ब्लू फिल्म पाहिल्यावर लैंगिक उत्तेजना निर्माण होते आणि ती शमवण्यासाठी हस्तमथुन किंवा मास्टर्बेशन केलं तर त्यात गैर काही नाही. लैंगिक सुख मिळवण्याची ती एक निर्धोक कृती आहे. अतिरेक टाळला तर त्यातून स्वतःला आणि इतरांना कसलाही धोका नाही. त्यामुळे त्याबद्दल अपराधी वाटण्याचं कारण नाही. तुम्ही किती वेळा ब्लू फिल्म पाहता आणि किती वेळा मास्टर्बेट करता हे लिहिलेलं नाहीत. मात्र दिवसातून एकाहून अधिक वेळा जर तुम्ही हस्तमैथुन करत असाल तर ही सवय थोडी कमी करण्याचा प्रयत्न करा.
दुसरा भाग म्हणजे कोणत्याही स्त्रीचे स्तन पाहिल्यावर तुम्ही मास्टर्बेट करता. हे जरा धोक्याचं आहे. स्त्रीचं शरीर फक्त लैंगिकदृष्ट्या पहायचं नसतं. स्त्री ही स्वतंत्र, विचार करणारी व्यक्ती आहे. तिचं फक्त शरीर आणि तेही स्तन किंवा लैंगिक अवयव नजरेत भरणं योग्य नाही. त्यामुळे स्त्रीकडे पाहण्याची नजर बदलण्याचा प्रयत्न करा. मुलींशी मैत्री करायची असते, केवळ त्यांच्या शरीराकडे पाहिल्याने लैंगिक भावना उद्दीपित होणं योग्य नाही.
ही सवय कमी करण्यासाठी काही उपाय करता येतात का ते पहा
- हस्तमैथुन कधी करावंसं वाटतं याचा आधी विचार करा. स्वतःला इतर कोणत्या तरी गोष्टीमध्ये गुंतवून घ्या. व्यायम करायला, खेळायला, पळायला किंवा पोहायला जा. व्यायामामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजंतवानं होतं.
- मन वेगळ्या गोष्टीत रमलं की सेक्सचे किंवा हस्तमैथुनाचे विचार कमी व्हायला मदत होते. त्यामुळे एखाद्या गटामध्ये सामील व्हा. सामाजिक कामाची आवड असेल तर तशा एखाद्या कामात सहभाग घ्या. वाचनाची आवड असेल तर लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचा. मित्रांबरोबर सहलीला, बाहेर जा. सेक्सविषयी बोलणं, वाचणं, फिल्म इत्यादी पाहणं काही काळ टाळून पहा. हस्तमैथुन करण्याची इच्छा कमी होऊ शकेल.
- सुरुवात म्हणून एका दिवसात किती वेळा हस्तमैथुन करता ते कमी करा. चारदा करत असाल तर दोनदाच करा, दोनदा करत असाल तर एकदाच करा. अशा प्रकारे हळू हळू हस्तमैथुनाची सवय कमी होऊ शकेल. जर प्रयत्न करूनही जमत नसेल तर डॉक्टरांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही.
स्वतःवर विश्वास ठेवा. सेक्स आणि लैंगिक भावनांमध्ये काहीही वाईट नाही. फक्त त्याच्या आहारी जाऊ नका. आणि तुम्ही यात नक्की यशस्वी व्हाल अशी आमची खात्री आहे.