प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसिझेरियन झाल्यावर किती दिवसांनी शरीर संबंध ठेवू?
1 उत्तर

सिझेरियन ही मोठी आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. पोटाला आणि आतमध्ये गर्भाशयाला भागाला छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे सिझेरियननंतर किमान ६ आठवडे पोटावर आणि गर्भाशयावर ताण येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. नॉर्मल बाळंतपणामध्ये शरीरात अनेक बदल घडतात, गरोदरपणात तयार झालेली संप्रेरकं आणि त्याचं संतुलन बाळ झाल्यानंतर काही काळात पूर्ववत होतं. मात्र सिझेरियननंतर या सर्व प्रक्रिया पूर्वपदावर यायला जास्त काळ लागतो. त्यामुळे सिझेरियन झाल्यावर किमान दीड ते दोन महिने संभोग टाळावा.
पण याचा अर्थ एकमेकांना स्पर्शही करायचा नाही असा आहे का? तर तसं काही नाही. जर दोघांची इच्छा असेल आणि त्यातही खास करून जिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे त्या स्त्रीची इच्छा असेल तर संभोग न करता इतर प्रकारे शारीरिक जवळीक साधता येऊ शकते. शरीर संबंध म्हणजे फक्त मैथुन किंवा संभोग नाही. एकमेकांच्या जवळ येण्याचे आणि प्रेमाचे अन्यही मार्ग आहेत. पोटाला, गर्भाशयाला, टाक्यांना आणि शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या जखमांना धक्का न लावता एकमेकांच्या जवळ येता येऊ शकेल. मात्र त्यासाठी एकमेकांशी बोलणं आवश्यक आहे, आणि कोणत्याही क्षणी थांबता येणं गरजेचं आहे. किमान ६ आठवडे संभोग टाळणं गरजेचं आहे हे म्हणत असताना किमान हा शब्द महत्त्वाचा आहे. स्त्रीची इच्छा, मनाची तयारी आणि तब्येत लक्षात घेऊनच संभोग कधी करायचा, करायचा का नाही हे ठरवावं. 
या काळात पुरुषाने, जो नुकताच बाप झाला आहे, त्याने समजुतीने वागणं अतिशय महत्त्वाचं आहे. लैंगिक संबंधासाठी जबरदस्ती न करता दोघांना सुखावह असेल अशा पद्धतीने एकमेकांच्या जवळ आल्यास नातं नक्कीच जास्त घट्ट होऊ शकेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 0 =