योनीमध्ये तयार होणारा ओलावा/ योनिस्राव संबंधांच्या वेळी वंगण(लुब्रींकंट) म्हणून काम करत असतो. तो कमी झाल्याने शरीरसंबंध करताना योनीमध्ये आग होऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो. योनीमार्ग कोरडा राहण्याचे कारण समजून घेतले पाहिजे.
योनीला कोरडेपणा कोणकोणत्या कारणांमुळे होतो हे समजून घेऊ यात.
१. लैंगिक इच्छा, उत्तेजना अनो फोर प्ले
स्त्रिला लैंगिक इच्छा झाली आणि लैंगिक उत्तेजना मिळाली की, योनीमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि योनीच्या आतील स्राव वाढून योनीतील ओलावा वाढतो. स्त्रीच्या मनात सेक्स करण्याची इच्छा नसेल किंवा उत्तेजना मिळाली नसेल तर योनीमध्ये ओलसरपणा तयार होणार नाही. म्हणूनच लैंगिक संबध करत असताना संमती आणि इच्छा खूप महत्वाची आहे. प्रत्यक्ष संभोगापूर्वी कामक्रीडा (फोरप्ले) करणं योनीमध्ये ओलावा तयार होण्यामध्ये फायदेशीर ठरतं.
२. मेनोपॉज
योनिमधील ओलावा कमी होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे मेनोपॉज. वयाच्या ४० -४५ च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं याला मेनोपॉज असं म्हणतात. ही बाईच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेनोपॉजच्या काळात आणि त्यानंतर स्त्रीमध्ये काही शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. लैंगिक इच्छा आणि भावभावनाही बदलू शकतात. योनीतील ओलसरपणा आणि लवचिकपणा कमी होणं हा एक होणाऱ्या बदलांपैकी एक बदल आहे. मेनोपॉजविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/menopause/
३. तेल व इतर वंगणयुक्त पदार्थांचा वापर
संभोगाच्या वेळी जर स्त्रीच्या योनीला कोरडेपणा येत असेल तर अनेकजण घरगुती तेलयुक्त पदार्थांचा वंगण म्हणून वापर करतात. पण त्यामुळे निरोध फाटण्याची शक्यता वाढते. शिवाय अशा घरगुती तेलयुक्त पदार्थांमुळे योनीतील जिवाणूंचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. ज्या वंगणामुळे शरीराला अपाय होणार नाही, घर्षण कमी होईल आणि ज्यामुळे निरोध फाटणार नाही असं वंगण वापरलं पाहिजे. मेडिकलच्या दुकानात ‘केवाय जेली’ किंवा इतर जेली मिळतात त्याचा ओलावा वाढण्यासाठी वंगण म्हणून वापर करू शकता. काही जणांना या जेलींचा वापर केल्यावर अॅलर्जी होऊ शकते त्यामुळे शक्य असेल तर अशा जेलींचा वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.