लैंगिक अवयाांसाठी तुम्ही जो शब्द वापरला आहे असे शब्द सहसा शिव्यांमध्ये येतात आणि म्हणून त्यात एक नकारात्मकता येते. तसेच हे शब्द हिंसक आणि अतिशय अपमानकारक वाटतात. काहीजणांना पर्यायी शब्द माहित नसतात, हे मी समजू शकते पण जाणूनबुजून असे शब्द वापरले जात असतील तर ते ताबोडतोब थांबवले पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय याच्यामध्ये मी जाणार नाही पण समोरच्या व्यक्तीला देखील छान वाटावं, तुमच्याशी लैंगिकतेबद्दल बोलावसं वाटावं यासाठी पर्यायी शब्द वापरण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करावा.
स्त्रीच्या लैंगिक अवयवाला योनी आणि इंग्रजीमध्ये vagina असे म्हंटले जाते. लैंगिक अवयवांच्या ठिकाणी केस येणे अगदी नैसर्गिक आहे. लैंगिक अवयवांच्या आजूबाजूचे केस लैंगिक अवयवांचं रक्षण करत असतात. लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणंही जरुरीचं आहे. स्वच्छता ठेवण्यासाठी ते वाढू न देणं आणि त्यामध्ये घाण जमा होऊ न देणं गरजेचं असतं. लैंगिक अवयवांची स्वच्छता राखण्यासाठी हे केस कापले तरी चालतील. हे केस पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नसते. केस कापताना लैंगिक अवयवांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जसं टोकदार कात्री वापरु नये. तसंच ब्लेडचा वापर शक्यतो टाळावा. कात्रीचा वापर करून ते बारीक कापता येऊ शकतात. ब्लेडने इजा होऊ शकते त्यामुळे त्याऐवजी कात्री ववापरणे चांगले.
काहीजण वीट किंवा इतर क्रीमचा वापर करतात. हर्बल किंवा इतर कोणत्याही क्रीममध्ये काही रसायनं असतात ज्याचा लैंगिक अवयवांच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यातून खाज आणि आग होऊ शकते. त्यामुळे क्रीमचा वापर टाळणं चागलं. लैंगिक अवयवाच्या आजूबाजूला हे क्रीम वापरण्याआधी तुम्हाला ते सूट होते का हे बघण्यासाठी हातावर किंवा पायावर ते वापरून बघावे. आपल्या वेबसाईटवर याविषयीचे काही प्रश्न चर्चिले आहेत ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.