पहिल्यांदा तुम्ही वापरलेल्या शब्दांबद्दल बोलू या. रंडी हा शब्द समाजामध्ये अनेकदा वेश्येबद्दल अतिशय तुच्छतेने वापरला जातो. तेव्हा असे शब्द सार्वजनिक ठिकाणी वापरताना त्यातील तुमचा हेतू लक्षात येत नाहीये. यापुढे असे शब्द वापरताना तुम्ही काळजी घ्याल ही अपेक्षा आहे.
आता तुमच्या प्रश्नाबद्दल बोलू या. फ्रेंच किसींग म्हणजे जोडीदार एकेमेकांना किस करताना जीभेचा वापर जास्त खोलवर करतात असा साधारण समज आहे. याबद्दल आधी स्पष्टता असावी म्हणून.
किस करताना मुख्यतः लाळ एकमेकांना दिली किंवा घेतली जाते. लाळेमधून एचआयव्ही होण्याची शक्यता नसते. त्यामुळे एचआयव्ही पॉजिटीव्ह असलेल्या व्यक्तीला किस केल्याने एचआयव्ही होत नाही. मात्र एचआयवव्ही लागण कशी होते हे माहित असणं आवश्यक आहे म्हणून खालील माहिती दिली आहे.
शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो. एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.
याव्यतिरिक्त एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे
निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,
दूषित रक्त आणि
प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.
लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो