तिची ओळख आज गायत्री गौरी सावंत अशी आहे, मात्र त्यासाठीचा प्रवास काटय़ा कुटय़ांचाच होता. तसाच तो तिच्या तृतीयपंथीय ‘आई’चाही होता. तिला जगाने नाकारलं, लाथाडलं, पण तिच्यातलं मातृत्व मात्र सतत जागतं राहिलं, त्यातूनच गायत्रीला आपली लेक मानण्याचं धाडस तिनं केलं, पण तिला वाढवण्याच्या, चांगले संस्कार देण्याचे, पालकत्वातले वेगळे आयाम तिच्यातल्या आईपणाला आव्हान देत राहिले, त्याला पुरून उरत आईपण निभावणाऱ्या गौरी सावंत यांच्याविषयी..
‘जागतिक मदर्स डे’ च्या निमित्ताने लोकसत्ता मध्ये आलेला लेख वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.
‘‘निवडुंगाच्या झाडाला छोटंसं फूल यावं आणि त्या फुलामुळे काटेही सुसहय़ वाटावेत, अशी गायत्री आमच्या काटेरी आयुष्यात फूल बनून आली.’’ मालाड मधल्या मालवणी भागातल्या छोटेखानी घरात बसून गौरी सावंत त्यांना ‘आई’ म्हणून हाक मारणाऱ्या गायत्रीबद्दल कौतुकानं सांगत होत्या. मालाडच्या मालवणी भागात ‘सखी चार चौघी’ ही तृतीयपंथी आणि वेश्यांसाठी काम करणारी संस्था त्या चालवतात. त्या स्वत: तृतीयपंथी आहेत. त्यामुळेच गायत्री आणि गौरी यांच्यातलं माय-लेकींचं नातं नेहमीच्या पारंपरिक संकल्पनेच्या पलीकडलं आहे.
‘‘एका संध्याकाळी माझा चेला बातमी घेऊन आला. आमच्या गल्लीत राहणाऱ्या एका वेश्येचा एड्समुळे मृत्यू झाला होता. तिचं कर्ज वसूल करण्यासाठी ठेकेदारांनी घरातलं सगळं सामान विकायला काढलं. फ्रिज, भांडी, पलंग विकता विकता तिच्या सहा वर्षांच्या मुलीला विकायला निघाले तेव्हा मात्र न राहवून मी हस्तक्षेप केला. अक्षरश: भांडून, शिव्या देऊन त्या गुंडांना हुसकावून लावलं खरं, पण मग प्रश्न आला, या मुलीचं काय करायचं? माणुसकीच्या नात्याने आणि तिचे कोणी तरी नातेवाईक येऊन तिला कधी ना कधी तरी घेऊन जातील या विचाराने मी झटपट निर्णय घेतला. जाहीर केलं, ‘मैं संभालेगी इसको.’ आणि त्या दिवशी गायत्री आमच्या हिजडय़ांच्या घरात आली आणि इथलीच झाली. रात्री छोटीशी गायत्री माझ्या कुशीत निर्धास्त झोपलेली पाहिली आणि तिचा कोवळा हात माझ्या चेहऱ्यावरून फिरला तेव्हा मला जाणीव झाली की हिला आपली गरज आहे. मग तिला आंघोळ घालणं, केस विंचरणं, फिरायला घेऊन जाणं, भेळ खाऊ घालणं यातून तिचा लळा लागत गेला.’’ गौरी सावंत दहा वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ दिवसांच्या आठवणीत रमल्या. गायत्री आल्यामुळे एक वेगळीच जबाबदारी आपल्यावर आली आणि एक वेगळीच भावनिक जाणीवही वाढू लागल्याचं त्या मान्य करतात. पालिकेच्या शाळेत चौथी इयत्तेत तिला घातलं आणि तिथून पुढे ‘आईपण’ निभावताना गौरी सावंत यांची कसरत सुरू झाली.
गौरी यांच्याच घरात गायत्री राहत असल्याने तिथे लिंगपरिवर्तन केलेले हिजडे, त्यांची मानसिक – भावनिक दोलआंदोलनं, कंडोमचा सर्रास वापर, सेक्सविषयी खुल्या चर्चा यामुळे न कळत्या वयातच गायत्रीला सगळं कळायला लागलं होतं. ते चांगलं की वाईट हे ठरवण्याइतपत ती मोठी झाली नव्हती तरी त्या वातावरणात ती तशीच घडत होती. त्यांच्या बोलण्या-चालण्याचा तिच्यावर इतका परिणाम झाला की शाळेतली आणि टय़ूशनमधली मुलं तिला छोटा छक्का म्हणून चिडवायचे. गौरी सांगत होत्या, ‘‘आमच्या या घरात हिजडे, वेश्या, पुरुषही येतात. त्यामुळे शिव्या, थेट लैंगिक बोलणं, हातवारे करत उच्चरवात बोलणं असं एकूणच मोकळंढाकळं स्वैर वातावरण असतं. त्याचा परिणाम गायत्रीवरही होऊ लागला होताच. गायत्री शाळेत मैत्रिणींबरोबर भांडताना टाळ्या वाजवते, त्यांना घाबरवते अशी तक्रार शिक्षकांनी एकदा माझ्याकडे केली. पहिलीच वेळ होती त्यामुळे तिला समज देऊन मी दुर्लक्ष केलं, पण नंतर जेव्हा तिने थेट आमच्या तोंडची अर्वाच्य भाषा उचलली तेव्हा मात्र मी खडबडून जागी झाले.’’ शाळेच्या पालकसभांमध्ये गौरीताईं नेहमी जायच्या, तिथे त्यांनी ऐकलेल्या तिच्याबद्दलच्या तक्रारींमध्ये त्यांना गायत्रीचा उज्ज्वल भविष्यकाळ धूसर दिसू लागला. त्या म्हणाल्या, ‘‘एखाद्या कुंडीत नको ते झाड येतं आणि आपोआपच ते वाढायला लागतं तशी माझी मुलगी या वातावरणात वाढू लागली होती.’’ पण हीच वेळ होती तिच्यामागे आई म्हणून ठामपणे उभं रहाण्याची. तिच्या वाढत्या वयाबरोबर तिच्या शरीरात होणारे बदल, आजूबाजूचे हिजडे आणि तिच्यात फरक आहे हे सांगणं, चुकीच्या स्पर्शाविषयी तिला शिक्षित करणं हे सगळं करत असताना गौरींमधील ‘आई’सुद्धा आकार घेत होती.
पण एक घटना मात्र त्यांना तिच्याविषयीचा ठाम निर्णय घेण्यास भाग पाडणारी ठरली..
एका संध्याकाळी गौरी सावंत एका बैठकीहून परतल्या तेव्हा गायत्री मेकअप करून दारात उभी होती. तिचा तो भडक अवतार पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच वेळी कदाचित आपली हतबलता, असहायता, तिच्या जबाबदारीची जाणीव आणि त्यातून आलेली भीती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल, पण कधी नव्हे ते त्यांनी गायत्रीला मार मार मारलं. पण ही एक घटना त्यांच्यातल्या आईपणाला खडबडून जागं करून गेली. या वातावरणाचा परिणाम तिच्यावर होऊ नये आणि तिचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून काळजावर दगड ठेवून आपल्यापासून दूर करत त्यांनी गायत्रीला हॉस्टेलला ठेवण्याचा निर्णय घेतला. गौरी पहिल्या दिवशी तिला तिथे सोडून आल्या तेव्हा रिकामं घर त्यांना खायला उठलं होतं..
गेल्या दोन वर्षांपासून गायत्री हॉस्टेलमध्ये राहून शिकतेय. यंदा ती दहावीला आहे. तिला हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळावा म्हणून ‘आस्था’ या वेश्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मदत केली. मोकळ्या वातावरणातून गायत्री थेट हॉस्टेलच्या शिस्तबद्ध वातावरणात गेली. त्यामुळे सुरुवातीला हडबडली मात्र त्यानंतर त्या वातावरणाने तिला बरंच शांत आणि समजूतदार केल्याचं गौरी आवर्जून सांगतात.
गौरी आणि गायत्री या दोघांनाही दु:खाच्या नाळेने एकत्र बांधून ठेवलंय. नातेसंबंधांवरचा विश्वास उडत चाललेला असतानाच अवचित आलेल्या गायत्रीने त्यांच्यातल्या आईपणाला हळुवार फुंकर घातली. तिच्या बालपणात गौरी त्यांचेही बालपण जगल्या; कारण त्यांना स्वत:चं बालपण अनुभवताच आलं नाही. ‘‘मी लहान असतानाच माझी आई गेली. आई काय असते, हा अनुभव कधी आलाच नाही. घरी आई वाट बघतेय, कौतुक करतेय, हट्ट पुरवतेय, अशा सगळ्या भावनांनी माझ्या आयुष्यात कधी शिरकावच केला नाही. त्यात मी तृतीयपंथी असल्याचे लक्षात आल्यावर तर वडील, बहीण, भाऊ ही नातीही दुरावली. गायत्रीसाठी मी जे काही केलं ते कदाचित माझ्या आईने माझ्यासाठी केलं असतं असं आज वाटतंय.’’ म्हणत त्यांनी भरून आलेल्या डोळ्यांना मोकळी वाट करून दिली आणि दुसऱ्याच क्षणी वास्तवाला स्वीकारत गोड हसत गप्पा सुरू केल्या..
समाजाने ‘हिजडा, छक्का, मामू’ म्हणत गौरीला, तर ‘तेरी माँ तो रं थी’ म्हणत गायत्रीला प्रत्येक टप्प्यावर ठेचकाळलंय. विखारी वास्तवाची जाणीव करून देण्यात समाज कुठेच मागे पडलेला नाही. गौरीच्या बाबतीतही तर खूप आधीपासून ते घडलं. सुरुवातीच्या काळात तृतीयपंथीय असण्याने त्यांना केवळ दु:खं आणि वेदनाच दिली. यातूनच गौरीमध्ये सगळं काही झुगारून देण्याची भावना दाट झाली होती. आपल्याला नाकारणाऱ्या समाजाविषयी तुच्छता आणि घृणा मनात काठोकाठ भरली होती. लहान वयात आपल्या लैंगिकतेविषयी काहीच माहीत नसल्याने आधीच गोंधळलेल्या परिस्थितीत वडील आणि घरच्यांनी संबंध तोडले. नेसत्या कपडय़ांनिशी घराबाहेर पडलेल्या गौरी कित्येक वर्षे एकटय़ा राहत होत्या. शारीरिक अत्याचार, भूक, गरिबी अशा काटय़ाकुटय़ांतून कणखरपणे उभ्या राहिल्या स्वत:साठी आणि आता तर ‘सखी चार चौघी’ या संस्थेच्या माध्यमातून इतर सहअनुभवींसाठीही.
दत्तकविषयक कायदा असला तरी आजघडीला अनेक तृतीयपंथी कित्येक अनाथ मुलींचा सांभाळ करत आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहेत. हॉस्टेलला ठेवून त्यांना स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही तर माणूस म्हणून घडवण्याची धडपड करत आहेत. गायत्री उद्या डॉक्टर, वकील किंवा काहीही झाली तरी या वातावरणातून पुढे गेल्यामुळे ती माणूस म्हणून संवेदनशील असेल याबाबत गौरी यांना खात्री आहे. वेश्यांच्या मुलींसाठी एक आश्रम बांधण्याची आणि हा आश्रम गायत्रीने चालवावा, अशी त्यांची इच्छा आहे.
मुलाखतीचा शेवट करताना त्या सांगत होत्या, ‘‘मातृत्वाची भावना ही लिंगभेदाच्या पलीकडली आहे. स्त्रीप्रमाणेच एखाद्या पुरुषालाही मातृत्वाचा अनुभव येतो. याला आम्हीही अपवाद नाही. आज मी गायत्रीची कागदोपत्री आई नसले तरी तिने मला आईपण दिलंय आणि तिला मी माझं नाव दिलेलं आहे, गायत्री गौरी सावंत!
आपली आई चारचौघींच्या आईसारखी नसली तरी ही आई तिच्या मनातील चित्रापेक्षा कशातही कमी नाही, याची जाणीव गायत्रीला निश्चितच आहे. तिच्याबरोबरचं नातं जपताना घरातल्या इतरांशीही तिचं चांगलं ‘बॉन्डिंग’ झालंय. लहानपणी कौतुकाने कानातले किंवा फ्रॉक आणून दिलेला, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा प्रत्येक तृतीयपंथी तिचे नातेवाईक आहेत. या सगळ्या कुटुंबाला जपत ती मोठी होतेय. गौरी सावंत यांनी स्वत:चं लैंगिक वेगळेपण ज्या संघर्षांतून स्वीकारलं तितकाच संघर्ष गायत्रीने सामान्य मुलगी असूनही केला आहे. ‘इन्सान का बच्चा’ म्हणून सांभाळलेली मुलगी ते ‘माझी मुलगी’ हा गौरी आणि गायत्री यांचा एकत्रित प्रवास निव्वळ विस्मयकारक आहे.
साभार : सदर लेख नम्रता भिंगार्डे यांनी लिहिला असून १३ मे २०१७ यादिवशी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये प्रकाशित झाला होता.
No Responses