स्त्रीचं शरीर म्हणजे काही मशीन नाही. डेट सेट केली की दिवस जाणार किंवा जाणार नाहीत. स्त्रीच्या मासिक पाळीच्या काळात काहीच दिवस असतात जेव्हा स्त्रीला दिवस जाऊ शकतात. ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि दिवस जाऊ द्यायचे नसतील तर कॅलेंडरपेक्षा कंडोमचा वापर करा. पाळी आल्यानंतर, येण्याआधी, पाळी चालू असताना कधीही जर कंडोम वापरलात तर दिवस जाण्याचं टेन्शन नाही. कंडोम नीट वापरलात तर टेन्शनचं कारण नाही.
दुसरी गोष्ट – fuck करणे ही टर्म आदराने किंवा प्रेमाने वापरली जात नाही. सेक्स किंवा लैंगिक संबंध एकमेकांचा आदर ठेऊन, प्रेमाने, शरीराने आणि मनाने करण्याची बाब आहे. जोडीदारांची इच्छा आणि तयारी आवश्यक असते. त्यामुळे फक्त दिवस जाऊ नये याची काळजी घेतली की झालं असं नसतं. त्यामुळे fuck करणे असं न म्हणता सेक्स करणे किंवा संबंध ठेवणे असं म्हणायची सवय करा.
दिवस कसे आणि कधी जातात ते समजून घ्या.
दिवस जाण्यासाठी म्हणजेच गर्भ राहण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात, पुरुषाचं बीज (शुक्राणू किंवा इंग्रजीत स्पर्म जे संभोगाच्या वेळी लाखोंच्या संख्येने वीर्यावाटे स्त्रीच्या योनीमध्ये शिरतात), स्त्री बीज (जे पाळी चक्रात एकदाच अंडकोषातून बाहेर बीजनलिकेत येतं आणि 24 तास जिवंत राहतं) आणि योनीमार्गातला व गर्भाशयाच्या तोंडाजवळचा जननक्षम स्राव. या तीन गोष्टी एकाच वेळी जर असल्या तर दिवस जाण्याची शक्यता सर्वात जास्त. स्त्रीच्या मासिक पाळीमध्ये जेव्हा स्त्री बीज बाहेर येतं त्याच्या आधी काही दिवस आणि नंतर काही दिवस घडतं.
हा काळ ओळखायचा कसा?
पाळी येण्याच्या साधारण 12-16 दिवस आधी अंडोत्सर्जन होतं. इंग्रजीत याला ovulation म्हणतात. प्रत्येकीचं पाळी चक्र वेगवेगळं असतं. कुणाचं पाळीचक्र जर 30 दिवसांचं असेल तर 14-18 दिवसादरम्यान अंडोत्सर्जन होणार आणि पाळी दीड महिन्यांनी येत असेल तर अंडोत्सर्जन 30-34व्या दिवशी होणार. आणि पाळी समजा 21-22 दिवसांनी येत असेल तर अगदी सातव्या-आठव्या दिवशीच अंडोत्सर्जन होणार. आपलं पाळीचं चक्र ओळखलं तर हे गणित सोडवायला जरा सोपं जाईल. अंडोत्सर्जन कधी होतं ते कळलं तर त्याच्या आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस संबंध टाळा.
हे झालं बाईचं. पुरुषाचं काय?
बहुतेक वेळा जेव्हा लिंग ताठर होऊन त्यातून वीर्य बाहेर येतं, तेव्हा त्यात लाखोंच्या संख्येनं पुरुष बीजं असतात. गर्भधारणेसाठी त्यातलं केवळ एक बीज पुरेसं असतं. ते अडवलं तर पाळीच्या कोणत्याही काळात सेक्स करा, दिवस जाण्याची शक्यता नक्कीच कमी करता येईल.
ttp://letstalksexuality.com/contraception/ वाचा आणि नको असणारी गर्भधारणा कशी टाळता येऊ शकते ते अधिक जाणून घ्या….
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा