सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकरात लवकर उपचार घ्या. अंगावर काढू नका. आपल्या समाजात अनेक स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात.
मायांग/ अंग बाहेर येणे म्हणजेच गर्भाशय मुळच्या जागेवरून खाली येणे याविषयी थोडंस विस्तारानं समजून घेऊयात.
अंग बाहेर येणे (Prolapse of the Uterus )
अंग बाहेर येणे म्हणजे गर्भाशय त्याच्या मूळच्या जागेवरुन खाली येणे, खालच्या दिशेने घसरणे. अंग बाहेर येण्याचे तीन टप्पे आहेत. त्यानुसार बाईला काही लक्षणं जाणवू शकतात.
पहिल्या टप्प्यात गर्भाशयाच्या पिशवीचे तोंड त्याच्या नैसर्गिक जागेहून थोडे खाली सरकते. याच्या जोडीला ओटीपोटात रग लागणे, कंबरदुखी, अंगावरुन जास्त पांढरे जाणे, शारीरिक संबंधांच्या वेळी त्रास ही लक्षणं दिसतात.
दुसऱ्या टप्प्यामध्ये गर्भाशय योनीमार्गामध्ये येते. यामुळे ओटीपोटात जड वाटू लागते. काही तरी निसटल्यासारखे, सुटत असल्यासारखे वाटत राहते.मायांगामध्ये सतत काही तरी असल्यासारखे वाटते. ओटीपोटात ओढ लागल्यासारखे दुखते. मायांगावर ताण पडल्यासारखे वाटते. मांड्यांना रग लागते. अंगावरुन पांढरे जाते. शरीरसंबंध करणे अवघड जाते किंवा संबंध करताना खूप दुखते.
पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये व्यायाम आणि औषधं घेऊन अंग मूळ जागी जायला मदत करता येते.
तिसऱ्या टप्प्यामध्ये गर्भाशय योनीच्या बाहेर दिसायला लागते. विशेष करुन खोकला आला किंवा दोन पायावर बसले की अंग योनीच्या (मायांगाच्या) बाहेर पडलेले दिसते. याच्या जोडीने ओटीपोटात जड वाटणे, चालताना दोन मांड्यांमध्ये काहीतरी आल्यासारखे वाटणे, ओटीपोटात आवळून धरल्यासारखे दुखणे, कंबर दुखणे, अंगावरुन जास्त प्रमाणात पांढरे जाणे आणि संबंधांच्या वेळी खूप दुखणे अशी लक्षणे दिसतात.या टप्प्यामध्ये गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागते.
अंग बाहेर येण्याची मुख्य कारणे
बाळंतपणाच्या वेळी कळा यायला लागल्यावर लगेच बाईने जोर केला तर गर्भाशयाच्या स्नायूंवर ताण पडतो. गर्भाशयाचं तोंड उघडेपर्यंत जोर लावू नये. तसे केल्यास स्नायू सैल पडतात. बाळंतपण झाल्यावर किंवा गर्भपातानंतर बाईने किमान दीड महिना विश्रांती घ्यायला हवी. या काळात कोणतीही जड कामं करु नयेत. बाळंतपणानंतर लगेच कामाला सुरुवात केल्यास गर्भाशयाच्या स्नायूंवर ताण पडतो आणि त्यामुळे गर्भाशय मूळ जागी येणे अवघड होते. परंतु बायकांना अशी विश्रांती मिळत नाही त्यामुळे गर्भाशयावर ताण येतो.
लहान वयामध्ये गरोदर राहणे, एकामागोमाग एक अनेक बाळंतपणं होणं, मुलगा व्हावा यासाठी सततची बाळंतपणं किंवा वारंवार गर्भपात ही देखील अंग बाहेर येण्याची कारणं आहेत.
तुम्ही कोणत्या टप्प्यामध्ये आहात ते ओळखा त्यानुसार उपचार घ्या. यासाठी स्त्रीरोग तज्ञांची मदत घ्या. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये करावयाचा एक व्यायामाची पद्धती खाली दिली आहे.
https://letstalksexuality.com/question/kegel-exercise/
लवकरात लवकर उपचार घ्या. काळजी घ्या.