
चित्र बदलतानाही दिसत आहे. स्त्रियांनी त्यांच्या शिक्षणाचा आणि नोकरीचा अधिकार लढून मिळवला आहे. चूल आणि मूल या संकल्पना मुली आता तोडू लागल्या आहेत. लैंगिकतेवरची बंधनही जुगारुन दिली जात आहेत. यात तु स्वतः कुठ आहे हे तपासून पहायला हवं. ही बंधनं तोडण्यामध्ये की पाळण्यामध्ये.