प्रश्नोत्तरेमाझे लग्न एका अश्या मुलीबरोबर ठरले आहे की तिचे वयात येण्यापूर्वीच एका मुलाबरोबर शरीरसबंध आलेले आहेत. मी काय करू? लग्न करू की नको?
1 उत्तर

तुमचा प्रश्न तसा नाजूक आणि महत्त्वाचा आहे. तुम्ही तो विचारलात हे उत्तम. त्याचं उत्तर जाणून घेताना आधी हे लक्षात घ्या की या यामध्ये दोन भाग आहेत –

  • तुमचं जिच्याबरोबर लग्न ठरलं आहे तिचे पूर्वी आलेले शरीरसंबंध
  • तुम्ही तिच्याशी लग्न करावं का नाही याबाबत तुमचा उडालेला गोंधळ

या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपल्या समाजात कौमार्याला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि खास करून मुलींबाबत तर हे नियम अधिकच कडक केले गेले आहेत. लग्नाआधी मुलीने कुणाशीही संबंध ठेऊ नयेत अशी अपेक्षा समाज ठेवतो. आणि त्यामुळे मुलीच्या स्त्रियांच्या इज्जतीबाबत अनेक धारणा तयार झाल्या आहेत. मुलीची इज्जत म्हणजे काचेचं भांडं, एकदा तडा गेला की जुळत नाही… वगैरे वगैरे… मुलांच्या बाबत मात्र असे नियम, अशा धारणा ऐकिवात नाहीत. खरं तर वयात येण्याआधी किंवा नंतर आलेले शरीरसंबंध तेव्हा आले आणि संपले. त्याचा मुलीच्या उर्वरित आयुष्याशी कसा संबंध लावायचा? ती जशी होती तशीच आहे. मुलगी म्हणजे तडा जायला, खराब व्हायला भांडं किंवा वस्तू नाही.
मोकळेपणाने विचार केला तर पूर्वी जे घडून गेलं आहे त्याचा आता काय संबंध? जी गोष्ट आधी घडून गेली ती तिथल्या तिथे संपून जाते. त्या घटनेचा आणि आता तुमच्याशी ठरलेल्या लग्नाचा एकमेकाशी काहीच संबंध नाही. तिची जर लग्नाला तयारी असेल आणि तिच्या आयुष्यातली ही घटना मागे टाकून ती पुढे जायला तयार असेल तर तुम्ही का कोड्यात पडला आहात?
तिच्या आधीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा संबंध तुम्ही तुमच्या लग्नाशी लावू नका. तुम्हाला ती आवडत असेल, तिच्याबरोबर संसार करण्याची, आयुष्य सुरू करण्याची तुमची इच्छा असेल तर लग्न करा. मात्र हे करताना तुमच्या मनातल्या शंकांची जळमटं आताच स्वच्छ करा. पुढच्या आयुष्यात तिच्या भूतकाळावरून दोषारोप न करण्याची, तिच्यावर संशय न घेण्याची आणि तिला आदराने वागवण्याची जबाबदारी तुमची आहे. तिच्यात काहीही कमी नाही, किंवा तिने कसलंही पाप केलेलं नाही. जे घडलं ते तिथेच संपलं असं मानून तुम्ही संसार करणार असाल तरच लग्नाचा निर्णय घ्या. तसं तुम्हाला जमणार नसेल आणि या घटनेचं भूत तुमच्या मानेवर कायम राहणार असेल तर लग्नाचा निर्णय लांबणीवर टाका किंवा स्वतःला थोडा वेळ द्या. अशा संशयाच्या, शंकेच्या वातावरणात, नात्यात राहणं तिच्याही आणि तुमच्याही दृष्टीने चांगलं नाही.
तुम्ही समजुतीने निर्णय घ्याल आणि तुमच्या भावी वधूचा स्वीकार मोकळेपणाने, खुल्या मनाने आणि आदराने कराल अशी आशा आहे. तुमच्यासारखा समजूतदार जोडीदार मिळाला तर तीही नक्कीच सुखी होईल.
लग्नाला बोलवलंत तर आम्ही येऊच. नाहीच तर फोटो तरी पाठवा…
लिहीत रहा…

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 4 =