letstalksexuality.com वेबसाईटला मी गेल्या तीन चार वर्षांपासून फॉलो करतोय… अत्यंत सुंदर आणि मार्गदर्शक माहिती इथे मिळते… या साईटसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे… माझं नुकतच लग्न झालंंय… पाहिल्या रात्री साठी मार्गदर्शन कराव ही विनंती.
वेबसाईट आपल्याला आवडते अन तुम्ही आपले जुने वाचक आहात, हे वाचून आनंद झाला. तुमचे आम्ही आभारी आहोत. तुम्हाला आवडलेले लेख इतरांना पाठवा व ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत कराल अशी आशा व्यक्त करत आहोत.
……………………………………………………………………………………..
पहिली रात्र….
मित्र-मैत्रिणींनी हसत हसत नवऱ्या मुलाला खोलीमध्ये ढकललंय. पलंगावर नववधू चेहऱ्यावरती पदर ओढून बसली आहे. तो हळूच पदर वर उचलतो. ती लाजेने चूर होते. एकेक दागिना उतरत जातो आणि खोलीचे दिवे मालवले जातात. सुहाग रात, लग्नानंतरची पहिली रात्र अशी सिनेमा-टीव्ही-पुस्तकांमधून आपल्या डोळ्यासमोर पक्की बसली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री लैंगिक संबंध होणारच आणि ते झाले नाहीत तर दोघांपैकी कुणामध्ये तरी काही तरी कमी आहे असा फार मोठा समज आहे.
खरं तर एकमेकांच्या इतक्या जवळ येण्याची कदाचित पहिली संधी, दोघांसाठीही नवा अनुभव. मग अगोदर एकमेकांशी बोलण्यास काय हरकत आहे? सुहागरात म्हणजे सेक्स असा एकमेव अर्थ नसतो. उद्याचा दिवस संपून परत रात्र येणारच असते. तेंव्हा सुहाग रात्रीची ऊब अनुभवण्या अगोदर सुरुवातीला ‘कूल’ असण्यात काहीच हरकत नाही.
लग्नाची पहिली रात्र
नक्की काय होणार, काय करायचं, कसं करायचं अशी धडधड, त्याचं टेन्शन असण्याची शक्यता असते. गोष्टी, कथा कांदबऱ्या आणि सिनेमाने मनात कोरून ठेवलेले पहिल्या रात्रीचे प्रसंग पाहिलेले वाचलेले असतात. आयुष्यातील पहिला वहिला सेक्स करताना सर्वप्रथम दोन्ही जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. पहिल्या रात्री सेक्स केलाच पाहिजे याचंही दडपण घेण्याची गरज नाही. जरा थांबा …
‘कारभारी जरा दमानं’
सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना (दोघांची पण) आणि हो दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना? याचा विचार व्हायला पाहिजे. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. याला प्रणय किंवा फोअरप्ले (लिंक पहा) म्हणतात. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. आणि पहिल्यांदा सेक्स करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जमायलाच पाहिजेत असा आग्रह धरू नका. एकमेकांना आनंद मिळणं आणि छान वाटणं जास्त महत्त्वाचं आहे.
व्हर्जिन बिर्जिन असलं काय बी नसतं
मुलींच्या योनीमार्गात एक लवचिक पडदा असतो, ज्याला हायमेन असं म्हणतात. पहिल्या सेक्सच्या वेळी हा पडदा विलग होतो आणि कधी कधी त्यातून रक्त येतं. मात्र एक गोष्ट पक्की लक्षात घ्या. हा पडदा सायकल चालवणं, खेळ, पोहणं, कष्टाची कामं अशा इतरही कारणांनीही फाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या योनीमार्गात हा पडदा असतोच असं नाही आणि तो पहिल्या सेक्सच्या वेळी फाटून रक्त येतंच असं नाही.
कंडोम तर मस्ट बरं का
पहिल्यांदाच सेक्स करत असाल तर प्रभावी गर्भनिरोधक वापरणं कधीही चांगलं. निरोध (लिंक पहा) म्हणजेच कंडोमचा वापर करा व गर्भधारणा किंवा लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांची भीती मनातून काढून टाका.
थोडक्यात काय तर वेगळं काहीही करु नका, एकमेकाला समजुन घ्या, गप्पा मारा, एकमेकांची आवडनिवड जाणून घ्या.
थोडक्यात एकमेकाला वेळ द्या. बाकी गोष्टी हळूहळू आपोआप जमतील. कारण ही तुमची तुम्ही शिकायची गोष्ट आहे अन ती पण एकमेकाच्या संमतीने अन जोडीने.
खूप शुभेच्छा!!
हे तुमच्यासाठी
लग्नाच्या याच पहिल्या रात्रीचं सुंदर आणि हळुवार चित्रण करणारी कविता खास तुमच्यासाठी – नक्की वाचा .. https://letstalksexuality.com/the-wedding-night/