No one saves us but ourselves. No one can and no one may. We ourselves must walk the path.
– Gautama Buddha.
एका लहान गावातील मुलाची ही कथा. त्याचं नाव अक्षय. अकरावीत असणारा अक्षय साध्या, मध्यमवर्गीय घरातला. अभ्यासात तसा फार हुशार नव्हता. त्याची आवड गड किल्ले फिरण्यात, फोटोग्राफी करण्यात, निसर्गात रमण्यात होती. कॉलेजमध्ये असताना अक्षयला त्याच्याच वर्गातली एक मुलगी आवडत असे. तो तिला कॉलेजमध्ये जाता येता बघायचा, तिला बघून त्याला छान वाटायचं, मनात वेगळ्याच प्रकारची भावना यायची, ती दिसणार या भावनेनं रक्ताचा प्रवाह अचानक वाढल्यासारखा वाटायचा. त्याच्या मित्रांना ते माहिती होतं. ते सगळे त्याला चिडवायचे, गम्मत चालायची! मित्रच ते! हळू हळू त्याच्या मनात कुठेतरी खरंच त्या मुलीबद्दल मैत्री पलीकडचं आकर्षण निर्माण झालं आणि काही दिवसांनी या “प्रकरणा”बद्दल कॉलेजमधील सर्वांना कळलं. एक दिवस संध्याकाळी अक्षय त्याच्या क्लासमधून बाहेर आला. संध्याकाळ होती, अंधार पडला होता. क्लासच्या गेटवर मित्रांबरोबर गप्पा मारताना एक मजबूत बांध्याचा मुलगा मोटरसायकलवरून आला. तुमच्यातला अक्षय कोण? असं त्याने विचारले. अक्षय पुढे आला. आणि काही कळायच्या आतच मजबूत बांध्याच्या त्या मुलाने मोटरसायकलवरून उतरून जोरात अक्षयच्या कानशिलात भडकावली. आणि म्हणाला “ऐक रे… (मुलीचे नाव घेऊन) माझी आयटम आहे. आणि तिच्याकडं जर का नजर टाकलीस तर बॉडीचा एक एक पूर्जा ढिला करीन… चांगल्या घरातला आहेस, नादाला लागू नकोस.” तो गुंड मुलगा निघून गेला पण अक्षयला प्रचंड अपमानास्पद वाटत होतं. कान पण दुखत होता. त्याचे मित्र तिथे त्याला काहीच बोलले नाहीत. किंवा त्याची मदत करायलादेखील कुणीच पुढे आलं नाही. घरी आल्यावर त्याला प्रचंड अपमान आणि भीती वाटत होती. घरी सांगायची पण पंचाईत होती.
थोड्या दिवसांनी ही घटना कॉलेजमध्ये वणव्यासारखी पसरली. मुलं जाता येता त्याला चिडवायची… “अरे काय तू… पोरीसारखं ऐकून घेतलंस” म्हणायची… त्याला खूप अपमानास्पद वाटायचं. या सर्व प्रकरणाचा अक्षयच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की त्यानंतर अगदी नोकरी लागेपर्यंत त्याला मैत्रीणच नव्हती. ते सगळं प्रकरण त्याला इतकं वाईट भोवलं होतं की त्याने ना कधी कोणत्या मुलीशी मैत्री करायचा प्रयत्न केला ना कधी कुणाला प्रपोज करण्याच्या फंदात पडला. एक प्रकारचा न्यूनगंड त्याच्या मनात बाणावला ज्यातून तो आजही बाहेर पडलेला नाही. आजही जर कुणी मुलगी, अगदी मैत्रीण म्हणून का होईना पण आपल्या खूप जास्त क्लोज येत आहे असं अक्षयला जाणवतं तेव्हा तो दोन पावलं मागं जातो, मुलींशी बोलायला कचरतो…
एका सत्य घटनेवर आधारित ही गोष्ट आहे. आणि अक्षयवर झालेला परिणाम हा त्या घटनेचा आउटकम आहे. याबद्दल इथे लिहिण्याचे कारण म्हणजे मध्यंतरी ‘आय सोच टीम’ने पुणे शहरातील विविध महाविद्यालयांच्या एन एस एस कँम्पमध्ये ‘बुलिंग किंवा छळ व त्याचे परिणाम’ याविषयी घेतलेल्या कार्यशाळेअंतर्गत अशाच काही सत्य घटना मुला-मुलींना दिल्या. ज्याचे परिणाम त्यांना माहिती नव्हते. या घटनांचे परिणाम काय झाले असतील यावर चर्चा करून ते परिणाम मुला-मुलींना नाटिकेच्या माध्यमातून सादर करण्यास सांगितले. तेव्हा बहुतांश मुलांनी अक्षयबरोबर घडलेल्या घटनेचा परिणाम म्हणून एक तर अक्षय त्याला मारलेल्या मुलाचा बदला घेतो किंवा वैतागून आत्महत्या करतो, कॉलेजमध्ये जाणे बंद करतो अशा आशयाच्या नाटिका सादर केल्या. वास्तवामध्ये अक्षयने असं काहीच केलं नाही. त्या घटनेनंतर त्याने त्याच्या आईची, भावाची मदत घेतली, त्यांच्यामार्फत त्या गुंड मुलाशी बोलणं करून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली. आणि आजही जरी अक्षय त्याच्या न्यूनगंडासोबत लढत असला तरी त्याने बदला घेणे किंवा नात्यांबद्दल सिनिकल अप्रोच ठेवणं, डिप्रेस होऊन आत्महत्येचा विचार करणे असं काहीच केलं नाही मग १३ कँम्सपैकी काही मोजके कँम्प सोडले तर बहुतांश कँम्समधील मुलांच्यात बदला किंवा स्वतःला इजा अशा प्रकारची भावना का दिसावी?
खरंतर सर्वच घटनांवर आधारीत नाटिकांमध्ये मुलांनी दाखवलेले परिणाम आत्महत्या किंवा बदला या स्वरूपाचे होते त्यावरून प्रश्न असा पडतो की हिंसेचे उत्तर हिंसा हेच कसे असू शकते? किंवा अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुलं पालकांची किंवा शिक्षकांची मदत का घेत नाहीत? कदाचित असं तर नाही ना की कुठेतरी आपणच एक समाज म्हणून त्यांच्याशी संवाद करायला किंवा एक निकोप व्यवस्था बनवायला कमी पडलोय किंवा पडतोय?
मुळात अशा प्रकारच्या घटना कॉलेज पातळीवर घडणे हे नवीन नाही. लैंगिक आकर्षण, त्यावरून एकमेकांना चिडवणे, पजेसीवनेस, जेलसी, दुर्बल व्यक्तीवर शक्तीचा वापर करून त्याच्या/तिच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची मानसिकता हे मानवी भाव-भावनांचे कंगोरे आहेत आणि वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर काही जण त्यातून जात असतात आणि ती एक नैसर्गिक गोष्ट आहे परंतु त्या गोष्टीला जेव्हा सामाजिक प्रतिष्ठा मिळते तेव्हा मात्र त्या गोष्टी अमानवीय रूप धारण करताना दिसतात. म्हणजे जर एखादी व्यक्ती मला आवडते म्हणून तिला/त्याला देखील मी आवडायलाच हवा किंवा दुसरे कुणीही त्याच्या/तिच्याशी संबंध ठेवायचेच नाहीत आणि जर का माझ्या मनाप्रमाणे होत नसेल तर एकतर मी स्वतःला संपवतो किंवा जो माझ्या आणि त्या व्यक्तीच्या मध्ये येतोय त्याला संपवतो ही भावना किंवा माझ्याकडच्या शक्तीचा वापर करून दुर्बल व्यक्तीला नियंत्रणात ठेवणे, जातीचा, धर्माचा अभिमान बाळगून दुसऱ्यांना कमी लेखणे हे नैसर्गिक नक्कीच नाही. म्हणजे आपल्याला एक समाज म्हणून हा विचार करायला हवा की अशा प्रकारच्या भावना कुठेतरी आपणच निर्माण केलेल्या सामाजिक बंधनं किंवा सामाजिक दबावांमुळे तर निर्माण होत नाहीये ना? दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जो निर्णय घेतो त्या निर्णयाचे short टर्म किंवा long टर्म मध्ये काय परिणाम होऊ शकतात याबद्दल विचार करण्यामध्ये मुलं-मुली कुठेतरी कमी पडतात का? तसं होण्यामागे कदाचित अनेक कारणं असू शकतात ज्यामध्ये दुरावलेली नाती, वर्चुअल मिडियाद्वारे वाढलेला आणि ह्युमन लेवल वर कमी झालेला संवाद, योग्य तो सल्ला मिळण्यासाठी जरुरी असणारे सोर्स उपलब्ध नसणे, समस्येचं निराकरण “तात्काळ” व्हावं ही इच्छा, फार प्रयत्न न करता, स्वतःच्या गुणदोषांकडे दुर्लक्ष करून आपल्यावर झालेल्या अन्यायाला दुसऱ्यांना दोषी ठरवण्याचा सोपा मार्ग, समस्येचं निराकरण करण्यासाठी शॉर्टकट अवलंबण्याची मानसिकता इत्यादी. परंतु या कारणांमुळे आपण परिस्थितीसमोर खचून जावे की ज्या गोष्टी बदलणार नाहीत त्या स्वीकारून, त्यांचा सामना करून, सेल्फ अॅनॅलीसीस करता करता स्वतःला इम्प्रूव करावे? स्वतःला संपवणे किंवा बदला घेणे हा “उपाय” नक्कीच असू शकत नाही. किंवा कुणीतरी येऊन आपली मदत करेल आणि आपल्याला आपल्यावर ओढवलेल्या मिजरेबल कंडीशनमधून बाहेर काढेल अशी अपेक्षा धरणेदेखील तितकेच अयोग्य आहे कारण काहीही झालं तरी शेवटी बाहेरची व्यक्ती केवळ आपल्याला मार्ग दाखवू शकते किंवा आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीबद्दल सहानुभूती दाखवू शकते पण परिस्थीतीचा सामना आपल्यालाच करावा लागतो मग त्यासाठी स्वतःमध्ये काही बदल घडवावे लागले तरी बेहत्तर!
पण आताच्या तरुण मुला-मुलींना हीच गोष्ट कुठे तरी समजत नाहीये का? आणि जर का समजत नसेल तर एक व्यवस्था म्हणून आपण सगळेच त्याला जबाबदार नाही का?
No Responses