पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. गर्भधारणा होण्यासाठी महिन्यातील एकच दिवस फार महत्वाचा असतो. परंतू तो एक दिवस नक्की कोणता असेल हे सांगणं अवघड आहे. त्यासाठी नियमित मासिक पाळी चक्र माहित असणं आवश्यक आहे. मासिक पाळी गर्भधारणेतील दुसरी प्रक्रिया आहे. पहिली प्रक्रिया जी गर्भधारणेसाठी महत्वाची असते ती म्हणजे अंडोत्सर्जन प्रक्रिया.
अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. अंडोत्सर्जनाची प्रक्रिया मासिक पाळी येण्याच्या आगोदर १२ ते १६ दिवसामध्ये घडते. म्हणजे तुमची मासिक पाळीची जी नियमित तारिख आहे त्याआधी १२ ते १६ दिवसात अंडॊत्सर्जन होत असतं.
उदा. मासिक पाळी अंदाजे ४ एप्रिल २०१७ला येण्याची शक्यता असेल तर अंदाजे २० ते २४ मार्च २०१७ दरम्यान अंडोत्सर्जन होण्याची शक्यता आहे. जर याच काळात संभोग होऊन पुरुषाच्या वीर्यातील शुक्राणू बीजनलिकेपर्यंत पोचले तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. अनेकवेळा प्रवास, दगदग, मानसिक तणाव किंवा आजारपण यामुळं मासिक पाळी चक्र मागे पुढे होऊ शकतं. कधी कधी संभोगानंतर शुक्राणू बीजनलिकेत काही दिवस जगू शकतात. अशावेळी देखील गर्भधारणा होण्याची शक्यता असते.
परंतू हे हेदेखील लक्षात ठेवा, पुढील मासिक पाळी नक्की किती तारखेला येईल याचा केवळ अंदाज बांधता येऊ शकतो. त्यामुळं ही पध्दत नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी फार उपयोगी नाही. नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर करणं फायदेशीर राहतं.
गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.