1Shircya angawar pandare pani jane mhanjekay? 2 sanbogsanbog kanyadhic tichy yonitun kup paniyeteaseka ?
स्त्रीच्या योनीतून स्राव होणे याला अंगावरून पांढरे पाणी जाणे असेही म्हंटले जाते. अंगावरून जाणारा पांढरा स्राव याविषयी माहिती असेल तर हा स्राव नैसर्गिक आहे की, आजारामुळे त्यात काही बदल झाला आहे हे समजून घेता येईल. सगळ्याच स्त्रियांना योनीमार्गात ओलासर पणा जाणवतो. योनीतून झिरपणाऱ्या पाण्याला योनिस्राव किंवा पांढरे पाणी असे म्हणतात. या पाण्यामुळे योनी स्वच्छ राहते. स्वाभाविक ओल किंवा पांढरे पाणी आतील कपडे खराब करत नाही. आतील कपडे खराब होतील इतक्या प्रमाणात जर पांढरे पाणी जात असेल तर मात्र चिंता करण्यासारखी गोष्ट असते. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये नैसर्गिकरीत्या योनीतून थोडे जास्त पांढरे पाणी जाते. बीज बिजकोषातून बाहेर पडल्यावर (२४ ते २८ तास पाळीच्या मध्यावर), गरोदरपणी आणि लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीतून पांढरे पाणी जास्त प्रमाणात जाऊन कपडे खराब होऊ शकतात. हे नैसर्गिक आहे यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही. मानसिक त्रास, रक्तपांढरी (रक्त कमी झाल्यामुळे) , झोप येत नसल्यास, असंतुलित आहार यामुळे सुद्धा अंगावरून नेहमीपेक्षा थोडे जास्त पांढरे पाणी जाऊ शकते. काही वेळा अति प्रमाणात अंगावरून पांढरे जाते. यामुळे आतील आणि काही वेळा बाहेरचे सुद्धा कपडे ओले होतात. जंतूलागण झाल्याने असे आजार होऊ शकतात. अंगावरून नैसर्गिकरीत्या जाणाऱ्या पांढऱ्या पाण्याचा रंग आणि वास बदलल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार घेतले पाहिजेत. स्वतःच्या नैसर्गिक स्त्रावाचा वास आपल्या परिचयाचा असतो. नेहमीपेक्षा वेगळा दुर्गंधीयुक्त वास असल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार केले पाहिजेत.