खरं तर ह्यात काळजीचं काही कारण नाही. अनेक मुलांमध्ये किशोर वयात प्रवेश करत असताना हे बदल दिसून येतात आणि काळासोबत ते निघून ही जातात.
आपल्या अवयवांचं रूप, रंग, आकार कसा/किती असावा हे सर्व जनुकं, अनुवंशिकता, संप्रेरकं, पर्यावरण ई. गोष्टी ठरवत असतात. त्यातील काही गोष्टी जन्मतःच ठरतात तर काही जन्मानंतर. संप्रेराकांबद्दल (हार्मोन्स) तुम्ही ऐकलं असेलच. मुलगा किंवा मुलगी वयात येत असताना त्यांच्या शरीरात काही बदल दिसायला सुरुवात होते त्याला हा संप्रेरकांचा प्रभावच कारणीभूत असतो. उदा. मुलींच्या शरीराला विशेषतः छातीला जी गोलाई प्राप्त होते ती ह्या संप्रेरकांमुळेच. शरीराला गोलाई प्राप्त करून देणारी ही संप्रेरकं मुलांच्या शरीरातही असतात पण खूप कमी प्रमाणात. कधी कधी त्यांचे प्रमाण अधिक असेल तर किशोरवयात हे बदल होत असतना मुलांची छाती थोडी मोठी दिसू शकते. त्यावर खरं तर काही उपाय करण्याची आवश्यकता नाही कारण बहुतेकवेळी एक ते दोन वर्षात ही अतिरिक्त वाढ आपोआप निघून जाते. पण तरीही तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं असेल तर तुमच्या नेहमीच्या डॉक्टरला सुरुवातीला भेटा. ते योग्य निदान करुन पुढील डॉक्टरांकडे तुम्हाला पाठवू शकतील.
आणखी एक. यात काळजीचं किंवा कमीपणा वाटून घेण्याचं किंवा लाजण्याचं काही कारण नाही. समाजातील सौंदर्याच्या, बाईपणाच्या, पुरुषत्वाच्या, मर्दानगीच्या संकल्पना ह्या अनेकदा खोट्या, फसव्या असतात. त्या तशा खूप जाचक आहेत आणि त्याचा त्रास प्रत्येकाला होतो हे खरं आहे. पण समाजच्या अशा ढोंगी संकल्पनांना फाट्यावर मारण्याची ताकद आपण प्रत्येकाने कमवायला हवी. तुम्ही जसे आहात तसे खूप छान आहात, एकमेव (युनिक) आहात.. सो चिल…