भारतीय उपखंडाच्या पश्चिमेस सलग असलेला भूभाग म्हणजे हल्लीचा इराण, पूर्वीचा पर्शिया. इतिहासकाळात जी मानवी समूहांची स्थलांतरे झाली त्यामध्ये कधीकाळी हे समूह एकत्र होते आणि कालांतराने काही पर्शिया तर काही भारतीय उपखंडामधे स्थिरावले असे मानण्यास जागा आहे. जिज्ञासूंना अधिक तपशील इराणमधील भारतीय दूतावासाच्या संकेतस्थळावर मिळू शकेल. http://www.indianembassy-tehran.ir/pages.php?id=17
पर्शियामधील धर्मसंस्थापक झरथुष्ट्र हा जगातील पहिला तत्त्ववेत्ता गणला जातो. त्याचा जीवनकाळ वर्तमानपूर्व १५०० ते १००० या कालखंडात धरला जातो. त्याची वचने अवेस्ता या ग्रंथात संग्रहित करण्यात आली. पारशी लोकांचा तो धर्मग्रंथ आजही आहे. ऋग्वेद व अवेस्ता यांच्या भाषा, देवता व विचार यांच्यातील साम्यस्थळे यावर पुण्यातील वैदिक संशोधन मंडळात संशोधन केले गेले आहे. त्यावरून आकाशातील देव, पहाटेची उषादेवी, पर्जन्याची देवता इ. दोन्हीकडे आपल्याला आढळतात. त्यांच्यासाठी योजलेल्या शब्दातही साम्य आहे, जसे उषस् आणि देव, किंवा असुर व आहूरा. फरक एवढाच की आपण देव हे चांगले आणि असुर हे दुष्ट समजतो, तर पर्शियन बरोबर उलट समजतात. अवेस्तामधील मूळ प्रतिपादन असे आहे की सत्य आणि असत्य यामधून माणसाला सतत निवड करावी लागते. ते करता यावे म्हणून माणसाला विवेकबुद्धी मिळाली आहे. तिचा वापर करून माणसाने सदैव चांगले विचार-उच्चार-आचार जागरूकपणे प्रत्यक्षात आणले पाहिजेत. आता कालचक्र फिरवून आपण एकदम दोन हजार वर्षे पुढे येऊ.
वैदिक यज्ञयागादी परंपरांना जैन-बौद्धादी धर्मांकडून आव्हान उभे राहिल्यानंतर भागवतधर्म परंपरेचा उदय वर्तमानगणनेच्या दहाव्या अकराव्या शतकात झाला. ही लोकांपर्यंत पोचण्यासाठी सरळसोप्या भक्तिमार्गाचा पुरस्कार करणारी परंपरा होती. पुराणकाळातील महान व्यक्तिरेखांचे दैवतीकरण कथा-कहाण्यांच्या माध्यमातून या पुराणांतून केलेले आढळते. पुराणांची संख्या अठरा समजतात. त्यांचे रचनाकार विखुरलेले आणि बह्वंशी अज्ञात. परंतु ते सर्व पुरोहितशाहीचे हितसंबंध सांभाळणारे असावेत, कारण ही पुराणे संस्कृत भाषेत रचली गेली आणि राजेरजवाड्यांचा गुणगौरव त्यात दिसून येतो. त्यातले भागवतपुराण हे अत्यंत प्रसिद्ध पुराण. बारा स्कंध, ३३२ अध्याय आणि १६००० श्लोक एवढा या पुराणाचा विस्तार आहे. श्रीकृष्णाच्या लीलांचे सुरस वर्णन करताना सूत्र मात्र या अवताराद्वारे अधर्माचे उच्चाटन व धर्माची संस्थापना हेच ठेवले आहे. ईश्वर मनुष्यरूप धारण करून जगात अवतार घेतो ही कल्पना दूरस्थ देवता व अमूर्त तत्त्वे यापेक्षा समजण्यास सोपी असल्याने पौराणिक कथानके नुसतीच लोकप्रिय झाली असे नसून ती स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून आजही भारतीय उपखंड व आग्नेय आशियामध्ये टिकून आहेत. अर्थात अवतारकल्पनेमुळे लोकांच्या इच्छाशक्तीचे व क्रियाशक्तीचे काय होते हे आपण पाहतो आहो. अशापैकी एक कथानक म्हणजे समुद्रमंथन.
समुद्रमंथनाचे शिल्प कंबोडियातील अंगकोर वाट मंदिरसमूहात तसेच थायलंडची राजधानी बॅंकाकच्या विमानतळावर आज पाहावयास मिळते. भागवत पुराणातील कथानक असे आहे. असुरांबरोबरच्या लढाईत बरेच देव मारले गेल्यानंतर इंद्र व वरूण यांनी देवांबरोबर विचारविमर्श केला, पण काही उपाय न सापडल्यामुळे ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मा म्हणाले की शंकरासहित सर्व देव, असुर, चराचर सृष्टीचा जो निर्माता त्या जगन्नियंत्याचे आपण पाय धरू. त्याच्या लेखी न कुणाला तुडवायचे न कुणाला वाचवायचे असते. तो न कुणाला पूजतो, न कुणाला अव्हेरतो. सत्त्वगुणाचा उदय होण्यासाठी तो अवतार धारण करतो. दूधसागरामधील पांढऱ्या बेटावरील कधी न पाहिलेल्या प्रभूची ब्रह्मदेवाने आराधना केली. त्या प्रदीर्घ आराधनेनंतर प्रकट होऊन जगन्नियंत्याने देवांना समुद्रमंथनासाठी असुरांबरोबर समेट करण्यास सांगितले. “तुम्ही असुरांसह समुद्रमंथनाच्या उद्योगाला लागा, मग अमृत प्राप्त झाल्यावर तुम्ही अमर व्हाल. या घुसळण्यातून बऱ्याच वस्तू बाहेर येतील. विष निघाले तर बिचकू नका अन् रत्ने निघाली तर हपापू नका.” इतके सांगून जगन्नियंता अंतर्धान पावला. देव मग असुराधिपती बळी याजकडे गेले. कधी लढायचे व कधी समझोता करायचा यात बळी हा मोठा धूर्त धोरणी होता. त्याने देवांचा प्रस्ताव स्वीकारला. ठरल्याप्रमाणे कामाला सुरुवात झाली. देव व असुर यांनी मंदार पर्वत मुळातून उखडला आणि क्षीरसमुद्रापाशी आणला. पण मधे घडले असे की तो आणताना दमछाक होऊन तो खाली ठेवताना बरेच देव नि असुर त्याच्या खाली चिरडले गेले. मग भगवंत गरूडावर बसून तेथे येते झाले. त्यांनी मेलेल्यांना जिवंत केले. त्यांनी एका हाताने पर्वत उचलून गरूडाच्या पाठीवर ठेवला आणि समुद्रकिनारी आणून ते पुन्हा अंतर्धान पावले.
वासुकी नागाचा दोर करून घुसळण्यावेळी असुरांनी त्याचा डोक्याचा भाग धरायला मागितला, कारण वेदज्ञान व कर्तृत्व या दोन्हीत ते श्रेष्ठ होते. देवांकडे शेपूट आले. देव-असुर हे दोघे स्वत:ला कश्यपाचे पुत्र समजत. मंदार पर्वत वजनाने भारी असल्याने निसटून समुद्रात बुडाला. पुन्हा भगवंत अवतरले आणि कासवाचे रूप धारण करून त्यांनी पर्वतउचलून पाठीवर पेलला. मंथनात हलाहल विष बाहेर आले. देव व त्याचे प्रजापती यांनी शिवास विनविले. त्याने ते ओंजळीत घेऊन पिऊन टाकले. मग बाहेर आले कामधेनू गाय, उच्चै:श्रवा घोडा, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी व पारिजात पुष्प. त्यानंतर आल्या अप्सरा, ज्या स्वर्गात मनोरंजनाचे काम करतात. मग विजेसारखी चमकली रमा अर्थात लक्ष्मी. सारे जण तिच्या सौंदर्याने मोहित झाले. तिचे थाटात स्वागत व पूजन करून तिला दागिने वस्त्रे देण्यात आली. तिने एक कमळांचा हार घेतला व ती उपस्थितांकडे वळली. या ठिकाणी पुराणकार तिच्या वक्षभाग व निमुळत्या कमरेचे वर्णन करण्यास कचरत नाहीत. तिने विचारपूर्वक विष्णू मुकुंदाची निवड केली व त्याच्या गळ्यात वरमाला घातली. त्याबरोबर वाद्ये वाजू लागली, अप्सरांचे नर्तन सुरू झाले. देवांकडून फुलांचा वर्षाव होऊ लागला. असुर मात्र खिन्न मुद्रेने पाहात राहिले.
पुन्हा मंथन सुरू होताच एक तगडा देखणा काळ्या रंगाचा पुरुष बाहेर आला, तो होता धन्वंतरी – वैद्यकविद्येचा प्रणेता. त्याच्या हातात होता अमृतकुंभ. तो पाहताच असुरांनी धाव घेऊन कुंभ हिसकून घेतला. देवांनी भगवंताचा धावा केला. “काळजी करू नका, वत्सांनो, पहा कळी कशी धमाल करतो”, भगवंत म्हणाले. असुरांमधे कोण अमृत आधी पिणार यावरून जुंपली. मग जे त्यातले दुबळे होते, ते असुर म्हणू लागले, “देवांनी पण घुसळण्यात भाग घेतलाय, तेव्हा त्रिकालाबाधित न्यायाच्या तत्त्वाने त्यांना देखील यात वाटा मिळायला हवा.”
एवढ्यात विष्णू भगवंतांनी मोहिनीचे रूप धारण केले. पुराणकारांनी आठव्या स्कंधाच्या आठव्या अध्यायातले ४१ ते ४६ हे सहा श्लोक तिच्या सौंदर्याचे वर्णन करण्यात खर्ची घातलेत. आभूषणांनी सजलेले तिचे अवयव असुरांचे लक्ष वेधून घेत होते, तर तिचे लाजरेबुजरे स्मितहास्य नि कटाक्ष त्यांची कामभावना उद्दीपित करीत होते.
“तुला आमचे मनोविनोदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे, हे आम्हाला समजते. पण आता झाले असे की एकाच कश्यप या मूळपुरुषापासून देव नि आम्ही असुर उत्पन्न झालो असलो तरी अमृतसेवनावरून आमच्यात तंटे होत आहेत. तर तू हा कुंभ घेऊन सर्वांना अमृताची समान वाटणी करावीस.” त्यावर मोहिनी उत्तरते,”हे कश्यपवंशीयांनो, मी तर एक वेश्या आहे. शहाण्या पुरुषाने स्त्रियांवर विश्वास टाकू नये म्हणतात. जनावरांना ज्या प्रमाणे कामक्रीडेसाठी नवनवीन सोबती रोज लागतात, तद्वत माझ्यासारख्या स्वैरिणीला देखील नवीन सोबती लागतात. तेव्हा माझ्यावर विसंबणे जोखमीचे आहे.” असुरांनी तिचे बोलणे थट्टामस्करी समजून अमृतकुंभ तिच्या हाती सोपवला. स्नानसंध्या करून नवीन वस्त्रे परिधान करून देव आणि असुर समोरासमोर रांगेत बसले. हातात कुंभ घेऊन आपल्या अवयवांच्या पुष्टतेमुळे मंदावलेली चाल अधिकच कामुक भासवत मोहिनी देव-असुरांना घायाळ करीत होती. त्यातच तिचा पदर वक्षभागावरून घसरावा! मग असुरांच्या पात्रात अमृत पडलेच नाही. परंतु मोहिनी नाराज होऊ नये एवढ्यासाठी ते गप्प बसले. देवांनी अमृतप्राशन केल्यावर भगवंतानी आपले मूळ रूप धारण केले असा हा कथाभाग आहे.
स्त्रीसौंदर्याचा राजकीय संघर्षात वापर केल्याचा हा इतिहासकाळातला पूर्वीचा दाखला. आधुनिक काळात याला हनीट्रॅप म्हणजे मधाळ सापळा असे म्हटले जाते. पुरुषांची दडपलेली कामभावना तसेच स्त्रियांवर हुकमत गाजवण्याची, विजय मिळवण्याची ईर्षा हा या सापळ्यांचा आधार असतो.
त्यात दहाव्या शतकापर्यंत स्थिर झालेली वेश्या-गणिका-देवदासी ही संस्था मोहिनी रूपाने पुराणात आढळते. समुद्रमंथनप्रसंगी अप्सरा आहेत, लक्ष्मी आहे, त्या सौंदर्यवती आहेत. पण असुरांवर मोहिनी टाकण्यासाठी एका वेश्या पात्राची योजना कथेत करावी लागली. यावरून काम ही वासना आहे अन् तिचे शमन करण्यासाठी गणिका आहेत. ती पत्नी होऊ शकत नाही. संततीप्राप्तीसाठी पत्नी आहे. तिने पतीशी एकनिष्ठ राहायचे. गणिका ही गणाची म्हणून कुणा एकाची होऊ शकत नाही. ही विभागणी आपल्याला अगदी अलीकडे पर्यंत “साहिब, बीबी और गुलाम”(१९६२), “पति, पत्नी और वो”(१९७८) धर्तीच्या चित्रपटांमधून दिसून येते.
या विभागणीचा आणखी एक पैलू म्हणजे कामभावनेला संसारबाह्य ठरविले की स्त्रियांच्या गुणांची पण विभागणी होते. पत्नीचे गुण शालीनतेत मोजले जातात. स्त्रीसौंदर्य हे देहावयवांशी निगडित होते. त्यांची तपशिलात वर्णने होऊ लागतात. माॅडेलची मोजमापे काढली जातात. स्त्री म्हणजे तिचे शरीर. निसर्गत: वाटणाऱ्या शारीरिक आकर्षणाचा वापर व्यापारी कारणांसाठी आकर्षकता वाढवण्यासाठी केला जातो.
समुद्रमंथनाला पर्शिया (इराण) व भारतात इतिहासपूर्व काळापासून चालत आलेल्या सागरी व्यापाराचा संदर्भ असावा असे दिसते. व्यापार ही अशी गोष्ट आहे की त्यात सहकार्य व कुरघोडी या दोन्ही हातात हात घालून चालत असतात. अशा वेळेस वापरले जाणारे डावपेच वरवर पाहता सहकार्याचे पण त्याच वेळेस आपले हितसंबंध जागरुकतेने जपणारे असतात. मोहिनीचा प्रयोग म्हणूनच चपखल बसतो. धन्वंतरींचा उल्लेख मौर्यांच्या दरबारी आलेल्या पर्शियन वैद्यांकडे निर्देश करतो, तर भारतातून निर्यात होणाऱ्या हस्तिदंताकडे ऐरावताचा उल्लेख सूचित करतो. पर्शियन साम्राज्यामधे नृत्य व दरबारी नर्तकींची परंपरा प्राचीन काळापासून होती, असे मानण्यास जागा आहे. असुर हे मोहिनीच्या मोहक हालचालींना फसतील अशी अटकळ ही त्यामुळे बांधली गेली असावी.
No Responses