पाळी चालू असताना केवळ तुमच्याकडं पाहून कोणालाही त्याबद्दल ओळखता येणार नाही. अनेकवेळा पाळीच्या काळात स्त्रीयांना बाजूला बसायला लावणं, एखादं काम न करण्याचं कारण न सांगणं, देवपूजा न करणं, मंदिरात न जाणं, सॅनिटरी पॅड घरातील कचर्यामध्ये दिसणं किंवा पाळीचं कापड वाळवायला टाकलं असेल तर त्यामुळं काही पुरुष अंदाज बांधू शकतात. परंतू तो अंदाज असतो. पाळी आली आहे हे बाह्य लक्षणांवरुन समजून येणं कठीण आहे. हल्ली पाळीबद्दलचे अनेक गैरसमज तुटू लागले आहेत. त्यामुळं स्त्रीया त्यांची नियमित कामं करत राहतात. त्यामुळं पुरुषांना पाळीबद्दलचा अंदाज बांधता येणं कठीण आहे.
तुमच्या प्रश्नातील महत्वाचा भाग म्हणजे, जरी पुरुषांना कळलं की एखाद्या स्त्रीला पाळी आली आहे तरी त्यात लाजण्यासारखं काही नाही. मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जर मासिक पाळी येत नसेल तर समस्या होऊ शकते. त्यामुळं बिनधास्त रहा. ज्यांना अंदाज बांधायचा आहे त्यांना बांधू द्या. तुम्ही निर्धास्त रहा.