प्रश्नोत्तरेसेक्सविषयी माझे काही प्रश्न

कृपया मी रोज हस्तमैथुन करतो त्यामुळे माझे लिंग डाव्या साईडला थोडे जास्त वाकडे झालेले आहे असे वाटते. त्याचबरोबर माझी सेक्स पाँवर खुपच कमी झालेली आहे मला नीट उतेजना पण येत नाही आणि सेक्स टाईम केवळ 1 मिनिट माझ लिंग ताठ राहत.तरी औषधौपचार सुचवावा. त्याच बरोबर माझ पायांच ऑंपरेट पण झालेय त्यामुळे जखमेच्या आणि हाड वाढीच्या गोळ्या पण चालू आहे. तर हा औषधौपचार चालेल का ? सांगावे आणि वाकडे लिंगाला योनीत जायला काही प्रॉब्लेम येईल का ?? माझी पत्नी संतुष्ट होईल का सेक्स केल्यावर माझ्याकडुन. प्लीज मार्गदर्शन करा

2 उत्तर

तुमच्या प्रश्नामध्ये अनेक उपप्रश्न आहेत आणि काही गैरसमज देखील. त्यातील एक एक घेऊन थोडंस विस्ताराने समजून घेऊयात.

१. खरंतर हस्तमैथुन आणि लिंग वाकडे होण्याचा काहीही संबंध नाही. हस्तमैथुनाविषयी आपल्या समाजात अनेक समज- गैरसमज आढळतात त्यातीलच हा एक. हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. आता राहिला प्रश्न लिंग वाकडे असण्याचा. लिंगातील वाकडेपणा हा बऱ्याच पुरुषांना सतावणारा प्रश्न असतो परंतु नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो. फार थोड्या पुरुषाचं लिंग अगदी सरळ असतं. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही किंवा गर्भधारणा होण्यासाठीही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो. फार काही त्रास होत नसेल तर काळजी करू नका. व्यक्ती तितक्या प्रकृती.

२. दुसरा मुद्दा सेक्स पॉवरचा. महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्स stamina वाढवण्याबद्दल तुमच्या मनात काही गैरसमज असेल किंवा न्यूनगंड असेल तर तो काढून टाका. मुळात जास्त वेळ संभोग केला म्हणजे जास्त आनंद मिळतो हा आपल्या समाजात सर्रास आढळणारा गैरसमज आहे. सेक्स ही एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. यामध्ये जोडीदाराबरोबर योग्य तो संवाद होणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची शरीरं, एकमेकांच्या लैंगिक इच्छा, अपेक्षा समजून घेणं खूप महत्वाचं असतं. बाजारात सेक्स stamina किंवा पॉवर वाढवण्याच्या नावावर विकली जाणारी अनेक औषधं उपलब्ध आहेत. परंतु योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणं धोकादायक ठरू शकतं. व्यायाम, योग्य आहार आणि मन आनंदी राहील अशा कृतींमुळे तुम्ही निरोगी राहू शकता. आणि तुमची तब्येत चांगली असेल तर सेक्समध्येही तुम्हाला जास्त आनंद मिळू शकेल. शरीरातलं रक्ताभिसरण सुरळित असेल तर लिंगाचा ताठरपणा आणि इतर क्रिया सुलभपणे होतात. सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठीची औषधं आजारावर उपाय म्हणून वापरली जातात. ज्यांना लिंगामध्ये ताठरपणा येत नाही त्यांच्यासाठी अशा औषधांचा उपयोग होतो. तशी काही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि सांगितलेल्या प्रमाणातच औषधं घ्या. लिगांचा ताठरपणा किंवा शीघ्रपतन याबाबत काही समस्या नसेल तर औषधं घेण्याची गरज नाही.

३. आता बोलूयात सेक्स टाइम बद्दल. संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते.

शीघ्रपतनाची अनेक कारणे आहेत. सेक्सविषयी भीती, अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.

शीघ्रपतन होऊ नये म्हणून सेक्सबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.

वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटवरील ‘शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…’ हा लेख जरूर वाचा. या लेखासाठी लिंक https://letstalksexuality.com/premature-ejaculation

४. तुमच्यावर जो औषधोपचार सुरु आहे त्याचा लैंगिक आयुष्यावर काही परिणाम होईल की नाही हे तुम्ही संबंधित डॉक्टरांशी बोला.

५. आता शेवटचा प्रश्न. तुमची पत्नी सेक्स केल्यावर संतुष्ट होईल का? आतापासूनच भीती, performance anxiety आणि तणाव कशाला ? लैंगिक संबंध म्हणजे युद्ध आहे का जिंकायला आणि हरायला? उगाचच अनावश्यक भीती बाळगण्यापेक्षा सुखकर लैंगिक संबंधांसाठी खालील गोष्टी नक्की लक्षात घ्या.

सर्वप्रथम तुमची आणि तुमच्या जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचाही विचार व्हायला पाहिजे. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचे काही ‘इरॉटिक पॉइंटस’ असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. आपल्या जोडीदाराला कोणत्या अवयवांना स्पर्श केल्याने किंवा कोणत्या लैंगिक कृतीतून सुख मिळते याविषयी संवाद साधा. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. किमान पहिली २० मिनिटं फोरप्ले करावा. तसेच ‘फोरप्ले’ मध्ये शिस्निकेला (मूत्रमार्गाच्या वरचा भाग) स्पर्श केल्याने स्त्रीला उत्तेजित होण्यास मदत होते. एकमेकांना उत्तेजित करून संभोग केल्याने तो दोघांसाठीही आनंददायी असू शकतो. लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास कारणीभूत ठरतात.

मिळाली ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं ? आणखी काही शंका असेल तर नक्की विचारा… मनातील गैरसमज दूर झाले आणि योग्य शास्त्रीय माहिती करून घेतलीत की भीती अपोआपच कमी होईल.

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!!

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 8 =