मित्रा,
तू विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे. कदाचित अशाच परिस्थितीतून अनेकजण जात असतील. त्यांना या प्रश्नाच्या उत्तरामुळं कदाचित मदत होईल.
आम्हाला वाटतं तू समलैंगिक आहे. आणि समलैंगिक असण्यामध्ये काहीही चूकीचं नाही. तू समलैंगिक असल्यामुळं तुला मुलींबद्दल किंवा स्त्रीयांबद्दल आकर्षण वाटलं नाही. खरतरं इतका काळ तू सगळं शांतपणे सहन केलं, पण आता या गोष्टींचा त्रास होतो असं तुझं म्हणणं आहे.
तुला तुझ्या जोडीदाराला खरं सांगायचं आहे?
तुला घटस्फोट घ्यायचा आहे?
कि वेगळं जगायचं आहे?
या गोष्टींवर तू लवकर निर्णय घेतला तर तुला फायदेशीर राहील. या गोष्टी जोडीदारासोबत बोलताना कदाचित हिमंत होणार नाही, भिती वाटेल पण हे तुला करावं लागेल. कारण जितक्या लवकर तू निर्णय घेशील तितक्या लवकर तु या टेंशनमधून बाहेर पडशील. शिवाय़ तुझ्या जोडीदाराचाही विचार कर. तु गप्प राहिल्यामुळं कदाचित तिलाही बरचं काही सहन करावं लागत असेल. तुझ्या अशा वागण्याचा तिलाही त्रास होत असेल.
आता तू दोन आयुष्य जगतोय त्याबद्दल महत्वाचं हे आहे की, तु तुझ्या जोडीदारासोबत फसवणुक करत आहे. याच्यातून दोघांचंही नुकसान आहे. यामुळं कदाचित तुला ब्लॅकमेलही केलं जाऊ शकतं. याबद्दल विचार कर. महत्वाचं म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंधामुळं लिंगसांसर्गिक आजार होण्याचा धोका नेहमीच राहतो.
कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर पुर्ण नाही असं तुला वाटत असेल तर पुण्यामध्ये समलैंगिक व्यक्तींबाबत योग्य मार्गदर्शन करणारी समपथिक ट्र्स्ट संस्था आहे. त्यांना भेटून तुला अधिक मदत मिळेल. समपथिक ट्रस्टचे अध्यक्ष बिंदूमाधव खिरे कदाचित तुला जास्त मदत करु शकतील. त्यांचा फोन क्रमांक खाली दिला आहे.
020 6417 9112