या गोळ्या डॉक्टरांकडे आणि मेडिकलमध्ये वेगवेगळ्या नावाने उपलब्ध असतात. या गोळ्या प्रभावी असल्या तरी त्या रोज न विसरता घेणं गरजेचं आहे. तसंच दर 3 महिन्यानी मध्ये 1 महिना गोळ्या न घेता पाळी चक्र नीट काम करतंय का तेही पाहणं गरजेचं आहे. सलग वर्षानुवर्षं गोळ्या घेणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्यांचा वापर करा.
तोंडावाटे घेण्याच्या संप्रेरक गोळ्यांविषयी अधिक विस्ताराने जाणून घेऊयात. स्त्रीच्या पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन झाल्यानंतर म्हणजेच स्त्री बीज बीजकोषातून बाहेर येऊन बीजनलिकेत आल्यानंतर जर पुरुष बीजाचा त्याच्याशी संयोग झाला तर गर्भधारणा होऊ शकते. स्त्री बीज बीजकोषातून बाहेर येण्याची प्रक्रिया विशिष्ट संप्रेरकांवर अवलंबून असते. संप्रेरक गोळ्या किंवा तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्या स्त्री बीज बीजकोषातून बाहेर पडू देत नाहीत आणि त्यामुळे अर्थातच गर्भधारणा होऊ शकत नाही. तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या 28 दिवस पाळीच्या पाचव्या दिवसापासून रोज एक गोळी अशा रीतीने घ्यायच्या असतात. यातील 21 गोळ्या संप्रेरक असणाऱ्या आणि 7 गोळ्या लोहाच्या असतात. गोळ्या संपल्या की 1-2 दिवसात पाळी येते.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, नको असणारी गर्भधारणा टाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे. पण प्रत्यक्षात मात्र गर्भनिरोधक वापरण्याची सगळी जबाबदारी स्त्रीवरच टाकलेली दिसते. खरं तर पाळी चक्रातले काहीच दिवस स्त्री जननक्षम असते किंवा गर्भ धारणा होऊ शकते. पुरुषाच्या शरीरात मात्र रोज लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं तयार होत असतात आणि प्रत्येक वेळी वीर्यामध्ये पुरुषबीजं असतात. तसंच निरोध ही सर्वात सुरक्षित आणि निर्धोक गर्भनिरोधक पद्धत आहे. त्यामुळे लैंगिक संबंधांबरोबर गर्भनिरोधनामध्येही स्त्रीप्रमाणे पुरुषाचा तितकाच सहभाग असायला पाहिजे.
पुरुषांनी वापरायचा निरोध किंवा कंडोम हे सर्वात सुरक्षित गर्भनिरोधक आहे. निरोध लॅटेक्सपासून बनवलेला असतो आणि तो अतिशय चिवट व लवचिक असतो. लैंगिक संबंधांमध्ये जेव्हा पुरुषाचं लिंग ताठर होतं तेव्हा निरोध उलगडून लिंगावर चढवायचा असतो. संभोगानंतर वीर्य निरोधमध्ये गोळा होतं. वीर्य त्यातून बाहेर येणार नाही याची काळजी घेऊन निरोध लिंगावरून काढायचा व त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची. निरोध हे सर्वात सुरक्षित गर्भनिरोधक आहे. गर्भनिरोधन करण्यासोबतच निरोध लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांपासूनही बचाव करतो. शविशेष म्हणजे कंडोम वापरल्याने लैंगिक सुखात काहीच अडचण येत नाही.
गर्भनिरोधाकांविषयी अधिक जाऊन घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.