लैंगिक अवयव आणि लैंगिक संबंधांबद्दल वापरले जाणारे काही शब्द हे शिव्यांमध्ये वापरले जातात त्यामुळे एक प्रकारची नकारात्मकता येते. स्त्री पुरुष संबंधांसाठी प्रणय, सेक्स, लैंगिक संबंध यांसारखे पर्यायी शब्द आहेत. अनेकांना हे पर्यायी शब्द माहित नसतात हे मी समजू शकते पण असे शब्द आवर्जून शिकून घेतले पाहिजेत.
दोन व्यक्तींमध्ये होणारे लैंगिक संबंध म्हणजे सेक्स. यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय आणि संभोग अशा विविध प्रकारे लैंगिक संबंध ठेवले जातात. संभोग म्हणजे पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनिमध्ये प्रवेश करणे. यासोबतच मुखमैथुन, गुदामैथुन हेही संभोगाचे इतर काही प्रकार आहेत. याच्याबद्दलची माहिती उत्तराच्या शेवटी दिली आहे.
तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जास्त जवळ जावंसं वाटत असतं किंवा जेव्हा तुम्ही लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झालेले असता तेव्हा तुम्ही सेक्स करता किंवा तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते. सेक्स करण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये आणि शरीर संबंध ठेवण्यामध्ये पाप किंवा घाण असं काही नाही. आपली जवळीक आपण या क्रियांमधून व्यक्त करत असतो. मात्र ही जवळीक दोन्ही जोडीदारांच्या संमतीने व्हायला हवी.
विविध संस्कृतींमध्ये सेक्सविषयी, शरीर संबंधांविषयी काही लिखित अलिखित नियम असतात. सेक्सविषयी आपण मोकळेपणाने बोलू शकतो का नाही, त्या क्रियेबद्दल आपल्या मनात कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण होतात यावर आपल्या समाजातल्या नीतिनियमांचा परिणाम होत असतो. पण सेक्स करण्याची भावना ही अगदी नैसर्गिक भावना आहे आणि त्यात घाण असं काही नाही हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
सेक्स करणं किंवा शारीरिक जवळीक ही फक्त शरीराची क्रिया नाही. त्यात मानसिक आणि भावनिक गुंतवणूक होत असते. काही जणांसाठी सेक्स हे फक्त शारीरिक सुख मिळवण्याचा मार्ग असतो तर काहींसाठी प्रेम असल्याशिवाय सेक्सचा विचारही करणं गैर असू शकतं. तुम्हाला काय वाटतं ते तपासून पहा. ज्याच्यावर किंवा जिच्यावर तुमचा विश्वास आहे अशा व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवणं हा सुखद अनुभव ठरू शकतो. तुम्ही पहिल्यांदाच सेक्स करणार असाल तर हा विश्वास आणि मोकळेपणा फार महत्त्वाचा ठरतो. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला कशाने सुख किंवा आनंद मिळतो हे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आवर्जून बोला.
लैंगिक संबंध सुखकर असायला पाहिजेत. तसंच ते सुरक्षित असणंही आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे असे संबंध ज्यात जबरदस्ती नाही, ज्यामध्ये नको असलेल्या गर्भधारणेची भीती नाही, ज्यामध्ये एकमेकांना लिंगसांसर्गिक आजाराची लागण होण्याचा धोका नाही. ही काळजी घेतली तर आपले लैंगिक संबंध सुरक्षित मानता येतील. दोन्ही जोडीदारांना कशातून सुख मिळतं हे समजून घेतलं तर जबरदस्ती टाळता येईल. गर्भधारणा टाळायची असेल तर निरोध किंवा इतर गर्भनिरोधकांचा वापर एकमेकांच्या संमतीने केला तर तो धोका, भीती टळेल. एच आय व्ही, एच पी व्ही, ब प्रकारची कावीळ, गरमी, परमा आणि इतरही लिंगसांसर्गिक आजारांची लागण टाळण्यासाठी निरोधचा वापर करणं सर्वात उत्तम.
याविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील ‘सेक्स बोले तो’ हा सेक्शन वाचा.