प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsब्लू फिल्म बघितल्या नंतर बलात्काराचे प्रमाण वाढत आहे का?
1 उत्तर

तुमचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. दोन्ही गोष्टी घडत आहेत. मात्र त्या दोन्हींचा परस्पर संबंध कसा लावता येतो ते पहायला पाहिजे.
ब्लू फिल्म किंवा पोर्न फिल्म बघण्यामागची अनेक कारणं असतात. काहींच्या मते लैंगिक इच्छा शमवण्याचा, लैंगिक आनंद मिळवण्याचा किंवा लैंगिक संबंधांबद्दल माहिती मिळवण्याचा हा एक मार्ग असू शकतो. मात्र काहींच्या मते अशा फिल्म बनवणं आणि त्या पाहणं यातून लैंगिक संबंध एक वस्तू बनतात आणि त्याचं बाजारीकरण केलं जातं. पोर्न फिल्म्समधून अनेकदा स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शरीरासंबंधी, त्यांच्यातील लैंगिक संंबंधांविषयी अवास्तव, अतिरंजित आणि कधी कधी हिंसक कल्पना प्रसृत केल्या जातात. ज्यामुळे प्रत्यक्षात लैंगिक संबंध कसे असतात याबद्दलच्या खोट्या कल्पना तयार होण्याचा धोका असतो.
आता तुमच्या प्रश्नाकडे वळू या.
ब्लू फिल्म पाहिल्यावर सगळे जण बलात्कार करतात का? तर याचं उत्तर नाही असं आहे. ब्लू फिल्म पाहून लैंगिक भावना वाढत असतील पण म्हणून त्या शमवण्यासाठी बाहेर पडून लगेच सगळे जण बलात्कार करतील असं मात्र नाही. काही जण तेवढ्यापुरता आनंद घेऊन थांबतात, काही जण हस्तमैथुन करतात तर काही जण काहीच करत नाहीत. आता गेल्या काही काळात घडलेल्या बलात्काराच्या, सामूहिक बलात्काराच्या काही घटनांमध्ये ब्लू फिल्म्स पाहून त्यानंतर बलात्कार करण्यात आला हे दिसून आलं आहे. मुंबईच्या शक्ती मिल परिसरात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात ब्लू फिल्म दाखवून तसे संबंध ठेवण्याची जबरदस्ती त्या मुलीवर करण्यात आली होती. पण हे लक्षात घ्यायला हवं की हे गुन्हे आहेत, गुन्हा करण्याच्या इराद्याने, जबरदस्तीचा, बळाचा वापर करून धमकावून केलेले गुन्हे आहेत. परिस्थितीचा फायदा घेऊन ते करण्यात आले आहेत. ते केवळ काही दृश्यं, चित्रं पाहून आपोआप झालेले नाहीत.
पण म्हणून तुम्ही जे म्हणताय ते पूर्णपणे निराधार मानता येणार नाही. गेल्या काही काळापासून अनेक स्त्रिया अशी तक्रार घेऊन संस्था-संघटनांकडे येत आहेत की त्यांचा नवरा ब्लू फिल्म्स पाहतो आणि तशा प्रकारचे संबंध ठेवण्याची मागणी करतो, नकार दिल्यास मारहाण आणि जबरदस्ती करतो. आता हाही बलात्कारच आहे. त्यामुळे कुठे ना कुठे काही संदर्भात ब्लू फिल्म्सचा अतिरेकी वापर लैंगिक नात्यांवर परिणाम करतो आहे असं म्हणावं लागेल.
ब्लू फिल्ममध्ये दाखवतात ते म्हणजे लैंगिक संबंध अशी धारणा जर तयार व्हायला लागली तर मात्र लैंगिक संबंधांमधला बळाचा, हिंसेचा, जबरदस्तीचा वापर नॉर्मलाइज होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा कोणत्याही फिल्म्सच्या आहारी न जाणं, त्या पाहिल्या तरी प्रत्यक्षात सगळं तसंच घडेल अशी अपेक्षा न ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
बलात्कार रोखण्यासाठी मानसिकतेत बदल आणणं गरजेचं आहे. केवळ फिल्म्सवर बॅन आणून किंवा ब्लू फिल्ममुळे बलात्कार वाढत आहेत असं मानून फार काही साध्य होणार नाही. बदल नजरेत आणि विचारात व्हायला हवा.
तुमचं मत निश्चित कळवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 20 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी