नको असणारी गर्भधारणा टाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. पण प्रत्यक्षात मात्र गर्भनिरोधक वापरण्याची सगळी जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली दिसते. खरं तर पाळी चक्रातले काहीच दिवस स्त्री जननक्षम असते किंवा गर्भ धारणा होऊ शकते. पुरुषाच्या शरीरात मात्र रोज लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं तयार होत असतात आणि प्रत्येक वेळी वीर्यामध्ये पुरुषबीजं असतात. तसंच निरोध ही सर्वात सुरक्षित आणि निर्धोक गर्भनिरोधक पद्धत आहे. त्यामुळे लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे.
जर तुम्हाला गर्भधारणा होवू नये यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करायची असेल तर अनेक मार्ग उपलब्ध आहेत. यामधील एक उपाय म्हणजे पुरुष नसबंदी होय. यामुळं पुरुषांकडून जे पुरुषबीज योनीमध्ये जाऊन गर्भधारणा होत असते त्याला आळा बसतो. स्त्री गर्भनिरोधन(फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन्) पेक्षा जास्त सोपी व सुरक्षित अशी ही शस्त्रक्रिया असते. यामध्ये वृषणावर एक छोटा छेद देतात आणि बीजनलिका मध्ये कापून त्यांची तोंडं बंद करतात. यामुळे बीजं वीर्यामध्ये मिसळत नाहीत.
- नसबंदी झाल्यानंतर पुढचे किमान तीन महीने किंवा २० लैंगिक संबंधांपर्यंत निरोध वापरावा. कारण काही बीजं आधीच वीर्याकोशात गेली असतील तर त्यापासूनही गर्भधारणा होऊ शकते.
- पुरुषांची नसबंदी ही सर्वात सोपी आणि सुरक्षित गर्भनिरोधक पद्धत आहे.
- या शस्त्रक्रियेचा लिंगाच्या स्नायू किंवा नसांशी संबंध येत नसल्याने लैंगिक संबंधांमध्ये कसलाही अडथळा येत नाही.