जिगोलोज/ पुरुषवेश्या

वेश्याव्यवसाय हा फक्त स्त्रियांपुरताच मर्यादित नाही राहिला. स्त्रियांसाठी सेवा पुरवणारे पुरुषवेश्या ‘जिगोलोज’ आहेत, यांच्या कामाच्या पदधती जशा वेगळ्या आहेत तशा समस्याही वेगळया आहेत.  स्त्रीवेश्याव्यवसाय व पुरुषवेश्याव्यवसाय या दोघांत फरक आहे. स्त्रीवेश्याव्यवसाय हा मुख्यत: आर्थिक मोबदल्यासाठी केला जातो. पण पुरुषवेश्याव्यवसायात नेहमीच आर्थिक गणित असेल असं नाही. काही वेळा मुख्य उद्देश लैंगिक सुखाचाही असू शकतो व आर्थिक मोबदला हा दुय्यम हेतू असू शकतो. उदा. जर एखादा पुरुष उभयलिंगी किंवा समलिंगी असेल व दुसरा एखादा पुरुष त्याच्यावर भाळला (व दोघांना संभोग करायची इच्छा असेल) तर दोन पर्याय असतात. एक तर लैंगिक संबंध फुकट करायचे किंवा आर्थिक मोबदला मागायचा.

‘Gay’ Activist  अशोकराव कवी म्हणाले, “काही पुरुषवेश्यांना वेश्या म्हणणं बरोबर नाही, कारण तो खऱ्या अर्थानं वेश्याव्यवसाय नसतोच.  जर आपल्याला आवडलेला पुरुष हाती लागला, त्याच्याबरोबर संग करायची इच्छा झाली व ते करण्यासाठी एखादी नोट मिळत असेल तर ती का घेऊ नये, असा विचार तो पुरुष करतो- Pleasure combined with business”. त्यामुळे हा सौदा खूप फ्लेक्झिबल असतो.

काही वेळा एखादी व्यक्ती खूप आवडली तर फुकट केलं जातं. काही वेळा गि-हाईक पैसे न देता इतर मार्गांनी परतफेड करतं. उदा. एखादा रिक्षावाला/जीपवाला लिफ्ट देईल, तर एखादा दुकानदार मोबाईल रिचार्ज करून देतो. कोणी जेवायला घालतं, तर कोणी पुरुषवेश्याला बाजारात टी-शर्ट खरेदी करून देतो. हे सगळं करताना कोणालाही यांच्या नात्याचा गंध नसतो. या सगळ्यामुळे पुरुषवेश्याव्यवसाय व स्त्रीवेश्याव्यवसाय यांची तुलना होऊ शकत नाही.

धंद्याची  जागा आणि आर्थिक मोबदला 

पुरुषवेश्याव्यवसायाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. पुरुष जे स्त्रियांना सेवा देतात व पुरुष जे पुरुषांना सेवा देतात. पुरुष जे स्त्रियांना पैशासाठी सेवा देतात, ते तुलनात्मक कमी आहेत. पण पुरुष जे पुरुषांना सेवा देतात, यांचं खूप मोठं प्रमाण आहे. फार थोडा पुरुषवेश्याव्यवसाय ‘ब्रॉथेल’ मध्ये चालतो. क्वचित वेळा शहरातल्या लाल बत्ती इलाकातल्या काही घरवाल्या किंवा इतर ठिकाणी काही घराचे मालक आपलं घर/जागा काही ठराविक पुरुषवेश्यांना गरजेपुरतं भाड्यानं देतात. पुरुष वेश्येला मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातला एक हिस्सा घरवाली किंवा घरचा मालक घेतो.

बहुतेक वेळा पुरुषवेश्याव्यवसाय रस्त्यावर चालतो. पंचवीस रुपयापासून ते हजारों रुपये घेणारे पुरुष उपलब्ध होऊ शकतात. या व्यवसायात काही भिन्नलिंगी आहेत (काही भिन्नलिंगी पुरुष आर्थिक मोबदल्यासाठी पुरुषाला सेवा देतात), काही उभयलिंगी आहेत, काही समलिंगी आहेत. काही अशिक्षित आहेत, तर काही उच्चशिक्षित आहेत, काही पैशांसाठी धंदा करतात तर काही कॉलेजमधील मुल श्रीमंत जीवनशैली जगता यावी म्हणून धंदा करतात.

काहीजण शर्ट-पँटवर धंदा करतात, काहीजण (काही ट्रान्सजेंडर्स) साडी घालून धंदा करतात. साडीवर राहणारे काही ट्रान्सजेंडर्स धंदा चांगला व्हावा म्हणून कृत्रिम स्तनं बसवून घेतात. बहतांशी पुरुषवेश्या शर्ट-पँटवर असल्यामुळे त्यांना ओळखायला अवघड जातं. त्याला पारखी नजर लागते. त्या नजरेनं गि-हाइकानी पुरुषवेश्या निवडला की लॉजवर जातात. जर गि-हाईक गरीब असेल तर अंधाऱ्या जागेत जाऊ संग होतो.

कॉल बॉईजची जाळी

काही मोठ्या शहरांत कॉल बॉईजची जाळी आहेत. तासाचे अनेक हजार घेणारे कॉल बॉईज असतात. पुरुष किंवा स्त्री या दोघांनाही कॉल बॉईज उपलब्ध होऊ शकतात. कोणता पुरुष हवाय हे गि-हाईक फोटो अल्बममधून ठरवतो. असं एक जाळं चालवणाऱ्या मालकाला विचारलं की,  “गि-हाईक चांगलं आहे, हे कसं ओळखता?” तेव्हा ते म्हणाले, “आम्ही त्या गि-हाइकाला कोणाकडून रेफरन्स मिळाला हे विचारतो. त्या रेफरन्स देणाऱ्या व्यक्तीकडे या व्यक्तीबद्दल नीट विचारपूस करतो. कधीपासून तुमची ओळख आहे? किती विश्वासार्ह आहे? पूर्ण खात्री झाल्यावरच आम्ही त्याच्याशी बोलणी करतो.

काही मालिशवाले

काही मालिश करणारे पुरुष वेश्याव्यवसाय करतात. मालिश करणारे लॉजवर मालिश करतात किंवा गि-हाइकाच्या घरी जाऊन मालिश करतात. मालिशबरोबर काहीजण लैंगिक सुख द्यायचे काम करतात. गि-हाइकाबरोबर हस्तमैथुन, मुखमैथुन किंवा गुदमैथन करतात. (काही गुंड व्यक्ती या मालिश करणाऱ्यांवर पाळत ठेवतात. ते गि-हाइकाला लॉजमध्ये नेऊन मालिश करायला लागले, की दरवाजा जोरजोरानं वाजवतात व गि-हाईक पुरुषाबरोबर संभोग करतोय असा आरडाओरडा करून गि-हाइकाकडून पैसे उकळतात).

काही पुरुषवेश्या सज्जन आहेत तर काही चोर आहेत. गि-हाइकावर मुखमैथुन करताना त्यांचं लक्ष नसताना त्यांच्या उतरवलेल्या पॅटमधून पाकीट, मोबाईल मारण्याचे प्रकार घडतात. काही वेळा गळ्यातील सोन्याची चेनसुद्धा सफाईदारपणे लांबवली जाते. बहुतेक लुबाडलेले गि-हाईक पोलिसात जात नाहीत.

या नाण्याची दुसरी बाजूही आहे. काही गि-हाईकं पुरुषवेश्यांवर जबरदस्ती करतात. संभोग झाल्यावर मारहाण करतात व त्यांना लुबाडतात. धंदयाच्या इलाक्याच्या आसपासचे गुंड पुरुषवेश्यांना मारहाण करतात. पोलिसांचीही वक्रदृष्टी असतेच. पुरुषवेश्यांमध्ये सुरक्षित संभोगाचं प्रमाण कमी आहे. काही पुरुषवेश्या एचआयव्ही संसर्गित आहेत. एसटीआयची लक्षणे दिसली तरी अनेकजणांना वैदयकीय सुविधा घ्यायला संकोच वाटतो. डॉक्टर आपल्याला वाईट वागणूक देतील ही भीती असते.

वेश्याव्यवसाय व कायदा

भारतात भिन्नलिंगी वेश्याव्यवसायाला बंदी नाही. स्त्री व पुरुष दोघंही वेश्याव्यवसाय करू शकतात. बंदी नसली तरी वेश्याव्यवसायावर नियंत्रण असावं व वेश्याव्यवसायाच्या नावाखाली स्त्रिया किंवा लहान मुला/मुलीचं लैंगिक शोषण होऊ नये म्हणून सरकारने ‘इममॉरल ट्रॅफिक प्रिव्हेशन अॅक्ट, १९८७ (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा) व भारतीय दंडविधान संहितेअन्वये वेश्याव्यवसायावर काही निर्बंध घातले आहेत. हे कायदे वेश्यांना किंवा त्यांच्या गि-हाइकांना त्रास देण्यास निर्माण केलेले नाहीत. या कायदयांची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे.

 • १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींनी वेश्याव्यवसाय करण्यास बदी आहे.
 • कोणत्याही १८ वर्षांखालील व्यक्तीला वेश्याव्यवसायासाठी विकण/ विकत घेणं गुन्हा आहे (भा.दं.सं. ३७२/३७३).
 • जबरदस्तीनं कोणालाही वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणं गुन्हा आहे.
 • स्त्री/पुरुषवेश्यांना वेश्याव्यवसायासाठी विकणं/विकत घेणं गुन्हा आहे. (त्या स्त्री/पुरुषांची या व्यवहारास संमती असली तरीसुद्धा).
 • एखादया व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशांतून स्वत:चा उदरनिर्वाह करणं गुन्हा आहे (उदा. दलाली करणं गि-हाइकाला वेश्या पुरवण्याचं काम करून पैशाचा हिस्सा घेणं,  जर बायको वेश्याव्यवसाय करून नवरा तिच्या पैशांचा उपभोग घेत असेल तर तो ही गुन्हा आहे.
 • ‘ब्रॉथेल’ चालवणं गुन्हा आहे.
 • सार्वजनिक ठिकाणी (उदा.शाळा, धार्मिक स्थळं इत्यादी.) व त्याच्या २०० मीटर्सच्या आसपास वेश्याव्यवसाय करणं गुन्हा आहे.
 • वेश्यांनी रस्त्यातून किंवा घराच्या दारातून, खिडकीतून गि-हाइकाला खुणावणं, हटकणं गुन्हा आहे.

 

 • संदर्भ:  ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या बिंदुमाधव खिरे लिखित पुस्तकातुन साभार.
 सदर पुस्तक रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे येथे विक्रीसाठी उपलब्ध.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

4 Responses

 1. Sahebrao mane says:

  वृषण (गोठ्या) लहानमोठ्या असु शकतात का? वय वर्षे 52. माझ्या गोठ्या मध्ये 75% फरक आहे. पुढे जाऊन काही त्रास होईल का?

  • हो, पुरुषांना जे दोन वृषण असतात ते दोन्ही वृषण समान आकाराचे नसतात. एक वृषण दुसऱ्यापेक्षा थोडं मोठं असतं व थोडं खाली लोंबत असतं. त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला आता जर काही त्रास होत असेल वा पुढे जाऊन काही त्रास जाणवलाच तर डॉक़्टरांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकताच की.

 2. Pravin Kamble says:

  एका प्रश्न होता लिंगाच्या समोरच्या टोकाला असलेला धाग्यासारखा बारिक आतडे जे लिंगाच्या समोरच्या टोकाला व लिंगाच्या वर असलेला चमडी दोघांना जोडून ठेवतो ते बारिक आतडे आपोआप तुटून पडतो का दुसरा पर्याय म्हणजे शस्त्रक्रिया करावी लागते

  • जर गरज असेल व डॉक्टरांनी सल्ला दिला तरच सुंता करावी. सर्वांचीच शीर तुटते असे नाही. अन जरी तुटली तरी तेवढ्यापुरता त्रास होतो. जखम भरल्यावर ब-याच लोकांना नंतर त्याचा त्रासही होत नाही. पण जर पुन्हा पुन्हा त्रास होतच असल्यास डॉक्टरांना भेटणं कधी ही उत्तम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap