तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला फार उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
तीन वर्षांपासून तुम्हाला ही समस्या जाणवत आहे. याआधी तुम्ही कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे का हे तुम्ही सांगितलेलं नाहीत. मात्र अशा गोष्टींसाठी वेळीच उपाय सापडला तर त्यातून येणारं टेन्शन, ताण तणाव कमी व्हायला निश्चित मदत होते.
तुमच्या समस्येमध्ये अनेक शक्यता आहेत.
- तुमच्या जोडीदाराला लिंग ताठर होण्यात अडचण येत आहे का? तसं असेल तर लिंग ताठ होण्यासाठी काही उपाय करावे लागतील. उत्तम आहार, व्यायाम आणि चिंतामुक्त जीवनशैलीचा उपयोग होतो. मात्र तीन वर्षांपासून ही समस्या असेल तर मात्र सेक्सॉलॉजिस्टना भेटून त्यांचा सल्ला घेतलेला चांगला.
- लिंग योनीमार्गात शिरताना तुमचा योनीमार्ग एकदम घट्ट बंद होतोय असं काही तुम्हाला जाणवत आहे का? अनेक मुली-स्त्रियांना ही समस्या जाणवते. या समस्येला इंग्रजीत व्हॅजिनिस्मस असं म्हणतात. यामध्ये लिंग योनीमार्गात शिरण्याआधीच योनीमार्गाचे स्नायू एकदम घट्ट बंद होतात. संभोगाबद्दल मनात भीती असेल, खूप वेदना होतील अशी शंका मनात येत असेल तरीही कधी कधी स्त्रीचं शरीर असा रिस्पॉन्स देतं. तसं काही तुमच्या मनात येत असेल तर विचार करा. लैंगिक संबंध आनंददायी असतात. त्यामुळे त्याबद्दलची भीती मनातून काढायचा प्रयत्न करा.
- लैंगिक संबंधांच्या वेळी योनीमार्ग पुरेसा ओलसर नसेल तरीही कधी कधी लिंग आत जाण्यात अडचणी येतात. तसं काही होत असेल तर संभोगाच्या आधी फोरप्ले म्हणजेच प्रणय, एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करा. यामुळे योनीमार्ग ओलसर होऊन लिंगप्रवेश सोपा होतो.
तुमची समस्या नक्की कशा प्रकारची आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे काही मार्गदर्शन करणं सोपं जाईल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर समस्यांप्रमाणे लैंगिक समस्यांबद्दलही वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं. अशा समस्या अनेकांना येत असतात. त्यामुळे न घाबरता, लाजता डॉक्टरांचा सल्ला घ्या.