FAQ – प्रश्न मनातले पालकांसाठी

शंका, प्रश्न, चिंता, टेन्शन…हे विचारू का? पण कुणाला विचारू? अशी शंका विचारली तर लोक काय म्हणतील? आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हे विचार येऊन गेले असतील. पण हे सगळे विचार सोडून द्या. मनातल्या शंका, प्रश्न, गोंधळ आम्हाला सांगा. या पानावर काही मित्र मैत्रिणींनी विचारलेल्या शंका आणि त्यांची उत्तरं दिली आहेत. तुम्हाला जे वाटतंय् ते आम्हाला मोकळेपणाने विचारा. आम्ही त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

लैंगिक क्रिया हि प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते. माणसं हातात हात घेऊन, चुंबन घेऊन किंवा चांगले वाटेल अशा इतरही अनेक पद्धतीने लैंगिक भावना व्यक्त करतात. या सर्व क्रियांप्रमाणे समागम किंवा संभोग ही देखील एक लैंगिक क्रिया आहे. शिश्नाचा योनीमध्ये प्रवेश झाला तर ती लैंगिक क्रिया किंवा सेक्स असं नाही तर योनीमैथूना प्रमाणेच गुदमैथुन, हस्तमैथुन, मुखमैथुन ह्या देखील लैंगिक क्रिया आहेत. या क्रिया लैंगिक आकर्षण, लैंगिक भावना किंवा लैगिंक व्यवहार व्यक्त करण्यास वापरल्या जातात.

लैंगिक क्रिया ही लैंगिक भावनेशी संबंधित आहे. वयात आल्यावर आपल्याला काही व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागते. असे आकर्षण वाटण्यात काहीच गैर नाही. या भावना आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटतात. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला आकर्षण वाटत असतं, त्या व्यक्तीबरोबर असताना किंवा त्या व्यक्तीचा विचार करत असताना आपल्या शरीरात काही तरंग जाणवतात. या भावना व्यक्त करण्यासाठी एक माध्यम म्हणून लैगिंक क्रिया करतात.

आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर दोघांची संमती असताना लैंगिक क्रिया केली तर आनंद होतो. प्रत्येकाचा लैंगिक संबंधांचा अनुभव हा वेगळा असतो. त्यामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला भीती किंवा दडपण असेल किंवा मनाची तयारी नसेल तर मात्र त्यात जबरदस्ती वाटते, त्रास वाटतो. अशी जबरदस्ती आपल्यावर कोणी किंवा आपण कुणावर करणे अगदी चुकीचे आहे. या त्रासाची जाणीव मनावर दीर्घकाळ टिकते.

शारीरिक संबंध कधी व कोणाबरोबर करावे हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यासाठी त्यात सहभागी व्यक्ती संमती देण्यास पात्र असणं व त्यांची त्यासाठी तयारी असणं गरजेचं आहे. लैंगिक क्रिया केल्याचा मनावरच नाही तर शरीरावरही परिणाम होतो. समागम किंवा संभोगातून गर्भ राहू शकतो, तसेच एकमेकांना लिंग सांसर्गिक आजारही होऊ शकतात. आपण काय करतोय याची पूर्ण जाणीव असेल आपल्या शरीर-मनावर लैंगिक क्रियेने काय परिणाम होणार आहेत हे कळण्याइतके आणि त्यांची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेण्याइतके आपण जेव्हा मोठे असू तेव्हाच लैंगिक क्रिया करायला हवी.

वयात आल्यावर किंवा वयात येत असताना आपल्यात लैंगिक इच्छा निर्माण होऊ लागतात. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींबद्दल आत्मियता वाटू लागते. त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांच्याबरोबर लैंगिक क्रिया करावी अशी इच्छा निर्माण व्हायला लागते, ह्यालाच लैंगिक आकर्षण म्हणतात. हे आकर्षण अनेक प्रकारचे असू शकते: भिन्नलिंगी (Heterosexual), समलिंगी (Homosexual) किंवा उभयलिंगी (Bisexual), इत्यादी.

एखाद्या व्यक्तिला भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल किंवा समलिंगी व्यक्तीबद्दल किंवा दोन्हींही व्यक्तींबद्दल वाटत असलेल्या लैंगिक आकर्षणावरून ती व्यक्ति स्वत:ला काय मानते त्यावरून त्या व्यक्तीचा लैंगिक कल ठरतो.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्यांच्या सारख्याच लिंगभाव असलेल्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटते, जसे पुरुषाला पुरुषांबद्दल आणि स्त्रीला स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. याचा अर्थ या पुरुषाचा किंवा स्त्रीचा लैंगिक कल समलिंगी आहे असे म्हटले जाते. ह्याला इंग्रजीत होमोसेक्शुअल ओरिएटेशन (Homosexual Orientation) म्हणतात. भिन्नलिंगी, उभयलिंगी किंवा समलिंगी असो, लैंगिक आकर्षण हे नैसर्गिक आहे. स्वाभाविक आहे. त्यात विकृत किंवा चुकीचं काहीही नाही. त्यामुळे त्यावर कोणतेही उपचार करण्याची गरज नाही.

सामान्यपणे पुरूषांना स्त्रियांबद्दल आणि स्त्रियांना पुरुषांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. याचा अर्थ या पुरुषांचा किंवा स्त्रियांचा लैंगिक आकर्षणाचा कल भिन्नलिंगाच्या व्यक्तीकडे असतो. ह्यालाच भिन्नलिंगी लैंगिक कल म्हणतात. इंग्रजीत याला हेटरोसेक्शुअल ओरिएन्टशन (Heterosexual Orientation) म्हणतात. भिन्नलिंगी, उभयलिंगी किंवा समलिंगी असो, लैंगिक आकर्षण हे नैसर्गिक आहे. स्वाभाविक आहे. त्यात विकृत किंवा चुकीचं काहीही नाही. त्यामुळे त्यावर कोणतेही उपचार करण्याची गरज नाही.

जर एखाद्या पुरुषाला पुरुषांप्रती आकर्षण असेल व जे स्वत:ला गे मानतात त्यांना गे असे म्हणतात. कोणतीही व्यक्ति (स्त्री किंवा पुरुष) जिला त्यांच्या सारख्याच लिंगभाव असलेल्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटते ती व्यक्ति स्वत:ला गे म्हणू शकते.

जर एखाद्या स्त्रीला स्त्रियांप्रती आकर्षण असेल व ती स्त्री स्वत:ला लेस्बिअन मानत असेल तर तिला लेस्बिअन असे म्हणतात.

काही व्यक्तींना त्यांच्या सारख्याच लिंगभाव असलेल्या व्यक्तींबद्दल किंवा त्यांच्या पेक्षा भिन्न लिंगाच्या व्यकीतबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं. अशा आकर्षणाला उभयलिंगी लैंगिक कल म्हणतात. इंग्रजीत याला बायसेक्शुअल ओरिएन्टशन (Bisexual Orientation) म्हणतात. बायसेक्शुअल व्यक्ती गोंधळलेल्या असतात असा मात्र याचा अर्थ होत नाही. एका व्यक्तीला एकाच लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटले पाहिजे असे मानायचे ही काही कारण नाही. भिन्नलिंगी, उभयलिंगी किंवा समलिंगी असो, लैंगिक आकर्षण हे नैसर्गिक आहे. स्वाभाविक आहे. त्यात विकृत किंवा चुकीचं काहीही नाही.

सर्व प्रकारचे लैंगिक कल हे स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहेत. भिन्नलिंगी कल हा योग्य आणि बाकीचे अयोग्य, विकृत या समजुतीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. एखाद्या व्यक्तीचा लैंगिक कल काय आहे यावर त्या व्यक्तीचे नियंत्रण नसते. मात्र आपल्या लैंगिक कलाप्रमाणे वागावे की नाही हा विषय ज्याच्या त्याच्या निवडीचा आणि त्याला-तिला उपलब्ध असलेल्या सामाजिक मोकळिकीचा आणि समाजरितीविरुद्ध वागायच्या इछा आणि क्षमतेचा आहे.

ज्या व्यक्तींना कुठल्याच व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटत नाही त्यांना अलैंगिक असे म्हणतात. ह्याला इंग्रजीत असेक्सशुअल असं म्हणतात व हे ही अगदी नैसर्गिक आहे. त्यांना एखाद्या प्रेमाच्या नात्यामध्ये असावे असे वाटू शकते पण त्यांना कोणत्याही लैंगिक क्रियांमध्ये रस नसतो.

लैंगिक कल हा नैसर्गिक असतो. काही वेळा तो काळासोबत बदलू शकतो. पण तो जाणीवपूर्वक काही व्यत्यय आणून किंवा ‘उपचार’ करून बदलता येत नाही. उलट असे केल्याने संबंधित व्यक्तीच्या शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. भिन्नलिंगी कल सोडता इतर कोणत्याही आकर्षणा बद्दल चुकीच्या सामाजिक धारणा व दबाव असल्यामुळे ते मान्य करणे अवघड जाते व ते बदलण्याचा प्रयत्न केला जातो. हे चुकीचे आहे.

जर समलिंगी लोकांबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटत असेल तर त्यात काहीही चूक नाही. तो आपला नैसर्गिक कल आहे. सामाजिक धारणा आणि दबाव यामुळे ते मान्य करणे अनेकांना तणावपूर्ण होते. परंतु जे नैसर्गिक आहे त्याचा स्वतःसाठी स्वीकार करण्याकडे आधी पोहचावे लागेल. निसर्गतः जे मिळाले आहे त्याला बदलायचा प्रयत्न करणे म्हणजे ताणतणाव ओढवून घेणे आहे. तसेच द्विधा मनःस्थितीमध्ये जगण्यासारखे आहे. भारतीय मानसशास्त्रज्ञ संघटना आणि जागतिक मानसशास्त्रज्ञ संघटना समलैंगिकता हा मानसिक आजार मानत नाही. त्यामुळे यावर उपचारांची गरज नाही. परंतु अनेकदा सामाजिक तणाव टाळण्यासाठी काही अघोरी उपाय ही केले जातात. ते करू नयेत.

हो, समलिंगी व्यक्ती लग्न करू शकतात. पण समलिंगी लग्नाला भारतात अद्याप मान्यता नाही. मात्र इतर काही देशात ते कायदेशीर मानले जाते.

स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक व इतर संवेदनशील अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा हाताळणे या क्रियांचा समावेश होतो. हस्तमैथून करणे स्वाभाविक आहे, हस्तमैथुन स्त्रिया आणि पुरुष दोघे ही करू शकतात. हस्तमैथून करणे ह्यात गैर काहीही नाही. ज्यामध्ये स्वतःला दुखापत होत नाही किंवा इतरांना ही त्याचा त्रास होणार नाही अशा हस्तमैथुनात काही धोका नाही. तो प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क आहे.

असे मुळीच नाही. मुलग्यांनी हस्तमैथुन करू नये असे वाटणार्‍यांनी पसरवलेला हा मोठा गैरसमज आहे. हस्तमैथुन करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क आहे. हस्तमैथुन केल्याने शिश्न/लिंग वाकडे होत नाही. मात्र हस्तमैथुन करताना वापरात येणाऱ्या वस्तूंनी शिश्नाला इजा होऊ नाही ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

पुरुषाच्या शरीरात हृदयाच्या एका ठोक्याला किमान 1000 शुक्राणू (पुरुषबीज) तयार होत असतात. ती बाहेर पडण्यासाठी वीर्यकोषांमध्ये एक पातळ पदार्थ म्हणजे वीर्य तयार होते. वीर्य सतत तयार होत असते आणि ते थोड्या काळापुरतेच साठवून ठेवता येते. हस्तमैथून केल्याने वीर्य वाया जात नाही. ते पुन्हा तयार होते. तसेच त्याचा पुढे मूल होण्यावर किंवा लैंगिक आरोग्यावरही काही परिणाम होत नाही.

किशोरवयामध्ये म्हणजे मुलगे वयात येत असतानाच्या काळात कधीकधी लिंग ताठर होते आणि वीर्य बाहेर येते. झोपेत असताना असे झाल्यास माहिती नसणारांना काहीतरी गैर घडले आहे असे वाटू शकते. वीर्यकोश, लिंग यांच्या रचनेत काहीही दोष नाही असेच यातून दिसते. त्यामुळे या क्रियेला स्वप्नदोष न म्हणता स्वप्नावस्था म्हणायला हवे. वीर्य शिश्नातून बाहेर येणे असा याचा सरळ अर्थ आहे. हे झोपेतच होते असेही नाही जागेपणीही होऊ शकते.

हो. मुली आणि स्त्रिया हस्तमैथुन करतात. मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये क्लिटोरिस (शिश्निका) नावाचा एक संवेदनशील अवयव असतो. लघवीच्या जागेच्या थोड्या वर या अवयवाचं टोक असतं. याला हात लावला, इतर वस्तूंनी त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरिस हाताळले/चोळले गेले, किंवा गरम पाण्याचा त्याला स्पर्श झाला तर लैंगिक उत्तेजना निर्माण होते. मुलींमध्ये स्तनाग्रंदेखील संवेदनशील असतात. स्तनाग्रांना स्पर्श करणं, ती ओढणं किंवा घासणं यातूनही उत्तेजना निर्माण होऊ शकते. हस्तमैथुन करताना मुली विविध प्रकारच्या गोष्टी वापरू शकतात. फक्त या गोष्टी स्वच्छ आहेत ना, व त्याने काही इजा होणार नाही ना याची काळजी घ्यायला हवी.

मुलं जन्माला येण्यासाठी स्त्री बीज आणि शुक्राणू (पुरुषबीज) यांचा संयोग होऊन गर्भधारणा व्हावी लागते. संभोगाचे वेळी पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनीमार्गातून आत शिरते. शिश्नातून वीर्य बाहेर पडते, त्यात हजारो शुक्राणू (पुरुषबीज) असतात. हे शुक्राणू (पुरुषबीज) पोहत-पोहत गर्भाशयातून त्याला जोडलेल्या स्त्री बीजवाहिनीपर्यंत प्रवास करतात. सर्वसाधारणपणे दर महिन्याला स्त्रीमध्ये एकच स्त्री बीज विशिष्ट वेळी तयार होते. शुक्राणूंच्या गर्भाशयात प्रवेशावेळी बीजवाहिनीत स्त्री बीज असेल तर त्यातील शुक्राणूंपैकी एकाचा (पुरुषबीजाचा) स्त्रीच्या शरीरातल्या त्या बीजांडाशी संयोग होतो. आणि फलित बीज तयार होते. ते गर्भाशयात उतरते आणि तिथे रुजते आणि मग तो गर्भ तिथे नऊ महिने वाढतो. गर्भाशयातील नाळेद्वारे रक्त आणि इतर पोषक घटकांचा त्याला पुरवठा होतो. बाळाची वाढ पूर्ण झाल्यानंतर बाळ बाहेर येते.

मूल होणे ही एक शारीरिक घटना आहे. तर लग्न ही सामाजिक, सांस्कृतिक घटना आहे. त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. मूल लग्नामुळे नाही तर लैंगिक क्रियेच्या एका प्रकारातून म्हणजेच संभोगातून गर्भ तयार होऊन जन्माला येण्याची प्रक्रिया सुरू होते.

स्त्रीचे बीजांड आणि शुक्राणू (पुरुषबीज) चा संयोग होऊन फलित बीज तयार होते. एखादे वेळी जर ते दोन भागात विभागले गेले आणि दोन्ही भागातून स्वतंत्र गर्भ वाढला तर अगदी एकसारखी जुळी मुले तयार होतात. ही दोन मुले किंवा दोन मुलीच असू शकतात. यांना आयडेण्टिकल ट्विन्स म्हणतात. काही वेळा स्त्रीच्या शरीरात दोन स्त्रीबीजांडं अंडकोषातून बाहेर येतात. या दोन बीजांडांचा स्वतंत्र दोन शुक्राणूंबरोबर संयोग झाला तर दोन फलित बीजं तयार होतात. हे दोनही गर्भ गर्भाशयातच वाढतात व वेगवेगळे गुणधर्म असणारी मुलं तयार होतात. ती दिसायला एकसारखी नसतात. यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी देखील असू शकते. यांना फ्रॅटर्नल ट्विन्स म्हणतात.

नाही. केवळ हातात हात घेतले, मिठी मारली, चुंबन घेतले तर गर्भ राहात नाही, म्हणजेच दिवस जात नाहीत. संभोगा दरम्यान पुरुषाच्या शरीरातील शुक्राणू (पुरुषबीज) स्त्रीच्या शरीरातल्या बीजांडापर्यंत गेल्यावर त्यांचा संयोग होऊन फलित बीज तयार झाले तरच गर्भ निर्माण होतो.

योंनीमार्गातून एकदा जरी लिंगप्रवेशी संबंध आले तरी दिवस जाऊ शकतात. स्त्रीच्या शरीरात साधारणपणे दर महिन्यात एक बीजांड पिकून तयार होते. ते बीजनलिकेमध्ये येते, तिथे ते केवळ १२ ते २४ तास जिवंत राहते. या काळात या बीजांडाचा शुक्राणू (पुरुषबीज) शी संयोग झाला तरच फलित गर्भ तयार होतो. प्रत्येक स्त्रीचे बिजांड नेमके केंव्हा पिकून संयोगासाठी तयार होते हे आपल्याला नेमके सांगता येत नाही. साधारणपणे मासिकपाळीच्या चार दिवसांनंतर एक आठवडा बीजांडाला बीजांडकोशातून बाहेर पडून संयोगासाठी तयार होण्यासाठी लागतो. स्त्रीच्या मासिकपाळीनंतरचा एक आठवडा सोडून त्यानंतरच्या आठवड्यात संबंध आल्यास दिवस राहाण्याची शक्यता आहे. हा काळ सोडून इतर दिवशी संबंध आले तर दिवस राहत नाहीत. वीर्याच्या एका थेंबामध्ये हजारो शुक्राणू (पुरुषबीज) असतात. त्यातील केवळ एकच शुक्राणू बिजांडा पर्यन्त पोहचतो. बीजांड बिजनलिकेत आलेले असताना जर शुक्राणू (पुरुषबीज) शी संबंध आला तरच गर्भधारणेची शक्यता असते.

गर्भाशय अतिशय लवचिक व मजबूत अश्या स्नायूंनी बनलेले असते. जसजसा बाळाचा आकार वाढतो तसतसे बाळाला सामावून घेण्यासाठी गर्भाशयही मोठ्या प्रमाणात ताणले जाते. बाळाचा जन्म झाल्यानंतर काही दिवसातच गर्भाशयाचा आकार परत पूर्वीप्रमाणे होतो.

सर्वसाधारणपणे गर्भाची पूर्ण वाढ झाल्यावर, जो काळ सहसा नऊ महीने इतका असतो, गर्भाशयाचे स्नायू आकुंचन-प्रसरण पावायला लागतात आणि वाढ झालेल्या गर्भाला योनिमार्गाच्या दिशेने ढकलायला सुरूवात होते. योनीमार्ग हळू हळू उघडू लागतो. सामान्यपणे डोक्याच्या दिशेने बाळ बाहेर येऊ लागते आणि योनिमार्गातूनच प्रसूती होते. गर्भाशयाच्या आकुंचन-प्रसरणामुळे स्त्रीच्या पोटातही दुखते. कधीकधी बाळाची गर्भाशयातली स्थिती वगैरे कारणांनी बाळ योनीमार्गातून सहज बाहेर येऊ शकत नाही, तेव्हा शस्त्रक्रिया करून बाळ बाहेर काढावे लागते. त्याला ‘सिझेरियन सेक्शन’ असं म्हणतात, यालाच बोली भाषेत सिझर असेही म्हटले जाते.

शरीर संबंधांच्या वेळी स्त्रियांना दुखतेच असे नाही. हे संबंध जर एकमेकांच्या संमतीने, एकमेकांच्या विश्वासाच्या आधारावर आणि एकमेकांना समजून घेऊन होत असतील तर त्यामध्ये वेदना होण्याची शक्यता कमी असते. मात्र जर असे संबंध जबरदस्तीने होत असतील, त्यामध्ये त्या स्त्रीची मंजुरी नसेल तर मात्र शरीर विरोध करतं आणि संबंध वेदनादायी होऊ शकतात. क्वचित काही स्त्रियांना शरीरसंबंध करू लागल्यावर सुरुवातीला काही काळ थोडेसे दुखते, पण ही वेदना त्रासदायक नसते. लैंगिक उत्तेजना निर्माण झाल्यानंतर स्त्रीच्या योनिमार्गामध्ये, तोंडामध्ये जशी लाळ असते तसा, एक स्राव तयार होतो. हा स्राव योनिमार्ग ओला ठेवतो. हा स्त्राव संभोगाच्या वेळी वंगणाचे काम करतो. योनिमार्ग जर कोरडा असेल आणि घाईने त्यामध्ये पुरुषाचे लिंग शिरले तर ते स्त्रीसाठी वेदनादायी ठरू शकते. तसेच काही प्रजनन मार्गाचे आजार (RTI) वा लिंगसांसर्गिक आजार (STI) झालेले असल्यासही संभोगादरम्यान वेदना होऊ शकतात.

मूल नको असेल तर काही गर्भनिरोधन पद्धती आणि साधनेही वापरता येतात. यातील काही पद्धती स्त्रियांसाठी तर काही पुरुषांसाठी असतात. गर्भधारणा होऊ नये व गर्भ रुजू नये म्हणून केल्या जाणाऱ्या उपायांना ‘गर्भनिरोधन’ असं म्हणतात. या संदर्भातला विचार पुढील पद्धतींनी केला गेलेला आहे. स्त्री आणि पुरुषबीजाचं मिलन रोखणे (निरोध, कायमस्वरूपी कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया) , स्त्रीबीज किंवा पुरुषबीज तयारच न होऊ देणे (गर्भ निरोधक गोळ्या, हार्मोन्सचे इंजेक्शन) , फलित गर्भ गर्भाशयामध्ये रुजू न देणे (तांबी/कॉपर-टी) .

निरोध ही एक विशिष्ट प्रकारच्या रबरापासून (लॅटेक्स) तयार केलेली एक पिशवी असते. त्याला वंगण लावलेलं असतं, त्यामुळे निरोध सहजपणे लिंगावर चढवता येतो. तसेच लैंगिक संबंधाच्या वेळी होणारी हालचालही सहज होते. संबंधांच्या वेळी लिंग ताठर झाल्यावर वीर्य बाहेर येण्याच्या आधी निरोध लिंगावर चढवावा लागतो. यामुळे जेव्हा लिंगातून वीर्य बाहेर येते तेव्हा ते निरोधमध्ये साठते. निरोध वापरल्यामुळे एकमेकांच्या लैंगिक स्त्रावांचा संपर्क येत नाही व त्यामुळे गर्भधारणा व इतर लिंगासांसर्गिक आजार होत नाहीत. स्त्रियांनी वापरण्याचे कंडोम ही बाजारात उपलब्ध आहेत.

स्त्रियांना वापरता येण्याजोगा कंडोमही असतो, त्याला फीमेल कंडोम म्हणतात.हे कंडोम ही बाजारात उपलब्ध आहेत. त्याची पोकळी योगीमार्गाच्या दारापासून आत बसवतात. संभोगाचे वेळी पुरुष लिंग त्या पोकळीमध्ये शिरते. त्यामुळे योनिमार्गाचा सरळ संपर्क शिश्नाशी आणि त्यामधून येणार्‍या वीर्याशी होत नाही.

बिजांड तयार होऊ नये म्हणून गर्भनिरोधनासाठी काही कृत्रिम संप्रेरकं गोळ्यांवाटे रोज घेण्याची एक सामान्य पद्धत उपलब्ध आहे. या कृत्रिम संप्रेरकांमुळे स्त्रीबीज बीजकोषांतून बाहेर येत नाही आणि गर्भधारणेची शक्यता टळते. ह्या संप्रेरकांच्या गोळ्या म्हणजेच माला डी किंवा इतर गर्भ निरोधक गोळ्या ज्या बाजारात मिळतात. त्याच प्रमाणे गोळ्यांच्या ऐवजी ३ महिन्यातून एकदा इंजेक्शन द्वारे कृत्रिम संप्रेरके घेता येतात. सहेली सारख्या गोळ्यांमध्ये संप्रेरक नसते पण त्यात असलेल्या औषधामुळे इस्ट्रोजेन हे संप्रेरक स्त्रवण्यापासून प्रतिबंध होतो व त्यामुळे गर्भ गर्भाशयाच्या आतील अस्तरामध्ये रुजत नाही.

गर्भधारणेनंतर गर्भाशयाच्या आतील अस्तरामध्ये फलित गर्भ रुजतो आणि तिथेच त्याची वाढ होते. फलित गर्भ तयार झाला तरी तो रुजू मात्र नाही म्हणून गर्भाशयामध्ये एक इंग्रजी टी आकाराचे छोटे उपकरण बसवले जाते ज्यावर तांब्याची तार गुंडाळलेली असते. या साधनाला कॉपर टी किंवा तांबी म्हणतात. या साधनामुळे गर्भाशयाच्या भिंतीवर गर्भ रुजू शकत नाही. हे साधन दोन मुलात अंतर ठेवण्यासाठी म्हणून वापरतात. ते गर्भाशयात अगदी सहज, भूल न देता बसवता व काढताही येते.

कोणतेही गर्भनिरोधनाचे साधन किंवा कंडोम वापरले नसेल किंवा कंडोम फाटला, तर गरोदरपण राहण्याची शक्यता असते. अशा वेळी, म्हणजेच असुरक्षित संबंधांनंतर इमर्जंसी कोंन्ट्रासेप्टिव्ह पिल्स  घ्यायच्या असतात. असुरक्षित संबंधांनंतर पुढच्या ७२ तासांच्या आत गोळी घेतल्यास गर्भधारणा टाळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. असुरक्षित संबंधांनंतरच्या पहिल्या १२ तासात या गोळ्यांचा फायदा सर्वाधिक असतो. जर गोळ्या घेण्याच्या आधीच गर्भ रूजला असेल तर,  या गोळ्यांचा त्या गर्भावर काही परिणाम होत नाही. परंतु या गोळ्या फक्त ‘इमर्जन्सी’ साठी आहेत. हे नेहमी वापरावयाचे संतती नियमनाचे साधन नाही. असुरक्षित लैंगिक संबंधातून गर्भधारणा किंवा लिंगसांसर्गिक आजार होऊ शकतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी निरोध नियमितपणे वापरणे गरजेचे ठरते.

गरोदरपणाच्या सुरवातीच्या काळात म्हणजे पाळी चुकल्यापासून नऊ आठवड्यांपर्यंतचा गर्भपात करण्यासाठी काही गोळ्या उपलब्ध आहेत. या गोळ्यांचे दोन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर फारसा त्रास होत नाही. दुसर्‍या डोस नंतर रक्तस्त्राव व्हायला लागतो. साधारण 2 तास हा रक्तस्त्राव होतो व नंतर 1 ते 3 आठवड्यांपर्यंत थोड्या प्रमाणात रक्तस्त्राव होत राहतो. शंभरात 1 ते 2 स्त्रियांमध्ये या गोळ्यांनी गर्भपात पूर्ण न होण्याची शक्यता राहते. असे झाल्यास गर्भपिशवी धूऊन घेण्याची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते. या गोळ्या परस्पर न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हव्यात.

भारतामध्ये गर्भपाताला कायद्याने मान्यता आहे. काही विशिष्ट परिस्थितीत गर्भपात करण्यास वैद्यकीय गर्भपात कायदा परवानगी देतो. भारतामध्ये 24 व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. परंतु 12 आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात अधिक सुरक्षित असतो. उशीर केलेल्या गर्भपातात जोखीम वाढते.

गर्भधारणा, मूल पोटात वाढवणे आणि ते जन्माला घालणे हे सर्व स्त्रीला करावे लागते. त्यामुळे तिची त्यासाठी तयारी असणे आवश्यक असते. जर तिच्या मर्जीविरोधात तिला दिवस गेले असतील तर होणारा गर्भ पोटात वाढवायचा का नाही आणि मूल जन्माला घालायचे का नाही हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीकडे असणे आवश्यक आहे व एमटीपी कायद्या नुसार तो अधिकार स्त्रीलाच असतो. परंतु 18 वर्षाखालील मुलींसाठी किंवा मानसिक संतुलन बिघडले असलेल्या स्त्रियांसाठी त्यांच्या पालकांची (केयर टेकर) लेखी समंती घेणे आवश्यक आहे.

गर्भपात करण्याच्या विविध पद्धती आहेत. लवकरात लवकर आणि 12 आठवड्याच्या आत केलेला गर्भपात सुरक्षित असतो. त्यासाठी गर्भपाताच्या गोळ्याही उपलब्ध आहेत. त्यांचा पुरेसा परिणाम झाला नाहीच तर शस्त्रक्रियेने गर्भपात पूर्ण करून घ्यावा लागू शकतो. त्यासाठी मॅन्युअल व्हॅक्युम अॅस्पिरेशन ही गर्भपाताची सर्वात सुरक्षित पद्धत आहे. त्यामध्ये एका सिरिंजच्या मदतीने गर्भाशयाच्या भिंतीवरील आवरण ओढून घेतले जाते. क्युरेटिंग ही गर्भपाताची मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पद्धत आहे. यामध्ये एका चमच्यासारख्या उपकरणाने गर्भाशयाचे आवरण खरवडून काढून घेतले जाते. या सर्व पद्धती तज्ञ व प्रशिक्षित व्यक्तीने करणे आणि त्यासाठी सुसज्ज इस्पितळाची सोय असणे आवश्यक असते. गर्भाशयामध्ये काड्या घालून, पोटावर दाब देऊन किंवा उड्या मारून गर्भपात होत नाही. उलट या उपायांमुळे गर्भाशयाला आणि इतर अवयवांना गंभीर इजा होऊ शकते.

जर यापुढे मुल नको असेल तर कायमस्वरूपी गर्भनिरोधन पद्धत म्हणून कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया पुरूष आणि स्त्रिया दोघांसाठीही करता येतात. स्त्रियांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत बीजकोष (ओव्हरी) व गर्भाशय यांच्यामधील बीजनलिकेला छेद दिला जातो. त्यामुळे स्त्रीबीज गर्भपिशवीपर्यंत पोहचत नाही. यामुळे शुक्राणू (पुरुषबीज) व स्त्रीबीज यांचा संयोग होत नाही. यासाठी दोन्ही बीजवाहकनलिका कापून ती टोके बंद करून टाकली जातात किंवा घट्ट मुडपून आवळून बांधली जातात.

पुरुषांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत दोन्ही बाजूच्या वीर्यनलिका कापून बांधल्या जातात. अंडकोशाच्या वरच्या भागात लहान छेद घेऊन ही नलिका बाहेर काढता येते. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन महिने निरोध वापरावा लागतो. कारण वीर्यकोशात साठवलेल्या शुक्रपेशी पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत दोन-तीन महिने जातात. ही काळजी घेतली नाही तर गर्भधारणा होऊ शकते. ही स्त्रियांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेपेक्षा खूपच सोपी आणि सुरक्षित गर्भनिरोधक पद्धत आहे. या शस्त्रक्रियेचा लिंगाच्या स्नायू किंवा नसांशी संबंध येत नसल्याने लैंगिक संबंधांमध्ये कसलाही अडथळा येत नाही.

ही शस्त्रक्रिया उलटायची असेल तर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिये दरम्यान बीजनलिकेचा/शुक्राणू वाहून नेणार्‍या नलिकेचा बांधलेला किंवा कापलेला भाग पुन्हा जुळवावा लागतो. त्यानंतरही गर्भ राहीलच याची खात्री देता येत नाही.

नाही. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतरही शरीरातील ग्रंथी व बीजकोष तसंच काम करतात व गर्भाशयात अस्तरही बनते. फक्त बीजनलिका मध्येच कापल्यामुळे किंवा बांधल्यामुळे शुक्राणूशी बिजांडाचा संयोग होत नाही, त्यामुळे गर्भाशयात वाढलेले अस्तर काढून टाकणे हे गर्भाशयाचे काम सुरू राहते. म्हणजेच कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतरही पाळी येतच राहते.

मूल नको असेल तर गर्भनिरोधके वापरणे गरजेचे आहे. उपलब्ध सर्व पर्यायांची योग्य ती माहिती असेल तर कुटूंबनियोजन करणे सहजी शक्य आहे. गर्भनिरोधके ही सामान्यपणे सुरक्षित असतात. काही गर्भनिरोधकांमध्ये संप्रेरके असतात त्यामुळे त्यांच्या दीर्घकाळ वापराने काही स्त्रियांमध्ये दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच काही स्त्रियांमध्ये तांबी बसविल्यानंतर खूप रक्तस्त्राव होणे, पोटात दुखणे असे त्रास होऊ शकतात. परंतु हा त्रास सर्वांनाच होईल असे मात्र नाही. त्यामुळे गर्भनिरोधनासाठी कोणते साधन वापरावे ह्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

पाळीच्या काळात गर्भाशयाचे स्नायू आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. तसंच प्रोस्टाग्लँडिन नावाचं संप्रेरकही रक्तात सोडलं जात असतं. याचा प्रभाव म्हणून स्नायूंमध्ये वेदना होणं, हातापायात गोळे येणं, पोटात दुखणं, मळमळणं असे त्रास होऊ शकतात. सर्वांना त्रास होतोच असे नाही. काही जणींना गरम पाण्याचा शेक घेऊन बरे वाटते. शिवाय वेदनाशामक गोळी घेऊन वेदना कमी करता येतात. या उपचारांचा वापर जरूर करावा आणि या पलीकडे त्रास असह्य होत असल्यास डॉक्टरांना भेट द्यावी.

पाळीच्या काळात जर जोडीदारांची संमती असेल तर संभोग करण्यास काही हरकत नाही. त्यात काही विटाळ अथवा अपवित्र नाही. स्वच्छतेची काळजी मात्र घ्यावी लागते.

आपल्या समाजात पुरुषांच्या वागण्यासंबंधी जे काही ठोकताळे आहेत त्यामध्ये त्याच्या लैंगिक भावना जास्त तीव्र असतात असा समज प्रचलित आहे. या समजाला शास्त्रीय आधार काहीही नाही. पुरुषांनी लैंगिक इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण करून घेण्यासाठी त्याने काहीही करणं हेही मर्दानगीचं लक्षण मानण्यात आल्याने हे मिथक तयार झालं आहे. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही लैंगिक भावना असतात आणि त्यादेखील तीव्र असतात. मात्र त्या व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळत नाही. स्त्रियांनी कामुक विषयांबाबत बोलणं किंवा तशा इच्छा व्यक्त करण्याला आपल्या समाजात गैर मानले जात असल्याने असा समज तयार झाला आहे.

मैथुनाच्या अनेक प्रकारांपैकी मुखमैथुन आणि गुदमैथुन हे दोन प्रकार आहेत. मुखमैथुनामध्ये स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या लैंगिक अवयवांना मुखाने म्हणजेच तोंडाने स्पर्श करून सुख देतात. पुरुषाचे लिंग जोडीदार तोंडात धरते किंवा स्त्रीच्या योनिला, क्लिटोरिसला तोंडाने, जिभेने स्पर्श करून उत्तजना निर्माण केली जाते. मुखमैथुनामध्ये लैंगिक अवयव स्वच्छ असणं आवश्यक आहे. तसंच जर तोंडामध्ये जखमा असतील, हिरड्या किंवा दातातून रक्तस्राव होत असेल तर एच आय व्ही, एच पी व्ही किंवा एड्ससारख्या लिंगसांसर्गिक आजारांचा धोका असतो.

गुदामैथुन म्हणजे गुदद्वारामार्गे लिंगप्रवेश करणे. पुरुष स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या गुदद्वारामध्ये आपले लिंग सरकवतो. गुदामैथुनामध्ये कधी कधी गुदद्वाराला आतमध्ये जखमा होण्याची शक्यता असते. योनिमार्गासारखे गुदद्वाराचे स्नायू लवचिक नसल्याने तिथे इजा होऊ शकतात. यासाठी चांगल्या प्रकारचे वंगणयुक्त जेलसारखे पदार्थ वापरणं उपयोगी ठरतं.

सेक्स ही एकमेकांवरील प्रेमाची, शारीरिक ओढीची अभिव्यक्ती असू शकते. शरीराची गरज म्हणून देखील शरीरसंबंध ठेवले जाऊ शकतात. लग्नाआधी सेक्स करण्यात गैर काही नाही. मात्र जोडीदारांची संमती आणि एकमेकांवर विश्वास हवाच. फसवणुकीने किंवा बळजबरीने लैंगिक संबंध एवढी एकच गोष्ट लैंगिक संबंधांच्या संदर्भात अयोग्य मानता येते. अशा संबंधांच्या परिणामांची माहिती असणे आणि त्यांची जबाबदारी घेणे ही महत्वाचे असते.

हा एक खूप प्रचलित गैरसमज आहे. लैंगिक संबंधांमध्ये पुरुषाचं लिंग ताठर झाल्यावर निरोध लिंगावर चढवला जातो. निरोध चांगल्या प्रतीचा आणि लवचिक असेल तर त्याने लैंगिक सुखामध्ये बाधा येत नाही. उलट नको असलेली गर्भधारणा व लिंगसांसर्गिक आजार टाळण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

प्रेमामध्ये शारीरिक जवळीक आणि सेक्स या दोन गोष्टी दोन्ही जोडीदारांच्या इच्छेने आणि संमतीने व्हाव्यात. तुमच्या मनात लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुमचा जोडीदार तयार आहे का, त्याची इच्छा आहे का याची खात्री करुन घ्या. तुमच्या मनातली इच्छा त्याच्याशी मोकळेपणाने बोला आणि त्याची इच्छा असेल तर दोघांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवा. एकाची इच्छा नसताना दुसऱ्याने त्याच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकणं योग्य नाही. लैंगिक संबंधाचे मनावर व शरीरावरही परिणाम होतात त्यामुळे परिणामांची माहिती असणे आणि त्यांची जबाबदारी घेणे ही महत्वाचे आहे.

तुम्हाला न आवडणारा कोणताही स्पर्श नाकारण्याचा आणि तसे स्पष्टपणे सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुमच्या मर्जीविरोधात कुणीही तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. मग ती व्यक्ती नात्यातली असेल, ओळखीची असेल किंवा परकी असेल. तुम्हाला हे आवडत नसल्याचे त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगा, तिथून निघून जा, बळजबरी होत असेल तर इतरांचे त्याकडे ताबडतोब लक्ष वेधा. तुमच्या काकाच्या वागण्याविषयी तुमच्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीशी बोला आणि कशा प्रकारे काकाला असे वागणे थांबवायला सांगता येईल याचा विचार करा. तुमची यात काही चूक नाही हे मनाशी पक्के करा. जर तुम्ही एकत्र राहत असाल आणि तुम्हाला त्याच्यापासून वेगळे राहणे शक्य नसेल तर त्याच्यासोबत शक्यतो एकटे राहू नका. तुम्ही 18 वर्षांहून लहान असाल तर 1098 या क्रमांकावर चाइल्ड लाइन या संस्थेची तुम्ही मदत घेऊ शकता. तुमच्या संरक्षणासाठी पॉक्सो नावाचा कायदा आहे. त्याचीही मदत घ्या. तुमच्या शरीरावर कुणीही हक्क चालवू शकत नाही.

स्वतःच्या लैंगिक अवयवांचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करणे हा लैंगिक विकृतीचा एक प्रकार आहे. समोरच्याला आपले लिंग दाखवून आनंद मिळवण्याचा हा प्रकार आहे. कुणाच्याही मर्जीशिवाय, संमती शिवाय अशा प्रकारे लैंगिक अवयव मुद्दामहून दाखवणे अयोग्य आहे. सार्वजनिक ठिकाणी तर नाहीच नाही. ते बेकायदेशीरही आहे त्यामुळे त्याची पोलीसात तक्रारही करता येईल.

ब्लू फिल्म किंवा पोर्नोग्राफी पाहणं हा आपापल्या निवडीचा भाग असू शकतो. अनेकदा अनेकांसाठी लैंगिक क्रियांबद्दल माहिती मिळवण्याचं ते एकमेव साधन असू शकतं. लैंगिकतेबद्दल, लैंगिक संबंधांबद्दल आपल्याकडे मोकळेपणाने बोललं जात नाही. मनातल्या शंका मोकळेपणाने कुणाला विचारता येत नाही. अशा वेळी अनेक मुलंमुली पोर्नोग्राफी, ब्लू फिल्म पाहून त्यातून माहिती मिळवतात. माहिती मिळवण्यासाठी हा योग्य मार्ग नाही.
अनेकदा अशा चित्रपटांमध्ये लैंगिक संबंध हिंसक पद्धतीने चित्रित केलेले असतात. अनेकदा त्यामध्ये लैंगिक संबंधांबद्दल अवास्तव अशा कृती दाखवलेल्या असतात. त्यातून बऱ्याचदा लैंगिक संबंधांबद्दल, सेक्सबद्दल विकृत स्वरुपाच्या किंवा अवाजवी अशा कल्पना तयार होऊ शकतात आणि प्रत्यक्षात आपल्या जोडीदाराकडून तशा संबंधांची मागणी होऊ लागते. ते मात्र गैर आहे.

लैंगिक संबंध विविध तऱ्हेचे असतात. एकाच वेळी अनेकांशी लैंगिक क्रिया केल्या जाऊ शकतात. त्यांना orgy किंवा group sex असं पण म्हणतात. मात्र यामध्ये देखील सहभागी सर्व व्यक्तींची सहमती आवश्यक आहे. कोणाच्याही शरीराचा गैरवापर केला जाणार नाही, कुणाच्याही मर्जीविरोधात अशा क्रिया होणार नाहीत, जबरदस्ती होणार नाही, कुणाला त्यातून शारीरिक, मानसिक इजा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा संबंधांमधून लिंग सांसर्गिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे निर्णय घेताना तशी सावधगिरी बाळगणं गरजेच आहे.

तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे लैंगिक संबंध असणे आणि त्याची तुम्ही क्लिप बनवणे वा न बनवणे हा तुम्हा दोघांमधला प्रश्न आहे. तुमचा जोडीदार ती क्लिप अपलोड करेल अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर तसे त्याला स्पष्टपणे सांगा आणि तसे करणे हा विश्वासाचा भंग असेल. तसेच कायद्याने देखील हा गुन्हा ठरेल याची त्याला पूर्वकल्पना द्या.(इन्फर्मेशन टेक्नोलॉजी कायदा, 2000 च्या कलम 66 ई नुसार कोणत्याही व्यक्तीबद्दल तिच्या मर्जीशिवाय तिच्या खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन होईल असं काहीही प्रसारित करणे हा गुन्हा आहे.)
अशा क्लिप्स बनवणे गरजेचे आहे का असाही विचार करा. अशा गोष्टींचा गैरवापर होण्याची शक्यता कायमच असते. ब्लॅकमेलिंगसाठी, बदला घेण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी असा गैरवापर झाला तर त्यातून होणारा अपमान, दबाव पुढे आयुष्यभर आपल्या सोबत राहतात.

तुमचे शरीर तुमचे स्वतःचे आहे. त्यातल्या काही गोष्टी बदलता येतात तर काही नाही. स्तनांचा आकार लहान आहे का मोठा यापेक्षा आपल्यामध्ये असलेले वेगळेपण स्वीकारणे व त्याकडे आदराने, सन्मानाने व सहजतेने पाहता येणे हे जास्त महत्त्वाचे आहे. शरीराबद्दल काही प्रतिमा समाजात तयार झालेल्या असतात. त्या काळाप्रमाणे आणि संस्कृतीप्रमाणे बदलतात. तुमचे स्तन मोठे असतील तर त्यामध्ये लाजण्याचे किंवा वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. आजूबाजूच्या मुलींच्या शरीराशी तुलना करू नका.

झीरो फिगर नुसार छाती-कंबर-नितंबाचं प्रमाण 30-22-32 असं धरण्यात येतं. फॅशनजगत सिनेमा आणि जाहिरातीं यासारखी लोकप्रिय माध्यमे काही ठराविक सौंदर्यनिकषांचे इतके प्रमाणाबाहेर उदात्तीकरण आणि जाहिरात करतात की आपण त्याला प्रमाण मानून त्याच निकषांवर स्वतःला आणि आजूबाजूच्या प्रत्येकाला तोलू लागतो. त्या प्रतिमेशी आपण आपल्या शरीराची तुलना करू लागलो तर ते बरोबर नाही. अतिशय बारीक होण्याच्या आणि झीरो फिगर मिळवण्याच्या दबावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.

गुदद्वाराचे स्नायू योनिमार्गाप्रमाणे लवचिक नसतात. त्यामुळे जेव्हा गुदमैथुनामध्ये पुरुषाचं लिंग गुदद्वारातून आत जाते किंवा लिंग पुढे मागे होते तेव्हा त्या स्नायूंना इजा पोहचू शकते. हे टाळण्यासाठी गुदद्वारामध्ये चांगल्या प्रकारचे वंगण असणारे पदार्थ वापरले पाहिजेत. तसेच निरोध वापरतानाही तो फाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पाण्याचा अंश असणारे वंगण किंवा थुंकीचा वापरही करता येतो. गुदमैथूनातून एच आय व्ही, एच पी व्ही किंवा गरमी (सिफिलीस) सारख्या रोगजंतूंचा प्रसार होण्याची शक्यता योनीत केलेल्या संभोगापेक्षा तुलनेने खूप जास्त असते, हे देखील लक्षात ठेवायला हवे. ते टाळण्यासाठी देखील योग्य निरोध वापरणे उपयुक्त ठरेल.

हिजडा ही संज्ञा भारतामध्ये वापरली जाते. यामध्ये असे व्यक्ति येतात ज्यांना जन्मत: पुरुषाचे लैंगिक अवयव असतात, पण मनाने आपण स्त्री आहोत असे वाटत असते व ते स्वत:ला हिजडा म्हणतात. काही जणांमध्ये स्त्री व पुरुष दोघांचेही लैंगिक अवयव असतात. पण ते स्वत:ला स्त्री किंवा पुरुष मानतात किंवा मानत नाहीत. यापैकी काही लोक स्त्रीप्रमाणे साडी किंवा सलवार, कुर्ता, ओढणी वापरतात. आपले स्त्रीपण अधिक स्पष्ट व्हावे म्हणून काही आपले लिंग आणि वृषण काढून घेण्याची शस्त्रक्रियाही करून घेतात. स्तन वाढवण्यासाठी स्त्री संप्रेरकांची औषधे किंवा इंजेक्शन वापरणे, सिलिकॉन इम्प्लांट्स करून घेणे हेही उपाय केले जातात.

लिंग योनीत पूर्ण न जाण्यामागे खूप वेगवेगळी कारणे असू शकतात. लिंगावरील त्वचा मागे जाणे वा जाऊन मागेच राहिल्याने वेदना होणे किंवा शिश्न पुरेसे ताठर न होणे ही काही कारणे असू शकतात. लिंगाला न येणारा ताठरपणा ह्यामागचे कारण मानसिक किंवा शारीरिक असू शकते. त्याचे योग्य निदान आणि उपचार व्हायला हवेत. काही वेळेस योनीमार्गातील स्नायू आकसले जातात, त्याला vaginismus असे म्हणतात. त्यामुळे देखील लिंग प्रवेशाला अडचण येऊ शकते.

जोडीदाराची संभोग करण्याची पहिलीच वेळ असणे, पहिल्या संभोगाच्या वेळी कधी कधी योनीमार्गातील स्नायू आकसले जातात व त्यामुळे संभोगादरम्यान दुखते या अवस्थेला Vaginismus (योनीआकर्ष) म्हणतात. काही वेळेला योनीपटलाचे (Hymen) फाटलेले नसणे हे ही कारण असू शकते. लिंगप्रवेशी संबंधात अनेकदा घर्षणातून वेदना होतात. खरे तर योनीमार्गातून येणाऱ्या स्त्रावांमुळे संबंध सुखकर होत असतात. पण इच्छा नसणे, पुरेशी उत्तेजना न मिळणे या कारणामुळे हे स्त्राव तयार होत नाहीत आणि वेदना होतात. होणारा त्रास कमी नाही झाला तर तज्ञ डॉक्टर किंवा स्त्रीरोगतज्ञांना भेटणे आवश्यक आहे.

कुणाबद्दल प्रेम न वाटणे किंवा आकर्षण न वाटणे यात गैर किंवा चुकीचे काही नाही. प्रत्येक व्यक्तीला शारीरिक किंवा लैंगिक आकर्षण वाटेलच असा काही नियम नाही.

प्रेमाच्या नात्यांमध्ये असा हक्क गाजवण्याचा किंवा मालकी दाखवण्याचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतो. तुझ्यावर केवळ माझा हक्क आहे किंवा माझ्याशिवाय इतरांकडे तू पहायचे पण नाही, अशा प्रकारची नाती अनेक नाटक-सिनेमा-गाणी-सिरियलमधून आजही दाखवली जातात. पण असे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर आणि इतरांशी असणाऱ्या नात्यांवर बंधन आणणे योग्य नाही. हे स्त्री आणि पुरुष दोघांना लागू आहे. मुलीनी कोणाशीही संबंध ठेवायचे नाहीत आणि मुलं मात्र कसंही वागली तरी चालेल असा दुटप्पीपणा नात्यामध्ये असू नये. तुमच्या नात्यामध्ये अशी बंधने असतील तर त्याबद्दल जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे.

निरोध किंवा कुठलेही गर्भनिरोधनाचे साधन न वापरता संबंध आले असले तर गर्भ राहण्याची शक्यता असू शकते. मासिकपाळी चक्राच्या कोणत्या काळात संबंध आले हेही पहा. पाळी येण्याच्या साधारण दोन आठवडे (12-16 दिवस) आधी किंवा पाळीचा रक्तस्राव संपल्यावर एक आठवड्यात अंडोत्सर्जन होते. या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. नेहमीपेक्षा पाळी यायला उशीर झाला असेल तर गरोदरपणाची तपासणी करून घ्या.

वाढत्या वयात, तरुणपणी मुलींना प्रेमात पडायला भाग पाडणे किंवा पटवणे हे आपण मर्द असल्याचे किंवा आपण इतर कुणापेक्षाही कमी नाही हे दाखवण्याचे वेड असू शकते. पण प्रेम ही दोन व्यक्तींच्या संमतीने होणारी गोष्ट असायला हवी. तुम्हाला एखादी मुलगी खरोखरच आवडत असेल, तुमचं एखाद्या मुलीवर खरंच प्रेम असेल तर तिच्यापाशी ते जरूर व्यक्त करा. मात्र मित्रांनी पैज लावली म्हणून एखाद्या मुलीला प्रेमात पाडणे आणि तुम्हीही तुमची इच्छा नसताना प्रेमात पडणे सिनेमात ठीक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे करू नये.

लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षण वाटणे याला पिडोफिलीया असे म्हटले जाते. जोवर हे विचार मनात राहतात व त्यांवर काही क्रिया होत नाही तोवर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही. कोणतीही लैंगिक कृती ज्याने दुसऱ्याच्या अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर ते चूकच आहे, शिवाय तो कायद्याने गुन्हा आहे. लहान (सज्ञान नसलेली, संमती देण्यास असमर्थ) मूल आपले अधिकार काय हे ही जाणत नाही. ज्यांना लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षण वाटते त्यांनी एखाद्या मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घ्यावी.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील माहिती वाचा आणि मुस्कान संस्थेशी संपर्क साधा.
मुस्कान हेल्पलाईन:- +91 9689062202; ईमेल: muskaanpune@gmail.com
मानसोपचारासाठी : K E M Hospital Research Centre
Address: 489, Sardar Moodliar Road, Rasta Peth, Pune – 411011, Phone: 020 6603 7300

लैंगिक अवयवांच्या ठिकाणी केस येणे अगदी नैसर्गिक आहे ते ठेवावेत की काढावेत हा वैयक्तिक निर्णय आहे. लैंगिक अवयवांची स्वच्छता राखण्यासाठी हे केस कापले तरी चालतील. केस कापताना लैंगिक अवयवांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. रेझर किंवा क्रीम चा वापर करता येऊ शकतो.

कधी, किती वेळा सेक्स करायचा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. रोज सेक्स करण्याचा आणि योनी सैल होण्याचा काहीही संबंध नाही. सेक्स ही स्वतःच्या आणि परस्परांच्या शरीराला आणि मनाला आनंद देणारी कृती आहे. त्यामुळे रोज सेक्स करावा की नाही, हे त्या व्यक्तींनी मिळून ठरवावे. हे मात्र खरं की योनीला सैलपणा येण्यामागे इतर काही कारणे असू शकतात, जसे की वयोमानानुसार काही शारीरिक बदल होणे, वारंवार होणारी बाळंतपणे, इ. अशावेळी काही स्त्रियांना ही समस्या जाणवते. यासाठी काही व्यायाम पद्धती किंवा वैद्यकीय उपचार घेता येतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/kegel-exercise/

सेक्स ही एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. यामध्ये जोडीदाराबरोबर योग्य तो संवाद होणे, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांची शरीरे, एकमेकांच्या लैंगिक इच्छा, अपेक्षा समजून घेणे खूप महत्वाचे असते. बाजारात सेक्स स्टॅमिना किंवा पॉवर वाढवण्याच्या नावावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. ती मदतकारक कमी मात्र हानीकारक असू शकतात. ज्यांना लिंगामध्ये ताठरपणा येत नाही त्यांच्यासाठी अशा औषधांचा उपयोग होतो. तशी काही समस्या असेलच तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि सांगितलेल्या प्रमाणातच औषधे घ्यावी लागतात, तशी समस्या नसेल तर औषधे घेण्याची गरज नसते. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि मन आनंदी राहील अशा कृतींमुळे व्यक्ती निरोगी राहते. निरोगी शरीरातलं रक्ताभिसरण सुरळीत असल्यामुळे लिंगाचा ताठरपणा आणि इतर क्रिया सुलभ होतात.

जर दोघांपैकी एकाही जोडीदाराला एखाद्या लिंग सांसर्गिक आजाराचा संसर्ग असेल तर असुरक्षित लैंगिक संबंध अशा आजारांना निमंत्रण देतात मग ते कोणीही कोणासोबतही करू देत. एचआयव्ही हा त्यातील फक्त एक आहे. ज्या कोणाचे अनेकांशी शरीर संबंध येत असतील तर त्यांना स्वतःला लागण होण्याची शक्यता जशी जास्त तसेच त्यांच्या कडून इतरांना होण्याची पण. सुरक्षित लैंगिक संबंधातून म्हणजे कंडोम सुरवातीपासून वापरून संभोग केल्यास कुठलाही आजार होण्याची किंवा गर्भधारणेची शक्यता नसते. एच.आय.व्ही./एड्स हा आजार केवळ वेश्याव्यवसायात असणाऱ्या स्त्रियांमुळे पसरतो असा एक प्रचलित गैरसमज आहे. एच.आय.व्ही. असलेल्या कुणाही व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध केल्यास एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता आहे. तेव्हा, लागण टाळण्यासाठी प्रत्येक लैंगिक संबंधांच्या वेळी निरोधचा वापर करणे हाच खात्रीशीर उपाय आहे.

मुलीने लग्नाआधी संबंध ठेवला आहे हे ओळखण्याचा कोणताही खात्रीशीर मार्ग नाही. मुलींच्या योनीमार्गात एक लवचिक पडदा असतो, ज्याला हायमेन असे म्हणतात. हा पडदा सायकल चालवणे, खेळ, पोहणे, कष्टाची कामे अशा इतर कारणांनीही फाटू शकतो. अनेकदा पहिल्या सेक्सच्या वेळी हा पडदा विलग होतो (फाटतो) आणि कधी कधी त्यातून रक्त येते. त्यामुळे आधी संबंध झालेले नसले तरीही प्रत्येक मुलीच्या योनीमार्गात हा पडदा असतोच असे नाही. योनीपटल फाटलेले आहे म्हणजे कौमार्यभंग, तिने लग्नाआधी संबंध केलेले असणार हा पुर्णपणे चुकीचा समज आहे.

पॉर्न क्लिपमधून दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्याच असतात असे नाही. बऱ्याचदा अशा क्लिप्समधून एकप्रकारचं आभासी वलय निर्माण केल जाते आणि वास्तविकतेपेक्षा याच गोष्टी खऱ्या वाटू लागतात. योनीभोवतालची त्वचा पातळ आणि लवचिक असल्यामुळे ती गुलाबीसर दिसते. तेथील त्वचेत रंगपेशी जास्त असल्याने रंग गडद असतो. निसर्गतःच सगळ्यांचेच लैंगिक अवयव (योनी आणि शिश्न) इतर अवयवांच्या तुलनेत गडद असतात. हे अगदी नैसर्गिक आणि निरोगी आहे.

बाजारात काही कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी लैंगिक अवयव गोरे करण्यासाठी काही उत्पादने तयार करत आहेत त्याला बळी पडू नका. लैंगिक अवयवांजवळ अशा क्रीम्स किंवा इतर काही उत्पादने लावल्याने उलट दाह होण्याचा, इतर संसर्ग होण्याचा धोका असतो. शिवाय पैशांचा अपव्यय. रंगापेक्षा लैंगिक अवयवांची स्वच्छता आणि काळजी याकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे.

लिंगाच्या आकाराविषयी पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्येही अनेक गैरसमज असल्याचे दिसून येतात. सर्वसाधारपणे पुरुषाचे लिंग केवढे असावे, लिंग लहान असल्यास गर्भधारणेस काही अडचण येते का, लैंगिक सुखास बाधा येते का? लिंग वाकडे असल्याने काही अडचण येते का, लिंगाचा आकार वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का, यासारख्या प्रश्नांच्या मुळातूनच अशा लिंगवर्धक यंत्र वैगेरे गोष्टींची निर्मिती केली गेली आहे. लिंगाच्या लांबीमुळे लैंगिक सुखाला काहीही बाधा येत नाही. त्यामुळे अशा यंत्रांचा वापर करणे गरजेचे नाही.
लिंगाचा आकार व लैंगिक सुख या विषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/

 

एड्स ही आजाराची एक अवस्था आहे. एच.आय.व्ही. विषाणूची लागण झाल्यावर अशी अवस्था येवू शकते. एच.आय.व्ही.ची लागण ही एच.आय.व्ही. असलेल्या व्यक्तीसोबत केलेल्या असुरक्षित संबंधांमुळं होते. म्हणजेच एच.आय.व्ही.ची लागण असलेल्या व्यक्तीसोबत केलेल्या असुरक्षित (निरोधशिवाय केलेल्या) लैंगिक संबंधांमुळं पुरुषाला पुरुषापासून एच.आय.व्ही चा संसर्ग होऊ शकतो.

अनेकवेळा समलैंगिक पुरुष एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवताना गुदद्वाराचा आणि मुखाचा वापर करतात. गुदद्वारातील स्नायू लवचिक नसल्यामुळं लिंग आतमध्ये जाताना जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळं पुरुषांनी समलैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करावा.

एड्स/एच.आय.व्ही. नक्की कसा होतो याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/hiv_aids/

लैंगिक संबंध कुणाशी ठेवावेत हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. लैंगिक संबंधाच्यामध्ये शरीरावर किंवा मनावरही बळजबरी नसावी हा मुद्दा आहे. जवळच्या नात्यात असलेल्या भावबंधांमुळे कळत-नकळत बळजबरी किंवा निदान फसवणूक होऊ शकते. लैंगिक संबंधांचे परिणामही होतात, अगदी जवळच्या आई-बहिणीसारख्या रक्तसंबंधातल्या व्यक्तीशी लैंगिक संबंधांचं नातं ठेवणं यात भावनिक गुंतागुंतीची शक्यता खूप जास्त आहे. परिचय, ओळख वगैरे दृष्टीने जवळच्या पण रक्तसंबंधातल्या नव्हेत अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे यात वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य काहीही नाही त्यात समाजाला अमान्य असल्याने गुंतागुंत होण्याची शक्यता बरीच जास्त आहे. त्यांना तोंड देण्याची दोघांचीही इच्छा आणि तयारी असणे इथे महत्त्वाचे आहे.

अशा परिस्थितीत गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. असुरक्षित लैंगिक संबंध येऊ नयेत यासाठी खरं तर आग्रही असायला हवे. गर्भधारणा जेव्हा नको असते तेव्हा विश्वासार्ह गर्भनिरोधन पद्धतीचाच अवलंब करायला हवा. आय पिल, अनवाँटेड ७२ सारख्या गोळ्या इमर्जन्सी मध्ये वापरायचे गर्भनिरोधक आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा https://letstalksexuality.com/contraception/

पाळीचक्राची लांबी, नियमितता, अंडोत्सर्जन नेमके कधी होते यावर हा काळ अवलंबून असतो. पाळी चक्र जर 30 दिवसांचे असेल, म्हणजेच दर एक महिन्याने पाळी येत असेल तर साधारणपणे पाळी सुरु झाल्यापासून 12-13 व्या दिवशी अंडोत्सर्जन होण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी चार दिवस आणि नंतर चार दिवस म्हणजेच पाळी सुरू झाल्यापासून 12 व्या ते 20 व्या दिवसापर्यंत गर्भधारणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणा नको असल्यास या काळात संभोग टाळावा किंवा निरोधचा वापर करावा. पण पाळी चक्र जर लहान असेल तर पाळी सुरू झाल्यापासून अगदी ७ व्या दिवशीसुद्धा अंडोत्सर्जन होऊ शकते. त्यामुळे आधी स्वतःच्या पाळीचक्राचा नीट अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतरच अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता येईल. तोपर्यंत निरोध वापरणे कधीही उत्तम. शुक्राणू 2 ते 7 दिवसांपर्यंतही जिवंत राहू शकतात. त्यामुळे सुरक्षित काळ किंवा सेफ पीरियड ही पद्धत गर्भनिरोधनासाठी फार विश्वासार्ह नाही.
अधिक माहितीसाठी पुढील लेख वाचा:

गर्भधारणा नक्की कशी होते?


https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

जर समलिंगी लैंगिक व भावनिक आकर्षण वाटत असेल तर त्यात काहीही चूक नाही. तो आपला नैसर्गिक कल आहे. लग्न किंवा इतर औषधोपचार यांनी तो बदलता येत नाही. लग्नाचा विचार करताना जर व्यक्ती समलिंगी कल असणारी असेल व विषमलिंगी व्यक्तीसोबत संभोग नको वाटत असेल तर अशा व्यक्तीने लग्न करणे म्हणजे दोन्ही व्यक्तीवर अन्यायच होतो. सामाजिक धारणा आणि दबाव यामुळे ते मान्य करणे अनेकांना तणावपूर्ण होते. परंतु जे नैसर्गिक आहे त्याचा स्वतःसाठी स्वीकार करण्याकडे आधी पोहचावे लागेल.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक दिली आहे. https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/

 

प्रत्येक स्त्रीचे पाळी चक्र वेगळे असते. काही जणींची पाळी महिन्याने, काहींची दीड महिन्यांनी, तर काही जणींची तीन आठवड्यांनीच येते. याचा अर्थ त्यांच्या पाळी चक्रामध्ये बीजांड पिकून शुक्राणू (पुरुषबीज) शी संयोग करण्याजोगे होण्याची वेळ वेगवेगळी आहे. संयोग होण्याजोगे बीजांड बीजनलिकेत येते त्याच्या आधीचे दोन दिवस आणि नंतरचे दोन दिवस असा साधारण 4 ते 5 दिवसांचा काळ गर्भधारणेस योग्य असतो. स्त्री बीज जेव्हा बीज कोषातून बीजवाहिनीमध्ये येते त्यानंतर ते फक्त 24 तास जिवंत असते. त्या 24 तासामध्ये शुक्राणू (पुरुषबीज) चा त्याच्याशी संयोग झाला तर गर्भधारणा होते.
स्त्रीशरीरात आलेले शुक्राणू (पुरुषबीज) सुमारे दोन ते सात दिवसांपर्यंतही जिवंत राहू शकतात.
अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा. https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

 

स्तनांचा आकार किती असावा याचे कोणतही शास्त्रीय प्रमाण नाही आणि ते असू शकत नाही. अनेकदा मोठ्या स्तनांचा संबंध लैंगिक सुखाशी जोडला जातो. लैंगिक सुखामध्ये स्तनांचा आकार महत्वाचा नसून लैंगिक क्रियेतील आपली रुची, आवड किंवा लैंगिक सुख देण्याघेण्याची संवेदनशीलता महत्वाची असते.

स्त्रियांमध्ये स्तनांचा आकार मोठा किंवा लहान असण्यामागची अनेक कारणं असू शकतात. जसे अनुवांशिक जनुकीय गुणसुत्रे, शरीरामध्ये तयार होणार्‍या हार्मोन्सचे प्रमाण किंवा इतर काही वैद्यकीय कारणेदेखील असू शकतात. शरीरात तयार होणार्‍या चरबीचे प्रमाणदेखील स्तनांच्या आकारासाठी कारणीभूत असते.

सेक्स किंवा खरं तर अशी कोणतीच क्रिया नाही ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडी सारख्या असतील. सेक्स ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये एकमेकांचा, एकमेकांच्या आवडी-निवडींचा विचार महत्त्वाचा आहे. आपल्या जोडीदाराला काय आवडते किंवा कशाचा त्रास वाटतो हे एकमेकांशी मोकळेपणाने बोलून समजू शकते. संभोगाच्या आधी हळुवारपणे शरीराला स्पर्श करणे, एकमेकांचा सहवास सुखाचा वाटेल अशा रितीने संवाद साधणे आणि जेव्हा संभोगासाठी मनाची आणि शरीराची तयारी होईल तेव्हा संभोग करणे या सुखकर संबंधांसाठी आवश्यक बाबी आहेत. मर्जीविरुद्ध, जोडीदाराला इच्छा झाली म्हणून सेक्सची जबरदस्ती कोणालाही आवडणार नाही.

आनंददायी लैंगिक संबंधासाठी चे घटक (संवाद, खाजगी जागा, निवांतपणा, स्वच्छता, पूर्व प्रणय, इ.) प्रत्येकासाठी वेगळे असू शकतात. मनावर कुठलाही दबाव नसणे, स्वत:ची व जोडीदाराची तयारी व संमती असणे हे महत्त्वाचे आहे.

प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. लिंगाचा आकार शिथिल अवस्थेत कितीही लहान मोठा असला तरी सर्वांच्या उत्तेजित लिंगाचा आकार जवळजवळ सारखाच असतो. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ५ ते १० सेंटीमीटर (२-४ इंच) लांब असते. लिंग किती मोठे आहे यापेक्षा त्याला ताठरता येते का, संबंधाच्या वेळी ताठरता राहते का किंवा लैंगिक सुख मिळते का, हे जास्त महत्त्वाचे आहे. लिंगाचा आकार वाढवण्यासाठी कोणताही उपाय नाही.

 

कधी कधी लिंग एका बाजूला झुकलेले किंवा वाकडे झालेले असू शकते. थोडाफार तिरकेपणा असला तर त्यात घाबरण्यासारखे काही नाही. लिंग वाकडे असेल तर ते सरळ करण्यासाठी कोणत्याही प्रकारची औषधे उपयोगी पडणार नाहीत व मुळात त्याची गरजही नाही. बर्‍याचदा संभोगादरम्यान काही अडचण येणार नाही ना अशी भीती असते, पण उत्तेजित अवस्थेतील शिश्न सहजपणे कोणताही त्रास न होता हव्या त्या बाजूला वळविता येते व त्यामुळे संभोगात काही अडचण येत नाही.

 

स्त्रीच्या शरीरामध्ये दोन्ही जांघांच्यामध्ये योनी असते. मुत्रद्वाराच्या खालील भागात योनीद्वार असते. योनीद्वारापासून गर्भाशयाला जोडणार्‍या मार्गाला योनी म्हणतात. याचा उपयोग मासिक पाळीच्या काळात गर्भाशयात जमा झालेला पेशींचा थर आणि स्त्रीबीज रक्ताच्या स्वरुपात बाहेर टाकण्यासाठी तसेच संभोगासाठी देखील होतो. अधिक माहितीसाठी सोबतची आकृती पहा. https://letstalksexuality.com/wp-content/uploads/2020/01/Girl-Genitals.jpg

दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल आणि काही विशिष्ट समस्या नसेल तर गरोदरपणात शरीर संबंधावर खरं तर काही निर्बंध असण्याची आवश्यकता नाही. पूर्वी जर एकापेक्षा अधिक गर्भपात झाले असतील किंवा तशी शक्यता असेल तर डॉक्टर पहिल्या काही महिन्यात शरीर संबंध टाळण्याचा सल्ला देतात. नंतरच्या काळात म्हणजे गरोदरपणाच्या तिसऱ्या टप्प्यात किंवा शेवटच्या तीन महिन्यात पोटाचा वाढलेला घेर कदाचित अडथळा ठरू शकतो किंवा ओटीपोटावर जोर किंवा दाब पडण्याची शक्यता असते, त्याची काळजी घ्यावी. जर जोडीदाराला लिंगसंसर्गिक आजार झालेला असेल तर तो पूर्ण बरा होइपर्यंत संबंध न येऊ देणे गरजेचेच आहे. शरीरसंबंधांचा गर्भावर कसलाही गैरपरिणाम होत नाही.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा : https://letstalksexuality.com/sex-during-pregnancy/

एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस (HIV – Human Immune-Deficiency Virus). शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिण्ड्रोम (AIDS – Acquired Immune-Deficiency Syndrome). ही आजाराची एक अवस्था आहे. या संसर्गामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती नष्ट व्हायला लागते. याचा परिणाम म्हणजेच शरीर कोणत्याही प्रकारच्या जंतुलागणीचा मुकाबला करू शकत नाही. एचआयव्हीचं रुपांतर काही काळाने एड्समध्ये होतं. एचआयव्ही बरा होऊ शकत नाही. मात्र आता औषधं आणि योग्य आहाराच्या मदतीने एचआयव्ही असला तरी चांगलं आयुष्य जगता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/hiv_aids/

अनेकांसाठी हा आयुष्यातला पहिला सेक्स करण्याचा प्रसंग असतो. त्याचे मनावर दडपणही असते. या रात्री सेक्स झालाच पाहिजे याचे दडपण घेण्याची गरज नाही. दोघांनाही सेक्स करण्याची इच्छा व संमती आहे ना हे पाहून एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा. https://letstalksexuality.com/foreplay/

 

संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर/योनीजवळ पडले तरीही वीर्य योनीमध्ये अजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. अंतरवस्त्रावर पडलेल्या वीर्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.

हे तुम्हाला काय आरामदायी वाटते त्यावर अवलंबून आहे. ब्रा घातलीच पाहिजे असेही काही नाही आणि न घालता झोपावे असेही काही नाही. मात्र ब्रा खूप घट्ट नसावी, शक्यतो सुती कपड्याची असावी. वायरफ्रेम असणाऱ्या ब्रा शक्यतो जास्त काळ घालू नयेत. तुम्हाला स्वतःला काही त्रास जाणवत नसेल, ब्रा पुरेशी सैल असेल तर झोपताना ब्रा घातल्याने काही अपाय होण्याची शक्यता नाही.

ब्यूटी पार्लरमध्ये काखेतले केस काढण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. तुम्ही घरच्या घरीही वॅक्सिंगने केस काढू शकता. रेझरही वापरू शकता, ट्रिमर वा कात्रीचा वापर करून तुम्ही केस बारीक ठेऊ शकता किंवा केस काढण्याची काही क्रीम्स मिळतात. मात्र त्वचेला वॅक्सचा किंवा क्रीमचा काही त्रास होणार नाही ना हे पाहून यातले कोणतेही मार्ग वापरावे.

शिश्नाच्या टोकावर किंवा त्वचेखाली जमा होणाऱ्या स्त्रावाला वैद्यकीय भाषेत स्मेग्मा असे म्हणतात. शरीरातील मृत पेशी, तेल, वीर्य यांच्या मिश्रणाने स्मेग्मा तयार होतो. हा स्मेग्मा जर जास्त दिवस साठून राहिला तर त्यामध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. त्यावरील सर्वात सोपा उपाय म्हणजे शिश्नाची योग्य तशी स्वच्छता ठेवणे. शिश्नावरील त्वचा मागे ओढून पाण्याने हळुवारपणे व्यवस्थित धुवावी व मऊ कपड्याने कोरडी करावी. स्वच्छ करण्यासाठी साबणाचा जास्त वापर करू नये. खाज येणे, आग होणे किंवा तिथे सूज येणे यासारखी लक्षणे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मूल न होण्यामागे स्त्री किंवा पुरूषामध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय समस्या असू शकतात व त्यावर आता बरेच उपचार उपलब्ध आहेत. त्याचा पत्रिकेतील नाड एक असण्याशी काहीही संबंध नाही

रक्त गटात प्रमुख दोन प्रकारचे घटक असतात. एक अ, ब. आणि दुसरा आर एच फॅक्टर. यापैकी अ असल्यास अ; ब असल्यास ब, दोन्ही असल्यास अब आणि अ, ब दोन्ही नसल्यास ओ, असे या पहिल्या प्रकारातून चार उपगट तयार होतात. यापैकी कोणताही पतीचा आणि कोणताही पत्नीचा- असला तरी त्यातून कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. आता दुसर्या आरएच(RH) घटकाचा विचार केल्यास पतीचा रक्तगट आरएच असलेला- नसलेला म्हणजे आरएच पॉझिटिव्ह वा निगेटिव्ह असला तरी काहीही प्रश्न उदभवण्याची शक्यता नसते. फक्त स्त्रीचा रक्तगट आरएच निगेटिव्ह म्हणजे रक्तात आर-एच फॅक्टर नाही असे असेल आणि तिला जर आर एच निगेटीव्हच बाळ झाले तरी त्यातून काही अडचण नाही. मात्र तिला जर आरएच पॉझिटीव्ह रक्तगट असलेले बाळ झाले तर मात्र आईला पहिल्या बाळंतपणानंतर किंवा गर्भपातानंतरही ४८ तासांच्या आत अॅन्टी डी इम्युनोग्लोब्युलिनचे एक इंजेक्शन घ्यावे लागते. जर इंजेक्शन घेतले नाही तर आईच्या शरीरात त्याविरूद्ध अॅन्टीबॉडीज तयार होतात. पहिल्या प्रेग्नंसी मध्ये बाळाला काही अडचण येत नाही पण जर तिला पुन्हा पुढच्या वेळी देखील आरएच पॉझिटीव्ह (Rh positive) रक्तगट असलेले बाळ झाले तर त्या बाळाला कावीळ किंवा क्वचित जन्मापूर्वी मृत्यू होण्याचीही शक्यता असते.

एका वीर्यस्खलनामध्ये लाखो शुक्राणू (पुरूषबीजे) असतात आणि त्यातील फक्त एक शुक्राणू गर्भधारणेसाठी पुरेसा असतो. त्यामुळे वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी वेगळे उपाय करण्याची गरज नसते. शुक्राणूंचे प्रमाण कमी असेल तर त्याचे नेमके कारण शोधून डॉक्टरांच्या मदतीने त्यावर उपाय करता येतात.

सेक्सोलॉजिस्ट, त्वचाविकार तज्ञ (Dermatology and Venereology), मानसोपचार तज्ञ (Psychologists) किंवा अंड्रोलॉजिस्ट डॉक्टर्स लैंगिक समस्या असलेल्या व्यक्तींना मदत करतात.

सिझेरियन ही मोठी शस्त्रक्रिया आहे. पोटाला आणि आतमध्ये गर्भाशयाला छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे सिझेरियननंतर किमान ६ आठवडे पोटावर आणि गर्भाशयावर ताण येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. नॉर्मल असो किंवा सिझेरियन, गरोदरपण, बाळंतपणामध्ये शरीरात अनेक बदल घडतात, ते पूर्ववत व्हायला बाळ झाल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे सिझेरियन झाल्यावर किमान दीड ते दोन महिने संभोग टाळावा.

रजोनिवृत्तीनंतर गर्भधारणा होणे शक्य नाही. वयाच्या 45-50 वर्षांच्या आसपास स्त्रीचे पाळीचक्र थांबते. तसेच रजोनिवृत्तीनंतर स्त्रीच्या शरीरात हार्मोन्सचे प्रमाण ही कमी होत राहते. त्यामुळे बीजकोषातील बीजे विकसित होणे थांबते. बीज नसताना गर्भ राहणार नाही.
अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://letstalksexuality.com/conception/

मुलामुलींना खरी, शास्त्रीय आणि सकारात्मक माहिती आश्वासक शब्दात द्यावी. त्यासाठी स्वत: ती माहिती मिळवून व स्वत:च्या मनाची तयारी करणे ही पहिली पायरी असेल. काही प्रश्नांची उत्तरे येत नसतील तर येत नाही हे सरळ व स्पष्ट सांगता आले पाहिजे. खोटे बोलून वेळ मारून नेऊ नका. सांगताना लाजू नका, शरमू नका. लैंगिकतेबद्दल वयानुरूप, पण मोकळेपणाने बोलणे महत्त्वाचे आहे. मुलांशी काही गोष्टी नक्की बोलता येतात.
आपल्याला सांगणे जमणार नसेल तर मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिलेले लैंगिकता / लैंगिक शिक्षणावरचं पुस्तक त्याना भेट दयावे किंवा नजरेस पडेल अशा जागी ठेवावे.(https://tarshi.net/downloads/red-book.pdf, https://www.tarshi.net/downloads/blue-book.pdf, डॉ. अनंत साठे व डॉ.शांता साठे लिखित हे सारं मला माहीत हवं! आणि पालकांसाठी काय सांगू? कसं सांगू? )काही सामजिक संस्था ज्या लैंगिक आरोग्य वा लैंगिकता विषयात काम करत आहेत, त्यांचीही मदत घेऊ शकता.

किशोरावस्थेत लैंगिक आकर्षण निर्माण होणे हा नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे. शरीरातील इतर सर्व संस्थांचं कार्य जसे -श्वसन, पचन, वगैरे जन्मापासून सुरु होते, पण जननसंस्थेच्या कार्याला सुरुवात होते ती किशोरावस्थेत. त्यामुळे शारीरिक व मानसिक बदल घडून येतात. तसेच लैंगिक प्रेरणा निर्माण होतात. परपस्परांविषयी ओढ, लैंगिक भावनांची जाणीव या वयात नव्यानेच व्हायला लागते. भिन्नलिंगी व्यक्तींशी भावनिक, शाररिक जवळीक साधावीशी वाटायला लागते. काही व्यक्तींच्या बाबतीत समलिंगी व्यक्तींबद्दल किंवा दोन्ही बद्दल (समलिंगी व भिन्नलिंगी) आकर्षण वाटू शकते व हे नैसर्गिक असून त्यात काहीच गैर नाही.

पुरुषाच्या रक्तातील टेस्टेस्टेरोन या अंतस्रावाचे प्रमाण दिवसभरात कमीजास्त होत असते. पहाटे रक्तातील टेस्टेस्टेरोन चं प्रमाण वाढलं असेल तर, लैंगिक भावना तीव्र नसतानाही लिंगाला ताठरपणा येऊ शकतो. हे बर्‍याच जणांना होते, यात काही गैर नाही. तसेच रात्रभरात लघवी केली नसली किंवा पोट साफ झालेलं नसेल तर पुरस्थ ग्रंथीवर(प्रोस्टेट) त्याचा दबाव येतो व त्यामुळेही लिंगाला ताठरपणा येतो.

हो, महिलांनाही लैंगिक कृतींची- संभोगाची इच्छा होते.

आपल्या संस्कृतीत विशेषत: महिलानीं लैंगिक विषयांबाबत बोलणे किंवा तशी इच्छा व्यक्त करणे अयोग्य मानले जाते. त्यामुळे आपण पुढाकार घेतल्यास आपल्याबद्दल चुकीचे मत होईल असे त्यांना वाटते. परंतु या समजुती आता बदलत आहेत. महिलाही आता पुढाकार घेतात.

वयात आल्यावर शरीरातील संप्रेरकांची पातळी वाढल्यावर त्वचेमध्ये अधिक तेल तयार होते व चेह-यावर मुरमे येतात. चेहरा तेलकट नसावा; तो नेहमी कोरडा असावा. वारंवार चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्यावा. चॉकलेट, आईस्क्रीम, लोणी, तूप आहारात टाळावे. चेहर्यावरील मुरमे नखांनी फोडू नयेत. नाहीतर चेह-यावर व्रण व खड्डे कायमचे राहतात. गरज असेल तर यासाठी तज्ञ डॉक्टरांची मदतही घ्यावी.

माणूस हा सस्तन प्राणी आहे म्हणजेच माणसांमध्ये (पुरुष व स्त्रिया) स्तन असतात. माणसाचे बाळ जन्मल्यावर सुरुवातीचा काही काळ आईच्या दुधावर पोसले जाते. त्याच्या वाढीसाठी आईचे दूध महत्त्वाचे असते. मुलगी वयात यायला लागल्यावर तिच्या स्तनांची वाढ व्हायला लागते. स्त्रीच्या स्तनांमध्ये चरबी, दुग्धग्रंथी, दुग्धवाहिन्या, रसवाहिन्या व रक्तवाहिन्या असतात. स्तनाग्रांवर ह्या दुग्धवाहिन्यांची तोंडे उघडतात. स्तनाग्रांच्या भोवती तपकिरी रंगाची त्वचा असते तिला स्तनमंडल (Areola) असे म्हणतात. बाळ स्तनमंडलावर ओठ दाबून दूध ओढून घेते.

हस्तमैथून करणे हे खूप सामान्य आहे, बरेचजण ते करतात. मुळात त्यात गैर काहीच नाही. आपल्या समाजात याबद्दल फार चुकीचे समज आहेत. हस्तमैथुन केल्याने कमजोरी येते, लैंगिक संबंध ठेवता येत नाहीत, लिंग वाकडे होते, वीर्य वाया जाते वगैरे सर्व खोटे आहे. हस्तमैथुन ही निरोगी, शरीराला आणि मनाला आनंद देणारी आणि हा आनंद मिळवताना दुसऱ्या कुणालाही इजा न पोचवणारी कृती आहे.त्यामुळे जर आपण चूक करत आहोत असे वाटून न्यूनगंड येत असेल तर त्याची खरोखरच गरज नाही. सारखे तेच करावेसे वाटले तरी त्यात चुकीचे असे नाही. पण जर हे टाळायचे असेल तर ज्यावेळेस हस्तमैथून करण्याची इच्छा होते तेव्हा मनाला आनंद देणाऱ्या इतरही अनेक गोष्टी असतात त्यातली एखादी करता येऊ शकते. जर लगेच हस्तमैथुन करावस वाटत असेल तर ५-१० मिनिटांमध्ये करू असा करून विलंब करता येतो. मग १०-१५ मिनिटांनी इच्छा राहत पण नाही. मुख्य म्हणजे अपराधी वाटून घेऊ नका. तुम्ही काहीही वाईट किंवा गैर करत नाही आहात.

हस्तमैथुन करताना प्रत्येकजण वेगवेगळे विचार मनात आणत असतो. कुणी आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या मुलीचा, मुलाचा किंवा अगदी काल्पनिक स्त्रीचा, पुरुषाचा विचार करून हस्तमैथुन करतात. यात काहीही मनोविकृती नाही. स्वप्नरंजन व वास्तव ह्याचे पूर्ण भान असणे मात्र गरजेचे आहे. तुम्ही जे करताय त्यातून तुम्हाला आनंद मिळतोय आणि बाकी कुणालाही इजा पोचत नाही, कोणावरही अन्याय होत नाही; मग यात अपराधी वाटून घेण्याची काहीच गरज नाही.

हो, विवाहित व्यक्ती देखील हस्तमैथुन करतात व त्यात काहीच चुकीचे नाही. काहीवेळा जोडीदार दूर राहत असेल किंवा काही कारणाने लैंगिक संबंध होत नसेल किंवा ह्यासारखे काही कारण नसेल तरी देखील आपल्याला आवडेल अशा पद्धतीने हस्तमैथुनाद्वारे लैंगिक आनंद घेता येऊच शकतो.

वेश्या व्यवसाय करणा-या स्त्रिया आहेत तसे पुरुषही असतात. यामध्ये पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणारे व स्त्रियांशी संबंध ठेवणारे असे प्रकार दिसतात.

सम किंवा भिन्न लैंगिक कल असणे ही गोष्ट वरपांगी समजणारी नाही. त्या व्यक्तीला समलैंगिक व्यक्तीबद्दल लैंगिक ओढ वाटण्यावरून ते समजते.

सेक्सबद्दल विचार मनात येणे हे गैर नाही. आपले स्वत:चे मन काही वेळा करू नको म्हटले की नेमके तेच करते. अशावेळी जर भीती वाटण्याजोगे काही नसेल तर लहान मुलाबाबत जसे दुर्लक्ष करावे तसेच आपल्या मनाकडेही दुर्लक्ष करावे. वयात येताना, तरुणपणी किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर लैंगिक भावना मनात येऊ शकतात. सतत सेक्सबद्दल बोलणे, पोर्न फिल्म पाहणे, लैंगिक साहित्य वाचणे या कृतीतूनही अशा इच्छा सतत मनात येऊ शकतात. सेक्स सोडूनही किती तरी आनंददायी, मन प्रसन्न करणाऱ्या अशा गोष्टी आहेत, त्या करण्याचा प्रयत्न करता येईल. इतर छंद जोपासणे, फिरायला. वाचन,चर्चा याही मनाला तितकाच आनंद देतात. सेक्सचे विचार किंवा लैंगिक भावना वाईट नाहीत पण त्याचा परिणाम दुसर्‍या कुणाला त्रास देण्यात मात्र कदापिही होऊ देऊ नका. तसे होईल असे वाटले तर तज्ञांची मदत मिळू शकते.

वीर्यपतन झाल्यामुळे कमजोरी येत नाही. हा गैरसमज आहे. हा समज तयार होण्यामागे बहुधा वीर्यपतनाच्या आधी शरीराची होणारी हालचाल व त्यामुळे लागणारा दम व येणारा थोडा थकवा असावा. पण असा थकवा काही शारीरिक स्वरुपाचे काम केल्यावरही येतो. त्यामुळे वीर्यपतन झाल्याने कमजोरी येते हा गैरसमज आहे

लिंग ताठर होण्यात अडचणी येणार्‍यांना डॉक्टरी सल्ल्याने काही औषधे दिली जातात. त्यातले एक म्हणजे व्हायाग्रा. व्हायाग्राचे डोकेदुखी, डोके व चेहरा गरम वाटणे, पोट बिघडणे, डोळ्यांना नीट स्प्ष्ट न दिसणे, निळसर दिसणे, नाक वाहाणे, पाठ दुखणे, हातपाय दुखणे, मळमळणे, चक्कर येणे, अंगावर पुरळ उठणे असे अनेक दुष्परिणाम आहेत. हे सर्वांनाच होतील असे नाही, पण कुणालाही होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरी सल्ल्याशिवाय व्हायाग्रा घेणे आरोग्यासाठी घातक आहे.

चुंबनाने एच.आय.व्ही होण्याची शक्यता नाही. एच.आय.व्ही असलेल्या व्यक्तीच्या लाळेत रक्त मिसळले असेल किंवा तोंडात जखमा असतील तरी ओल्या चुंबनातूनही एच.आय.व्ही पसरायची शक्यता नगण्य आहे.

हो. अंगात रक्त कमी असेल म्हणजेच अॅनिमिया असेल तर मासिक पाळी उशीरा येऊ शकते किंवा अनियमित असू शकते किंवा पाळी दरम्यान जास्त रक्तस्रावही होऊ शकतो. स्त्रीच्या रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण साधारणपणे 11 ते 14 gms/dl असायला पाहिजे. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आहारात लोहयुक्त अन्न पदार्थांचा (हिरव्या पालेभाज्या, बीट, गूळ- शेंगदाणे, अळीव, काळे तीळ, अंडी, कलेजी, इत्यादी) समावेश करायला पाहिजे.

पाळी लवकर येण्यासाठी किंवा उशीरा येण्यासाठी घरगुती उपाय करू नाही शकत. पाळी चक्रामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मेंदू आणि अंडकोषामधल्या संप्रेरकांवर आणि शरीरात घडणाऱ्या इतर प्रक्रियांवर अवलंबून असतात. अंडकोषातून बीज बाहेर आल्यावर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरु होते. या घटना आपल्या हातात नाहीत. त्यामुळे त्यावर घरच्या घरी काही उपायही करता येत नाहीत. पण पाळी ही कटकट किंवा विटाळ नाही, तर इतर शारीरिक प्रक्रियांसारखीच एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. पाळी लवकर व उशिरा येण्यासाठी काही औषधे घेतली जातात. ह्या औषधात कृत्रिम संप्रेरकेच असतात. अशी औषधे वारंवार घेतली तर त्यामुळे पाळी अनियमित होऊ शकते.

वीर्य तोंडावाटे पोटात गेल्यास गर्भधारणा होऊच शकत नाही. गर्भधारणा होण्यासाठी वीर्य गर्भाशयात पोचावे लागते आणि ते फक्त योनीमार्गातूनच जाऊ शकते. वीर्य तोंडातून पोटात गेल्यास ते गर्भाशयात पोचणारच नाही.

अधिक माहितीसाठी नक्की वाचा – https://letstalksexuality.com/conception/

वीर्य हे शुक्राणू, प्रोटीन, साखर, पाणी व काही ग्रंथींमधून स्त्रवलेल्या स्त्रावांनी बनलेले असते. त्यामुळे ते पोटात गेल्याने स्त्रीला काही धोका नसतो. मात्र त्या चवीने काही स्त्रियांना उलटीची भावना होते. काही लिंगसांसर्गिक आजार असतील तर त्याची लागण व्हायची शक्यता नाकारता येत नाही.

सेक्स पॉवर म्हणजे काय हे आधी विचारात घेऊ. सेक्सची कृती ही आपल्या पार्टनर बरोबरची स्पर्धा नाही. ती दोघांनाही आनंद देणारी कृती आहे. एकमेकांमधले प्रेम आणि आकर्षण हे सर्वात चांगले लैंगिक क्षमता वाढवणारे औषध आहे. शीघ्रपतन होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पौष्टिक व सर्वसमावेशक आहार, नियमित व्यायाम या गोष्टींमुळे शरीर सुदृढ राहते व ज्याचा सकारात्मक परिणाम आपल्या लैंगिक जीवनावर देखील नक्कीच होतो.

शिश्नाचा ताठरपणा वाढवण्यासाठी, संभोगाची इच्छा किंवा वेळ वाढवण्यासाठी बरेच पुरुष जाहिरातींना भुलून बाजारात मिळणारे सेक्स टॉनिक विकत घेतात. त्याचा काही उपयोग नसतो. लैंगिक भावना ही नैसर्गिक असते. वय, शारीरिक स्वास्थ, ताणतणाव नसणे, एकमेकांवरचे प्रेम, संवाद, निवांतपणा, खाजगीपणा यांचा लैंगिक संबंधांसाठीच्या इच्छेवर परिणाम होत असतो. लैंगिक संबंधात रस घेणारा जोडीदार असणे हेच खरे सेक्स टॉनिक असू शकते.

काही वनस्पतींचा वापर सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठी होतो अशी जाहिरात केली जाते. बर्‍याचदा अशा जाहिराती चुकीच्या असतात. लिंगाचा ताठरपणा वाढवण्यासाठी लिंगाला होणारा रक्त पुरवठा वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा पोषक आहार आणि व्यायाम उपयोगी पडू शकतो. शक्ती, स्टॅमिना, किती जास्त वेळ, किती मोठे लिंग किंवा किती ताठर यापेक्षाही सेक्समधून मिळणारा आनंद जास्त महत्त्वाचा असतो. हा आनंद पॉवर वाढवूनच मिळेल असे काही नाही. एकमेकांना कशातून चांगले वाटते, दोघांच्याही शरीर आणि मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचाही शोध घ्या. तुमच्या जोडीदाराशी संवाद साधलात तर नक्कीच फायदा होईल.

प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला कशाने उत्तेजना निर्माण होईल हे सांगता येणे अवघड आहे. तरीही जोडीदाराबरोबर चांगला संवाद असेल तर कुणाला कशाने चांगले वाटते आहे हे एकमेकांशी असलेल्या संवादातून कळू शकेल.

सेक्स करताना सर्वप्रथम दोन्ही जोडीदारांची तयारी आहे ना हे पाहायला पाहिजे. सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना याचा विचार व्हायला पाहिजे. पहिल्यांदा सेक्स करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जमायलाच पाहिजेत असा आग्रह धरु नका. दोघांना आनंद मिळणे आणि छान वाटणे जास्त महत्त्वाचे आहे. सेक्स करताना निरोध वापरणे कधीही चांगले. त्यामुळे नको असलेली गर्भधारणा व लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांपासूनही संरक्षण मिळू शकेल.

प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण होणार्‍या लैंगिक भावना वेगवेगळ्या असू शकतात. लैंगिक उत्तेजना, इच्छा मेंदूतून नियंत्रित होतात. त्यामुळे प्रत्येकाचा लैंगिक अनुभव हा स्वतंत्र असतो. काही जणांना सेक्स करण्याची भावना आणि त्यातून आनंद घेण्याची गरज जास्त असते तर काहींना सेक्सविषयी फारसे आकर्षण नसते. या दोन्हींमध्येही काही गैर नाही. सेक्स ही आनंददायी कृती आहे, मात्र ती दोघांच्या संमतीने व्हायला हवी. त्यामुळे सेक्स करावासा वाटत नसेल तर जोडीदाराला तसे स्पष्टपणे सांगावे. प्रेमामध्ये अनेकदा संभोग आनंददायी होतो पण प्रेम सिद्ध करण्यासाठी संभोग करायलाच पाहिजे असे काही नाही. दोघांनीही एकमेकांना समजून घेण्याची गरज असते.

एकमेकांच्या संमतीने केलेला सेक्स हा जास्त आनंददायक व समाधानकारक असतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसावी. जोडीदाराला सेक्समध्ये अजिबात रस नसण्यामागे काही कारण आहे का, मनावर कुठला ताण आहे का, हे समजून घ्यायला हवे. त्यासाठी जोडीदाराशी मोकळा संवाद होणे गरजेचे आहे. गरज असेल तर तज्ञांची मदत घेता येऊ शकेल.

सेक्स मध्ये रस नसण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पण म्हणजे त्याचा अर्थ काही प्रॉब्लेम आहे असा होत नाही. वयानुसार लैंगिक उर्मी कमी होत जाते. चाळीशी नंतर व्यक्ती काही भावनिक, शारीरिक आणि लैंगिक बदलांमधून जात असतात. तसेच काही आजार किंवा औषधांमुळे देखील सेक्सची इच्छा कमी होऊ शकते. त्यामुळे नात्यामध्ये काही वेळा ताण निर्माण होऊ शकतो. त्यासाठी गरज असेल तर तज्ञांची मदत घेता येऊ शकेल.

आपल्या समाजात कौमार्याला फार महत्त्व दिले गेलेले आहे. लग्नाआधी मुलीने कुणाशीही संबंध ठेऊ नयेत अशी अपेक्षा समाज ठेवतो. त्यामुळे मुलीच्या/स्त्रियांच्या इज्जतीबाबत अनेक नियम, धारणा तयार झाल्या आहेत. मुलांच्या बाबत मात्र असे नियम, अशा धारणा नाहीत. एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य, शील, प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी तिच्या लैंगिक निर्णयांवर अवलंबून नसते. त्या मुलीचे वयात येण्याआधी किंवा नंतरही समजा शरीरसंबंध आले असले तरी ते आता नाहीत. त्याचा मुलीच्या उर्वरित आयुष्याशी संबंध लावायची काहीही गरज नाही. तिची जर लग्नाला तयारी असेल. तुम्हाला ती आवडत असेल, तिच्याबरोबर संसार करण्याची, आयुष्य सुरू करण्याची तुमची इच्छा असेल तर लग्न करा. मात्र हे करण्यापूर्वी तुमच्या मनातल्या शंकांची जळमटे काढून टाका. पुढच्या आयुष्यात तिच्या भूतकाळावरून दोषारोप न करण्याची, तिच्यावर संशय न घेण्याची आणि तिला आदराने वागवण्याची जबाबदारी तुमची आहे. हे जर तुम्हाला पटत असेल तरच लग्नाचा निर्णय घ्या. तसे तुम्हाला जमणार नसेल तर स्वतःला थोडा वेळ द्या. अशा संशयाच्या, शंकेच्या वातावरणात, नात्यात राहणे तिच्याही आणि तुमच्याही दृष्टीने चांगले नाही.

कुठलेही जवळचे नाते हे आपल्या मानसिक आनंदासाठी महत्त्वाचे असते. विश्वास, आदर आणि समजुतीवर आधारलेले नाते हे अधिक सुदृढ असते. विश्वासाचा अभाव, संशयीपणा, नियंत्रण ठेवण्याची वृत्ती, वैयक्तिक सीमा स्पष्ट नसणे, स्वतःच्या गोष्टी करण्यासाठी किंवा इतर मित्रमंडळींना भेटण्यासाठी पुरेशी जागा नसणे, इ. गोष्टी सामान्यपणे नाते त्रासदायक असल्याचे दर्शवितात.

जर तुम्हाला सततच तणावाखाली असल्यासारखे, त्रस्त वाटत असेल तर त्याविषयी बोलणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही नात्यामधील एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांबद्दलचा संवाद असणे गरजेचे आहे. नाहीतर अपेक्षांविषयीचा आणि समजुतींविषयीचा गोंधळ आणि त्रास निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हयासंदर्भात जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करून त्यावर उपाय काढता येऊ शकतो.

गेल्या काही काळात वेगळ्या जातीच्या मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमात पडल्याबद्दल किंवा लग्न केल्याबद्दल मुलांना आणि मुलींना मोठ्या प्रमाणावर हिंसेचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे घरच्यांचा विरोध असेल तर तो हिंमत ठेऊन आणि चिकाटीने मोडून काढावा लागेल. समाज, शेजारी-पाजारी, नातेवाईक असे अनेक प्रकारचे दबाव आपल्यावर आणि आपल्या पालकांवर असतात. संस्कृती, जातीच्या, घराण्याच्या इज्जतीच्या कल्पना, बंधनेही असतातच. अशा वेळी पालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता त्यांचा पाठिंबा कसा मिळवता येईल, याचा विचार करा. मुख्य म्हणजे दोघे सज्ञान असाल, स्वतःच्या पायावर उभे असाल, स्वतंत्र रहायला तयार असाल तर तुम्ही विशेष विवाह कायद्याची मदत घेऊन लग्न करू शकता. महाराष्ट्रात अशा संस्था-संघटना आहेत ज्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांसाठी मदत करतात.

ब्लू फिल्म पाहून लैंगिक भावना वाढत असतील पण म्हणून त्या शमवण्यासाठी बाहेर पडून बलात्कार करावे असे मात्र नाही. काही जण तेवढ्यापुरता आनंद घेऊन थांबतात, काही जण हस्तमैथुन करतात. बलात्कार हे जबरदस्तीचा, बळाचा वापर करून धमकावून केलेले गुन्हे आहेत. केवळ काही दृश्ये, चित्रे पाहून आपोआप तसे घडत नाही. ब्लु फिल्म पाहणे व बलात्कार याचा सरळ सोट संबंध लावणे बरोबर नाही. बलात्कार रोखण्यासाठी पुरूषांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे.

ब्लू फिल्म किंवा पोर्नोग्राफी पाहणे हा आपापल्या निवडीचा भाग असू शकतो. अनेकदा अनेकांसाठी लैंगिक संबंधांबद्दल माहिती मिळवण्याचे दुसरे कुठलेली साधन न मिळाल्याने पोर्न पाहाणे ह्यालाच ते लैंगिक शिक्षण मानू लागतात. पोर्नोग्राफिक व्हिडीओज मध्ये दाखवलेल्या सर्व गोष्टी ख-या नसतात. त्यातील कृती, वेळ या सगळ्यामध्ये अतिशयोक्ती असते. तसेच त्यात स्त्रियांचे वस्तूकरण, त्यांचा अनादर करण्याची वृत्ती दिसते व संमतीशिवाय केलेल्या, हिंस्र लैंगिक कृतींचे गौरवीकरण केलेले असते. त्यामुळे पोर्नोग्राफीस प्रमाण मानून त्याचा खऱ्या लैंगिक आयुष्यावर प्रभाव पडू देऊ नये.

स्वतःच्या करमणुकीसाठी पॉर्न बघण्यात वावगे काही नाही. पण त्यातून कधीकधी स्वतःच्या लैंगिक कृतीविषयी चिंता, आपल्या शरीराविषयी, अवयवांविषयी कमतरतेची भावना निर्माण होताना दिसते. त्यातून चुकीची स्व-प्रतिमा, काळजी, तुलना ह्या गोष्टी घडतात. आपल्या जोडीदाराची पोर्नोग्राफीतील कलाकारांशी तुलना करणे, त्यांच्याकडून पोर्नोग्राफीमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करण्याच्या अपेक्षा धरणे, तिथे दाखवलेली जबरदस्ती प्रत्यक्षात अवलंबणे हे योग्य नाही.