शाळे मध्ये लैंगिक शिक्षण देत असताना विद्यार्थ्या कडून कुठलया प्रकारचे प्रश्न विचारतात व शिक्षकांना कसल्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते
मुलांची निरीक्षण क्षमता प्रचंड असते. घर, परिसर, मित्र, शाळा या अवकाशामधून ते अनेक अनुभव मिळवतात, त्यांचे अर्थ लावतात. शिवाय टीवी,मोबाईल, इंटरनेट सारखी माध्यमं त्यांच्यावर प्रभाव टाकत असतात. त्याच्या मनात अनेक प्रश्नांची निर्मिती सातत्याने होते आणि त्यांची उत्तरंही ते शोधतात. अनेकदा ती योग्य किंवा अयोग्यही असतात. चूक किंवा बरोबरही असतात. या विषयांवर आम्ही जेंव्हा मुलांशी संवाद साधतो तेंव्हा मुलं आपल्याला कल्पना करता येणार नाही किंवा संवाद कर्त्याला अचंभित करतील असे प्रश्न विचारतात. लैंगिक अवयव, त्यांची नाव, त्यांचे अर्थ, प्रेम-मैत्री-आकर्षण, फ्रेन्डशिप-लवशीप ते मूल कसे होते, लैंगिक संबंध, मासिक पाळी आणि फ्लेवर्ड कन्डोम्स कशासाठी असतात ई प्रश्न सर्रास येतात. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची ही निव्वळ झलक आहे.
अर्थातच जे संवादक मुलांसोबत हा संवाद साधत आहेत त्यांचा विषय, आशय, संवाद करण्याच्या पद्धती आणि संवेदनशीलता अशा अनेक पातळ्यांवर कस लागतो. त्यांनी या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने तयार असणं, प्रशिक्षित असणं अपेक्षित आहे. चांगला संवादक होण्याची ती अट आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कुठल्याही प्रकारचा विषम, पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन संवादाकाचा असेल तर हा संवाद ‘संवाद’ होत नाही.
किशोरवयीन मुलांसाठीच्या शाळेच्या नियमित अभ्यासक्रमात लैंगिकता शिक्षण (sexuality education) किंवा शरीर साक्षरता (body Literacy) या विषयाचा समावेश असायला हवा हा विचार अनेक शिक्षणतज्ञ आणि संस्था दीर्घ काळापासून मांडत आहेत. या विषयाचे महत्व सावकाश का होईना पण आपल्या समाजाच्या आणि शासनाच्या लक्षात येत आहे. तसं पहिला गेलं तर शैक्षणिक धोरण, नियमित अभ्यासक्रम आणि पाठ्य पुस्तकांत आजही खऱ्या अर्थाने या विषयाचा समावेश झालेला नाही. परंतु अनेक खाजगी स्थानिक शिक्षण संस्था, काही महानगर पालिकांच्या शाळा असे प्रयोग करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात तथापि सारख्या अनके सामाजिक संस्था अभ्यासक्रम निर्मिती, संसाधन विकासाचे प्रयत्न करताना आणि काही पथदर्शी प्रयोग राबविताना दिसतात.
तथापि संस्थेने लैंगिकता शिक्षणाच्या या विषयात, ज्याला आम्ही शारिर साक्षरता आसेही म्हणतो, अनेक प्रयोग केले आहेत आणि अनेक उपयोगी संसाधनांची निर्मिती केली आहे. तुम्हाला यात काही मदत लागली तर कळवा.