काय आहे मेन्स्ट्रुअल कप?

भारतात स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान सुती  कपडे अथवा सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. यासाठी आता आणखी एक पर्याय समोर येतो आहे तो म्हणजे मेनस्ट्रअल कप अर्थात मासिक पाळी दरम्यान वापरायचा कप. त्याविषयी माहिती देणारा गौरी दाभोळकर यांच्या लेखातील काही भाग…

———————————-

मेनस्ट्रुअल कप कसा वापरायचा?

गौरी दाभोळकर या कपाच्या वापराविषयी सांगतात, आतापर्यंतच्या कप-प्रचाराच्या अनुभवातून लक्षात आले की बऱ्याच जणींना भीती वाटते की काही झाले तरी एक ‘फॉरीन बॉडी’ शरीरात आहे. मलासुद्धा सुरुवातीला असेच वाटत होते. योनीमार्गात कप कसा मावेल अशी चिंता पहिल्यांदा होती. मग लक्षात आले की जर अख्खे बाळ तिथून येऊ  शकते तर एक पातळ घडी घातलेला कप का नाही आत जाणार? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाळीच्या आधी आणि नंतर कप पाच-सात मिनिटे उकळून निर्जंतुक  करता येतो.

कपाची इंग्रजी ‘यू’ आकाराची घडी घालून तो योनीमार्गात घालायचा. मग हळूच फिरवल्यावर तो आतमध्ये उघडतो व स्राव त्यामध्ये जमतो. हवेच्या दाबामुळे तो आत व्यवस्थित बसतो. तो एकदा नीट बसला की पाच-सहा तासांची सुट्टी. पाळी आहे हेच विसरायला होतं. पुरळ, घसपटणे आणि चालताना जड वाटणे हे सगळंच बंद. गंमत म्हणजे कप वापरताना तुम्ही धावणे, पोहणे, योगा-व्यायाम अगदी निश्चिंतपणे करू शकता. कित्येक योगा शिक्षिका आणि मॅरेथॉन धावपटू आता कप वापरू लागल्या आहेत. पाळी आहे म्हणून कुठलीच बंधनं नाहीत. डागांची काळजी न करता रात्रभर गाढ झोपता येते.

कप व्यवस्थित बसला तर आठ-दहा तास काढावा लागत नाही. समजा, कपाबरोबर  कापडाचे पॅड वापरलेच तरी कपामुळे ते फारसे खराब होत नाही. आणि कपाची सवय झाल्यावर सुक्या बाजूने चिमटीत धरून अलगद काढता येतो. हाताला काही लागत नाही. सुरुवातीला काढ-घाल करायचा सराव व्हायला एक-दोन महिने जावे लागतात.

मेनस्ट्रुअल कप कसा निवडावा?

कप घेण्याआधी जरा वेगवेगळ्या कपाच्या साईजचा तक्ता पाहावा. आपले माप कसे घ्यावे व योग्य कप कसा निवडावा यावरसुद्धा माहिती उपलब्ध आहे. काही कप थोडे मऊ  असतात तर काही जरा घट्ट. विशीतल्या मुलींसाठी लहान आकाराचे कपसुद्धा मिळतात.

हा कप कुठे मिळतो ?

कप अजून औषधांच्या दुकानात आलेला नाही. इंटरनेटवरून, ऑनलाइन मागवता येतो.

कपाची किंमत?

सध्या अशा कपची किंमत ७०० रुपये ते १००० किंवा त्यापेक्षा जास्त आहे.  पण एकच कप आपण ५ ते १० वर्ष वापरू शकतो.

कप आणि मुलीचे कौमार्य?

कप वापरताना योनीपटल फाटू शकते, परंतु योनीपटल खेळतानासुद्धा ताणले जाऊ  शकते. काही वेळा मातांना भीती वाटते की कप वापरल्यामुळे मुलीचे कौमार्य संपेल, परंतु वैद्यकीय परिभाषेनुसार कौमार्य योनीपटलावरून ठरत नाही; मुलीचा लैंगिक संबंध आला आहे किंवा नाही यावर ठरते.

कॉपर टी (तांबी) बसवलेली असेल तर कप वापरता येतो?

तांबी गर्भाशयाच्या आत असते तर कप योनी-मार्गात. तांबी बसवल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी कप वापरायला हरकत नसावी. तसेच बाळंतपणानंतरसुद्धा काही महिन्यांनी कप वापरायला हरकत नाही. अर्थात या दोन्ही परिस्थितींमध्ये वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.

मेनस्ट्रुअल कपाची कल्पना कधी आली?
भारतामध्ये हे सर्व नवीन असले तरी कपाची कल्पना शंभर वर्षांपेक्षा जुनी आहे. १९८० मध्ये रबराचा ‘द कीपर’ कप आला तो अजूनही मिळतो. एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला मेडिकल दर्जाच्या ‘सिलिकोन’पासून  बनवलेले अत्याधुनिक कप आले. ज्यांना रबराची एलर्जी आहे त्या स्त्रियाही पाळीचे कप वापरायला लागल्या. ल्युनेट ही कंपनी २००५पासून विविध आकारांचे व मापांचे कप बनवत आहेत. भारतामध्ये कपचे उत्पादन मलानी बंधूंनी २०१० मध्ये सुरू केले. त्याच्या वैद्यकीय चाचण्या झालेल्या असल्या तरी आजही त्यावर संशोधन सुरू आहे. सर्वेक्षणही होत आहे.

मेनस्ट्रुअल कपचे फायदे?

पाळीत सुती कापडाचे पॅड आणि कप वापरायला सोयीचा आहे तसेच त्याचा पर्यावरणाला फायदा आहे  असे गौरी दाभोलकर त्यांच्या लेखातून सांगतात. पाळीमध्ये मूड स्विंग्स, पोट फुगणे, ओटीपोटात कळा, कंबरदुखी अशा नाना गोष्टींनी अगोदरच स्त्रिया त्रस्त असतात. त्यातच कपडय़ामुळे ओलेपणा, डाग पडण्याची काळजी यामुळे स्त्रीला आजाऱ्यासारखे वाटते. डिस्पोजेबल पॅड रक्त शोषतात व त्यामध्ये जंतू वाढायला लागतात. त्याला दुर्गंधी येते. काही पॅडमध्ये यावर उपाय म्हणून मंदसा सुवास देणारी रसायने घातली जातात. त्यांचा अपाय होण्याचीच शक्यता असते. याउलट मेनस्ट्रअल कपाची रक्ताशी कुठलीच प्रक्रिया होत नाही व ते कपाला फारसे चिकटतसुद्धा नाही.

(मूळ लेखासाठी पहा http://www.loksatta.com/lekh-news/menstrual-cup-1216308/#sthash.N1RYWPOt.dpuf)

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

3 Responses

  1. Pallavi Bhojai says:

    Palit sex kela tar chalate ka?

    • let's talk sexuality says:

      मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करू नये असा काहीही नियम नाही. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. यासाठी मात्र दोघांची परवानगी असणे फार महत्वाचे आहे.
      या सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवू या की, काही स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होतो. या त्रासामुळे तिला विश्रांतीची गरज वाटू शकते. पाळी दरम्यान रक्तस्त्राव होत असतो. त्रासामुळे तिचा मूड नसेल तर संभोग करू नये. काहींना मासिक पाळीच्या वेळी योनीतून रक्त जात असताना त्यात लिंग घालून संभोग करायला घाण वाटतं, असं वाटत असेल तर या काळात संभोग करू नये. या काळात ओटी पोटात दुखणे, पाठ दुखणे किंवा चीड चीड होणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो. अशा काळात शरीर संबंधांची इच्छा नसणं, नको वाटणं सहज आहे. तसं असेल तर त्याचा आदर कारण गरजेचं आहे.

    • let's talk sexuality says:

      हो, अधिक माहितीसाठी सोबतची लिंक पहा
      https://letstalksexuality.com/sex_during_periods/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap