लैंगिक संबंध करीत असताना जर स्त्री उद्दीपित झाली नाही आणि तिच्या योनीमार्गातून जर ओलसर,चिकट असा द्रव पाझरला नाही तर त्या स्त्रीच्या योनीमार्गाच्या कोरडेपणाने संबंध करण्यास त्रास झाल्याने योनीमार्गात तसेच कधीकधी हाता-पायात जळजळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे जोवर स्त्री पूर्णपणे उद्दीपित होत नाही तोवर संबंध करणे टाळावे. आणि स्त्रीला उद्दीपित करण्यासाठी स्त्री पुरुषांनी फोअरप्लेसारख्या गोष्टी कराव्यात.
पाळीच्या काळात किंवा इतर काळात जर योनीमार्गाची स्वच्छता ठेवली गेली नाही तर योनीमध्ये जंतूलागण होऊ शकते शिवाय जोडीदाराला जर अशा प्रकारची जंतू लागण झाली असेल तर लैंगिक संबंधांतून दुसऱ्या जोडीदाराला जंतूलागण होऊ शकते. योनीला खाज सुटणे, पांढरट आणि आंबट वास येणारा स्राव, लघवी करताना जळजळ किंवा लैंगिक संबंधांच्या वेळेस वेदना होणे यांसारखी लक्षणे या आजारांमध्ये दिसतात.
अशा आजारांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/reproductive-tract-infections/ या लिंकवरील लेख वाचा.
अशी जंतुलागण झाली तर ती निश्चितपणे बरी करता येऊ शकेल. जोपर्यंत जंतुलागण जात नाही तोपर्यंत शक्यतो लैंगिक संबंध ठेऊ नका. अशा आजारांमध्ये लैंगिक संबंधांतून दोन्ही जोडीदाराला आजार होण्याची शक्यता असते म्हणून दोघांनी उपचार घेणे आवश्यक आहे. आजार न लपवता, कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता मोकळेपणाने डॉक्टरांशी बोला आणि लवकरात लवकर उपचार घ्या.