प्रश्नोत्तरेMasik pali yeun 1 mahina aani 15 dicvs zale

1 उत्तर

१. गर्भधारणा हे एक पाळी चुकण्याचं कारण आहे. योग्य ते गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबध आले असतील. प्रेग्नन्सी आहे का याची खात्री करा. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर योग्य त्या वैद्यकीय सल्ला घेऊन गर्भपात करणे हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी. गर्भापाताविषयीच्या माहितीसाठी ‘मर्जी हेल्पलाइन – सोमवार ते शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 6 फोन- 9075 764 763’ येथे फोन कर.

२. गर्भपातासाठी कृपया वैद्यकीय सल्ल्याशिवाय इतर कोणीही सुचविलेली गोळ्या, औषधे किंवा इतर घरगुती उपाय करू नका. अशा उपायांनी खात्रीशीर गर्भपात होण्याची शक्यता कमी असते शिवाय त्याचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

३. गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात. आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.

काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.

अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/ आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.

टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 3 =