खरं पाहता शरीरातले वेगळेपण आपल्याला काही नवीन नाही. काहींचे केस कुरळे असतात, तर काहींचे डोळे वेगळ्या रंगाचे असतात. काहींच्या हाताला किंवा पायाला पाचाच्या ऐवजी सहा बोटं असतात. हे वेगळेपण स्वीकारायला समाजाला जड जात नाही, कारण याचा त्या व्यक्तीच्या जननेंद्रियांशी आणि लैंगिकतेशी काही संबंध नसतो.
पण काही जणांचं वेगळेपण असं असतं की जे जननेंद्रियांशी निगडित असतं. उदा. क्वचित वेळा मुलीच्या योनीमुखावर जन्मतःच योनीपटल नसतं. तर क्वचित वेळा मुलीच्या योनीपटलाला एकही छिद्र नसतं. काही मुलांमध्ये लिंग खूप लहान असतं किंवा लिंगाची वाढ पूर्ण झालेली नसते. असं वेगळेपण दिसलं की त्या मुला-मुलीच्या लिंगाबद्दल शंका नसते.
पण जिथे जननेंद्रियांच्या रचनेवरून हे बाळ मुलगा आहे का मुलगी आहे असा संभ्रम पडतो तिथे मात्र समाजाची द्विधा मनःस्थिती दिसते. पालकांना चिंता वाटते. आपलं बाळ मुलगा आहे का मुलगी, लोक आपल्याला काय म्हणतील, आपल्या बाळाचं पुढे कसं होईल? घरच्यांना, नातेवाइकांना माहित झाल्यावर ते बाहेर बोलत नाहीत. त्या बाळाच्या लैंगिकतेच्या वास्तवाकडे काणाडोळा केला जातो. घरचे, शेजार-पाजारचे त्या बाळाला स्वीकारतात, पण मोठं झाल्यावर तिऱ्हाईत माणूस त्या व्यक्तीला स्वीकारणार का?
जर बाह्य जननेंद्रियात वेगळेपण नसेल पण आंतरिक जननेंद्रियात वेगळेपण असेल तर ते लक्षात येणं अवघड असतं. हे वेगळेपण खूप उशीरा लक्षात येऊ शकतं किंवा कधी कधी आयुष्यभर लक्षात येत नाही. काही वेळा एखाद्या वैद्यकीय प्रश्नातून हे वेगळेपण लक्षात येतं. एक ताई म्हणाल्या , “१६ वर्षं झाली तरी पाळी आली नाही म्हणून मी डॉक्टरांकडे गेले. सोनोग्राफी केल्यावर मला कळलं की मला गर्भपिशवी नाहीये. मला खूप मोठा धक्का बसला.” धक्का बसणं साहजिक आहे. कारण असं वेगळेपण असेल याची कल्पना नसते. कोणत्याच बाबतीत आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असं जाणवलेलं नसतं. त्यामुळे आकस्मिकपणे हे वेगळेपण कळल्यामुळे आपण एका क्षणात परके बनतो. जाणवतं, की आता इतरांचं व आपलं आयुष्य वेगळं असणार आहे. इतरांची व आपली सुख-दुःखं एकच असतील ही ‘कंफर्ट इन मेजॉरिटी’ क्षणात नष्ट होते. आपल्यावर निसर्गानं अन्याय केला आहे असं वाटून नैराश्य येतं. आपल्याला गर्भाशय नाही, आपल्याला मूल होणार नाही याचं दुःख होतं.
(क्रमशः)
(इंटरसेक्स -एक प्राथमिक ओळख, लेखक – बिंदुमाधव खिरे, समपथिक ट्रस्ट प्रकाशन या पुस्तकातून साभार)
image courtesy – en.wikipedia.org/wiki/Ardhanarishvara
No Responses