जसजसं आपण वयात येतो तसतसं आपल्या मनात कुणाबद्दल तरी आकर्षण निर्माण व्हायला लागतं. कुणी तरी आवडू लागतं, कुणी तरी भेटावं असं वाटायला लागतं. कुणाची तरी स्वप्नं पडायला लागतात. या वयात बहुतेक सगळ्याच मुला-मुलींना हे होतं मात्र प्रत्येकाला वाटायलाच पाहिजे असा काही नियम नाही. कुणी तरी आपल्याकडे पाहावं, आपल्याला सतत भेटावं, बोलावं असं वाटायला लागतं आणि ते नैसर्गिक असतं. कसं आहे, आपल्या शरीरात आणि मनात जे बदल होतात त्यामुळे हे आकर्षण वाढू लागतं. सतत आपल्याला आवडणारी व्यक्ती, तिचं बोलणं, राहणं, तेच मनात येत राहतं. कधी-कधी तिचा स्पर्श व्हावा, तिला स्पर्श करावा, असंही वाटतं. ह्यात वाईट काही नाही. तसंच प्रत्येकाला हे होईलच असा काही नियम पण नाही.
पण आपण प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं? एखाद्याला आपण आवडतो, हे त्या व्यक्तीच्या वागण्यातून, बोलण्यातून समजतं. तिच्याशी किंवा त्याच्याशी बोलणं, त्याचा किंवा तिचा आवाज ऐकणं, स्पर्श होणं या सगळ्या गोष्टींनी आपण सुखावतो. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला भेटायला आपण आतुर होतो, तो किंवा ती नाही भेटली तर अस्वस्थ होतो, दुःखी होतो. असं तुम्हालाही होत असेल. प्रेमात पडणं आणि आपण कुणाला तरी आवडणं या खूप छान गोष्टी आहेत. महत्वाचं म्हणजे प्रेमात पडायचं तर दोघंही एकमेकांना मनापासून आवडायला पाहिजेत.
एखाद्या मुलीला जर एखादा मुलगा आवडत नसेल तर आपण जबरदस्ती करू शकत नाही. तसंच एखाद्या मुलीने नकार दिला तर उगीचचं जेवण नको, खेळायला नको, अभ्यास नको, काम नको, मित्र नकोत असं करत बसण्यात काहीही अर्थ नाही. या गोष्टी समजून घ्याव्या लागतील.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्याला कुणी पण आवडो, त्या मुलीला किंवा मुलाला जर आपण आवडत नसलो किंवा समोरच्याच्या मनात आपल्याविषयी प्रेमाच्या भावना नसतील तर आपण त्या मान्य करायला पाहिजेत आणि आपल्या भावना आपल्यापाशी ठेवल्या पाहिजेत. जबरदस्ती करून, मागे लागून, पिच्छा पुरवून कुणाचं प्रेम मिळत नसतं. तसं फक्त सिनेमात होतं. कारण सिनेमा हा माणसांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे घडवलेला असतो.